Friday, July 20, 2012

श्रावणोत्सव...

निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्व आहे. चार्तुमासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे वर्णन केले जाते. आषाढी अमावस्या दीपपूजन तथा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि वातावरणही बदलते. ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. देवाच्या हातानं खाली येणाऱ्या 'माणिक मोत्यांचं ' हिरवं स्वप्न फुलू लागतं. शेताच्या बांधावरून 'भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं रं' असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं. दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्या उभी राहते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतेच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात...माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट... ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दारापाशी तिच्या येरझऱ्या जणू 'सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया' या तिच्या भावना व्यक्त करीत असतात...आणि इकडे व्रताची तयारी सुरू झालेली असते.

श्रावण महिना सण-उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. पहिला श्रावणी सोमवार म्हणून दोन तास आधी सुट्टी मिळाली की आम्ही देखील घरी जाऊन कॅलेंडर पाहून सुट्टयांच्या तारखांची नोंद करायचो. सकाळी उठल्यावर 'सोमवार कोण धरणार आहे?' आईचा प्रश्न...उपवासाच्या पदार्थांची मजा... समुद्र मंथनात तयार झालेले 'हलाहल' त्याने प्राशन केले तो हा सोमवार...या सोमवारला शंकराची पुजा करतात. 

महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. विशेषत: नवविवाहितांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. बालकवींनी या आनंदाचे खुप सुंदर वर्णन केले आहे,

'देव दर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत'

महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरूवात होते शिवामूठच्या व्रताने. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात. नवविवाहीत महिलांनी पाच वर्षापर्यंत हे व्रत करण्याची परंपरा आहे. अशाच प्रकारे परंपरेने केल्या जाणाऱ्या फासकी व्रतात पसाभर तांदूळ शंकराची पिंड आणि नंदीला वाहतात. 

सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष. नववधूसाठी तर खासच. संसारातील सौख्य-प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत करतात. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मंगळागौरीची पुजा, त्यानंतर ओव्या..उखाणे...हळदकुंकू...ओटी भरणं...रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ...त्यानिमित्ताने माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम अनुभवायला मिळतं. मराठमोळा पारंपरिक वेशभूषेतला हा महिलांचा समुह श्रावणातल्या सप्तरंगी आणि आनंदमयी वातावरणाचं जणू प्रतिनिधीत्व करतो.

शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण येतो. नाग बिळातील उंदरांना नष्ट करणारा असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्र असतो. म्हणून त्याची पुजा करतात. त्याला इजा होऊ नये म्हणून या दिवशी जमीन खणत नाही किंवा नांगर चालविला जात नाही. वारुळाला जावून नागाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. महिला या दिवसाला 'झोकापंचमी' म्हणूनही संबोधतात. म्हणूनच सासुरवाशीण म्हणते-

'येता वर्षासरी चिंब आठव दाटले ऊरी
मन वेडे, घेई हिंदोळे, माझीया माहेरी
पंचमीचा गं बांधुन झुला
श्रावण आला सखे श्रावण आला...'

नागपूजनाच्या निमित्ताने मोकळ्या निसर्गात जाणे प्रकृतीसाठी चांगले असते आणि ते झाल्यानंतर झिम्मा, फुगडी आणि वडाच्या पारंब्यावरचे झोके... हा सण शेतीप्रधान संस्कृतीचे द्योतक असल्याने नागाचे महत्व लक्षात घेऊन अंधश्रद्धांना बळी न पडता या सणाची खरी पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच बदलत्या परिस्थितीत नागपंचमीचे व्रत करतांना नागाचे रक्षण करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.

शुक्ल पक्षातील पौर्णिमेला 'नारळी पौर्णिमा' म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण. ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे अशा 'समिंदराला' या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो. रंगबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो. नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची प्रथा आहे.

महिलांसाठी या दिवसाचे खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाखमोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. या सणाच्या निमित्ताने सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसेच अनाथालयातील मुले, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न या सणाच्या निमित्ताने करता येतात.

शिळसप्तमीची अग्नीदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपाने पुजा झाली की 'गोविंदा आला रे आला..' चा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. दहीहंडीची धमाल आणि बच्चेकंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ...गोविंदा पथकाचा पराक्रम... त्यात पावसाची सर आली तर आनंदाला नुसते उधाण येते. 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून देत महिला मंडळांचे गोविंदा पथकही महानगरात मनोरे रचून दहीहंडी फोडतांना दिसतात. काळानुसार उत्सवाचे स्वरूप व्यापक होत असले तरी याच्या सांस्कृतिक गाभ्याला धक्का लागणार नाही याची काळजी मात्र सर्वांनीच घ्यायला हवी.

श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावस्या. आईच्या हाताचं वाण घेतांना लहानपणी मजा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठी हा सण महत्वाचा असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या 'जिवा-शिवाच्या' बैलजोडीला विश्रांती देण्याचा दिवस, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचे, अंगावर झुल चढवायची आणि सायंकाळी सवाद्य मिरवणूक...गाव त्यानिमित्ताने एकत्र येतो. खान्देशात पुरणपोळीऐवजी खापरावरचे मांडे करण्याची पद्धत आहे. ताज्या दुधाबरोबर मांड्यांची चव काही वेगळीच असते. 

श्रावण संपताना कणसात दाणा भरू लागतो. पीकाची राखण सुरू होते. गावातील मंदिरात सुरू झालेले श्रीगणेशाच्या आरतीचे स्वर शेताच्या बांधापर्यंत पोहोचतात आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिक्षा सुरू होते. माहेरवाशीण मंगळागौर आटोपून सासरी परतते आणि गौरी गणपतीच्या तयारीला लागते. नव्या उत्सवाचे नवे रंग...आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे. आनंद देणं आणि घेणं हे तिचं मूळ आहे. वेगवेगळे सण आणि उत्सव याचसाठी असतात. ते माणसांना एक सुत्रात बांधतात. विविधरंगाने नटलेला श्रावणही हाच संदेश देत आपला निरोप घेतो.


  • डॉ. किरण मोघे 
  • No comments:

    Post a Comment