Sunday, July 8, 2012

ऐन तारुण्यात सामना मुरूमांशी


स्वच्छंदपणे बागडत विश्वाला कवेत घेऊ पाहणारं तारुण्य सर्वांनाच हवं असतं. प्रत्येकजण आयुष्यातील सर्वात सुवर्णकाळ म्हणून तारुण्याकडे पाहात असतो. मात्र याच आत्मविश्वासानं ओसंडून वाहणाऱ्या गुलाबी तारुण्याच्या समुद्राला काही समस्यांचा नावडता किनारा लाभलेला असतो. ऐन तारुण्यात सामना करावा लागणाऱ्या नावडत्या गोष्टींपैकी एक म्हणजे तारुण्यपीटिका…अर्थात मुरूमं. यालाच इंग्रजीमध्ये पिंपल्स असं म्हणतात. कोणत्याही वयातील प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं अशी इच्छा असते. तारुण्यात तर ही इच्छा प्रबळ होतेच. मात्र याच तारुण्यात नैसर्गिकरित्या मिळालेल्या आत्मविश्वासाला काहीसा धक्का लावण्याचा प्रयत्न तारुण्यपीटिका करतात. मात्र काही पथ्य पाळली, आहारात थोडे बदल केले किंवा चेहऱ्याची योग्य काळजी घेतली तर तारुण्यपीटिकांवर मात करता येऊ शकते.
किशोर वयातून तारुण्यात पदार्पण करताना मुलं आणि मुलींच्या शरीरात महत्त्वाचे बदल होत असतात. मुख्यत: तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रीय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्त्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्त्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरूमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते त्यामुळे चेहऱ्यावर गालांवर, नाकांवर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरूमं येतात. ठराविक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरूमांना आमंत्रण ठरतो. मुरूमांचा त्रास असणाऱ्यांनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.
मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना तेलकट आणि हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थाचं सेवन कमी करावं. बटाटा, पिझ्झा, बर्गर तसेच चॉकलेट, शीतपेयं खाणं शक्यतो टाळावं. शरीरात आयोडीन प्रमाणापेक्षा जास्त झालं तरीही मुरूमं येतात. अतितिखट किंवा अतिगोड, आंबवलेले पदार्थ तसेच कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगे, टोमॅटो, चिंच, कैरी, दही, बेसनाचे पदार्थ, अननस वर्ज्य करावे. अर्धवट झोप किंवा मानसिक ताणतणावही मुरुमं वाढवण्यास मदत करतात त्यामुळे पुरेशी झोप घेणं आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळवणं गरजेचं असतं. धूम्रपान, तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आरोग्याला जसं अपायकारक आहे तसच मुरुमं वाढण्यासही कारणीभूत ठरतं. घामामुळं चेहरा तेलकट होऊन त्वचेवरची सूक्ष्म छिद्र बंद होतात आणि त्यामुळे पी अँक्ने नावाचा बॅक्टेरिया वाढून चेहऱ्यावर लाल पुटकुळ्या येतात. डोक्यात कोंडा झाल्यानंही मुरुमं येतात. कित्येकदा अनुवंशिकतेतूनही मुरूमं येऊ शकतात. स्त्रियांच्या मासिक पाळीत अनियमता आल्यास किंवा मासिक पाळीबाबत काही समस्या उद्भवल्यासही मुरूमांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त ठरतं. पचनासंदर्भातले गॅस, अँसिडिटीसारख्या पोटाच्या समस्या तसेच मलमूत्र विसर्गाच्या समस्याही मुरुमांना आमंत्रण ठरतात.
मुरुमांचा त्रास असणाऱ्यांनी आहारात फळं, पालेभाज्यांचा समावेश करावा. कपाळावर मुरूमं येत असल्यास केसांना तेल लावणं शक्यतो टाळावं. चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा कोमठ पाण्याने धुवून कोरड्या टॉवेलने पुसावा. चेहरा जास्तीत जास्त कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे जेवणानंतर भरपूर पाणी प्यावं. रक्तचंदन, कडूलिंबाची पानं, तुळशीची पानं मसूरडाळ यांचे समप्रमाणात मिश्रण वाटून त्याची पेस्ट करावी आणि सकाळी अंघोळीअगोदर चेहऱ्याला लावावी. चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर कोमठ पाण्यानं धुवून काढावी. तसेच डाळींब आणि संत्र्याचा सालीला थोड्या हळदीबरोबर वाटून त्यात पिकलेल्या लिंबाचा रस मिसळून मुरूमांवर लावावा. त्यामुळे् मुरूमं कमी तर होतातच पण फुटलेल्या मुरुमांमुळे चेहऱ्यावर उठलेले काळे डागही कमी होण्यास मदत होते. जायफळ तसेच रक्तचंदन उगळून चेहऱ्यावर लावल्यानेही मुरुमांचं प्रमाण कमी होतं.
मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पुरेसा व्यायाम करावा. अपचनाचे त्रास होवू नयेत याची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर आलेल्या मुरुमांना वारंवार हात लावू नयेत तसेच मुरुमं फोडण्याचा प्रयत्नही करू नये. मुरूमं पिकल्यावर आपोआप फुटतात. मुरूमं फुटल्यावर लगेच स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवावा. त्याचप्रमाणे साबणाचा वापर टाळावा. उन्हात फिरणं शक्यतो टाळावं किंवा उन्हात फिरण्यामुळं तसेच उकाड्यामुळे चेहऱ्यावर आलेला घाम त्वरित पुसून घ्यावा. रासायनिक औषधं किंवा रासायनिक गूण असणारे वेगवेगळे मलम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

No comments:

Post a Comment