Wednesday, July 4, 2012

जागतिक वारसा. . . !

नैसर्गिक जागतिक वारसा यादीत पश्चिम घाटाचा समावेश करण्यात आल्याची महत्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सर्वांग सुंदर विविध वनफ़ुलांनी नटलेले कास पठार, कोयना अभयारण्य, राधानगरी अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान तसेच इतर जंगल क्षेत्रात वाघांचे अस्तित्व आहे.

जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे.जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसहय होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते.पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित झाला आणि ७४१.२२ चौरस किलोमिटर एवढे क्षेत्र संरक्षित झाले, हा संपूर्ण भाग या जैवविधतेच्या पट्‌यात मोड्तो. एवढ्या क्षेत्रात विस्तारलेल्या या प्रकल्पात कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी या परिसराचा समावेश आहे.म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्हयाच्या सिमेवर असलेल्या भागांचा समावेशही या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे आणि हा भाग जैवविविधतेच्या संपन्न पट्‌ट्यात मोड्तो हे विशेष.

या व्याघ्र प्रकल्पामुळे इथली जैवविविधता अधिक सुरक्षित राहण्यास मदत होत आहे. मानवी जीवनासाठी पोषक असलेल्या पर्यावरणासाठी ही पावलं महत्वाची ठरणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राचा विचार करता वेळोवेळी इथे वाघाचे अस्तित्व असल्याचे गेल्या १०० वर्षाचे पुरावे आहेत. निसर्ग प्रेमींच्या अनुभवातून आणि वन्यजीव विभागाच्या गेल्या 25 वर्षाच्या माहिती प्रमाणे वाघांचे अस्तित्व या भागात असल्याचे दिसून येते. 


जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न असलेले हे क्षेत्र निम सदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार असलेले, डोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे.तथापि, त्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टिने वनविभागामार्फ़त प्रयत्न केले जाणार आहेत.पश्चिम घाटात असलेल्या तीनही अभयारण्याला जोडणारे कॉरीडॉर्स नकाशावर व जागेवर आखणे आणि तेथील क्षेत्राचे संरक्षण करणे इत्यादी बाबी आता सहज शक्य होणार आहे.

पश्चिम घाटातील वनस्पती संपदा पाहिली तर जवळपास साडेचार हजार प्रजाती, त्यापैकी १७२० प्रजाती स्थानिक व दुर्मिळ, ४०९ वृक्षांच्या प्रजाती , त्यापैकी ३०८ प्रजाती दुर्मिळ , ऑर्किड फ़ुलांच्या २४५ प्रजाती, त्यापैकी ११२ स्थानिक दुर्मिळ, रानतेरडा वनस्पतीच्या ७२ प्रजाती, कंदीफ़ुलाच्या ४६ प्रजाती, कारवीच्या १८ प्रजाती आढळून येतात. तर प्राणि संपदेत ३१५ प्रजाती, सस्तन प्राणी ६३, स्थानिक १२,पक्षी ५०० प्रजाती, त्यापैकी २३ स्थानिक,सरपटणारे प्राणी १६५, त्यापैकी ८९ स्थानिक, उभयचर प्राण्यांच्या ११७ प्रजाती, त्यापैकी ८७ स्थानिक, माशांच्या १०४ जाती इथे आढळून येतात. यावरुन हा प्रदेश किती प्रकारच्या जीवांचे निवास आहे, हे यावरुन दिसून येते.

पश्चिम घाट वन पर्यटकांना आणि वन्यजीव अभ्यासकांबरोबरच जैवविविधतेचा अभ्यासकांसाठी नवी पर्वणी ठरणार आहे. महाराष्ट्र हा गड किल्यांचा,धार्मिक स्थळांचा,सागरी पर्यटनाचा आणि आता जैवविविधतेचा जागतिक मान्यता असलेला प्रदेश आहे. जागतिक वारसा यादीत आपले हे ठिकाणं समाविष्ट करण्यात आले हा आपलाही बहुमान आहे पण तो टिकवून ठेवण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. हे टिकवून ठेवण्याचे काम स्थानिक जनतेच्या बरोबर तिथे जाणा-या पर्यटकांचेही आहे. 

युवराज पाटील, सहायक संचालक, पुणे 

No comments:

Post a Comment