पावसपासून १८ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. इथली सूर्यनारायणाची मूर्ती ९०० वर्षापूर्वीची आहे. मंदिरात मूर्ती कशी आली याबाबत या परिसरात दंतकथा प्रचलित आहे. काठेवाडीतील वेराळ बंदरातून मालवाहू नौकेत ही मूर्ती होती. कशेळीच्या किनाऱ्याजवळ आल्यावर जहाज पुढे जात नसल्याने नावाड्याने मूर्ती किनाऱ्यावर आणून ठेवली आणि जहाज सुरू झाले. गावात राहणाऱ्या कनकाबाई या सुर्योपासक महिलेला स्वप्नात मूर्तीची माहिती मिळाली आणि तिने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ज्या गुहेत ही मूर्ती सापडली त्या गुहेला 'देवाची खोली' नाव पडले आणि कनकेचा आदित्य (सूर्य) म्हणून यास 'कनकादित्य' असे संबोधले जाते. कनकादित्याची काळ्या पाषाणातील मूर्ती नजरेत भरण्यासारखी आहे.
बाराव्या शतकात गोविंद भट्ट भागवत कनकादित्यचे पुजारी होते. त्यांची किर्ती ऐकून पन्हाळगडचा शिलाहारराजा शके १११३ मध्ये संक्रांतीच्या दिवशी समुद्रस्नानासाठी कशेळीला आला असताना त्याने ब्राह्मण भोजनासाठी गाव इनामात दिला, असे वर्णन करणारा ताम्रपट मंदिरात आहे. ताम्रपटातील तारखेवरून त्याविषयी विविध मते व्यक्त करण्यात येतात. मंदिराचा परिसर शांत आणि रम्य आहे. जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांची मंदिरे तेवढीच सुंदर आहेत. मंदिरात प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपात लाकडावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांनी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची आठवण म्हणून हा आकर्षक सभामंडप बांधून दिला,असा उल्लेख येथे पाहायला मिळतो. मंदिराच्या परिसरातील जुन्या पद्धतीची विहीरदेखील भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभोवती चिरेबंदी पोवळी आहे. देवालयाच्या छतावर तांब्याचा पत्रा आहे. उत्सवासाठी एका बाजूला मंच असून उत्सवात विविध कार्यक्रम येथे होतात. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराजवळील तुळशीवृंदावनाची रांग मंदिराच्या पवित्र्यात भर घालणारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील स्वारीच्यावेळी कशेळी गावाला भेट दिल्याचे स्थानिकांकडून ऐकायला मिळते. बॅ.नाथ पै यांच्या सभा मंदिर परिसरात झाल्याचे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आवर्जुन सांगतात. माघ शु.सप्तमी ते माघ शु.एकादशी असा पाच दिवस रथसप्तमीचा उत्सव मंदिरात थाटात होतो. यावेळी सभामंडपाची सजावट नजरेत भरण्यासारखी असते. मंदिराचे विश्वस्त आडिवरे येथील महाकालिला प्रथम आमंत्रण देतात. आडिवरे येथील खोत मंडळी देवीला वाजतगाजत कशेळीला आणतात. माघ शु. षष्ठीला आडिवरेची महाकाली मध्यरात्रीपर्यंत कशेळीला येते. कशेळीचे ग्रामस्थ तिचे स्वागत करतात. रात्री देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी विधीवत पूजा होऊन उत्सवाला सुरूवात होते. उत्सवा दरम्यान कीर्तन, प्रवचन, पालखी, प्रदक्षिणा, नाटक आदी विविध कार्यक्रात परिसरातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात.
शांत आणि रमणीय परिसरात मंदिर उभारले असल्याने येथे आल्यावर भाविकांचे पाय सभामंडळात रेंगाळतात. कनकादित्याच्या तेजोमय मूर्तीचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं. मंदिराच्या आवारात असणारी मोकळी हवा या आनंदात भर टाकते. शुद्धता आणि पावित्र्याचा मंत्र घेऊनच भाविक परतीच्या प्रवासला लागतात.
No comments:
Post a Comment