Tuesday, July 17, 2012

कोकमची बाग

साता समुद्रापार पोहोचलेली कोकम कढी अर्थात सोलकढी ज्या फळापासून तयार केली जाते असे बहुगुणी कोकमाचे कोकणात प्रामुख्याने पीक घेतले जाते. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात कोकमची झाडे नारळ, सुपारीच्या परसबागा या डोंगर नदी किनारी नैसर्गिकरित्या वाढलेल्या आढळतात. या झाडांची लागवड शास्त्रीय पध्दतीने केल्यास शेतक-यांना त्याचा फायदा होतो यासारख्या अनेक बाबींची मला माहिती होती पण हे सारे पुस्तकी ज्ञान. प्रत्याक्षात कोकमचे झाड कसे असते याला फळ कसे येते असे नानाविध प्रश्न मनात होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आयतीच संधी मिळाली. खास या विषयाची माहिती घेण्यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हयाचा पाहणी दौरा केला.

खरंतर कोकम हे सतत हिरवेगार असलेले झाड आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये विषुवृत्तीय हवामान असलेल्या भागात हे झाड वाढतांना दिसून येते. पश्चिम घाट, कूर्ग, वेनाड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात या पिकांपासून पारंपारिकरित्या उत्पन्न घेतले जाते. सिंधुदुर्गात बहुतांश शेती व बागायती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.या भागात काळाची गरज म्हणून कोरडवाहू फळझाड लागवड करणे फायदयाचे ठरते.

सिंधुदुर्गात आजपर्यंत कोकमची लागवड बियांपासून केली जात असे. परंतु, कोकण कृषी विद्यापीठाने या पिकाची मृदुकाष्ट कलमाव्दारे अभिवृध्दी करण्याची पध्दत प्रमाणित केल्यापासून आता या पिकांची कलमे तयार करणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने कोकमची अमृता कोकम, कोकम हातिष या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. विद्यापीठामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये या जातीची कलमे उपलब्ध आहेत. फळातून बिया काढल्यानंतर स्वच्छ धुवून प्लॅस्टिकच्या माती आणि शेणखत ३.१ या प्रमाणात घेऊन भरलेल्या पिशवीत रुजत घातली जातात. बिया रुजत घालण्यापूर्वी दोन दिवस पाण्यात भिजत ठेवल्यास रुजवा लवकर तयार होतो. कोकमची रोपाव्दारे लागवड करावयाची असल्यास १ वर्षाची रोपे जमिनीत कायमच्या ठिकाणी लागवड करण्यासाठी वापरण्यात येतात. कोकमच्या रोपांमध्ये साधारणत ५० टक्के नर व ५० टक्के मादी रोपे तयार होतात.म्हणून खात्रीशीर व चांगल्या जातीची रोपे लावण्यासाठी कलम पध्दतीचा वापर करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात डिसेंबर ते जानेवारी महिन्यात भेट किंवा मृदुकाष्ट कलमे केल्यास मोठया प्रमाणात यशस्वी होतात.

कोकमच्या लागवडीसाठी मे महिन्यात शेतातील किंवा डोंगरातील झाडे-झुडपे काढून टाकली जातात. दोन रांगांतील अंतर ७ मीटर तसेच २ झाडातील अंतर ७ मीटर राहील यानुसार चांगले खड्डे खणले जातात. त्यानंतर शेणखत व माती यांच्या चांगल्या मिश्रणाने हे खड्डे बुजवून घेतले जातात.पावसाळ्याच्या सुरुवातीस सुधारित कोकमच्या कलमांची निवड करून लागवड केली जाते. सुरुवातीला काही महिने लागवड केलेल्या रोपांना काठीचा आधार दयावा लागतो. सिंधुदुर्गात आंब्यांच्या, काजूच्या किंवा नारळाच्या बागेत आंतरपीक म्हणूनही कोकमच्या सुधारित जातींची लागवड शक्य आहे. शेतक-यांनी पारंपारिक दृष्टीकोन बाजूला ठेवून कोकम उद्योगाकडे एक फायदेशीर व्यवसाय म्हणून पहाणे आवश्यक आहे.

बाजारात कोकम फळापासून मिळणा-या अनेक पदार्थांना चांगला भाव आला आहे. घाऊक बाजारामध्ये हिरवी कोकम फळे सुकवून तयार केलेले दोडे ३० रुपये किलो,प्रक्रिया न केलेले कोकम ५० रूपये किलो, कोकम बी ७० रुपये किलो, कोकम, आगूळ ६० रूपये लीटर, प्रक्रिया केलेले कोकम ६० रुपये किलो या दराने विकत घेतले जाते. अशा प्रकारे कोकम हे एक प्रकारे शेतक-यांना वरदान ठरणारे असेच फळ आहे.याची शास्त्रीय पध्दतीने लागवड केल्यास त्याचा फायदा नक्कीच शेतक-यांना होवू शकतो.

कोकम हे फळ बहुपयोगी असून मानवी आहारात व औद्योगिक क्षेत्रात त्यास महत्व प्राप्त झाले आहे. आहारामध्ये कोकम फळाचा उपयोग प्रक्रियाकरून चिंचेप्रमाणे भाजी,आमटी, रस्सा, सोलकढी तसेच मत्स्यहारामध्ये केला जातो. हिरव्या कोकम फळाचे दोन ते चार तुकडे करून वाळविले जातात. तसेच पक्व कोकम फळाच्या वाळलेल्या सालींवर पारंपरिकरित्या प्रक्रिया करून कोकम सोलल तयार केले जाते. या कोकम सोलला बाजारात चांगली मागणी आहे. पक्व फळापासून कोकम सरबत हे स्वादिष्ट पेय तयार करता येते. सिंधुदुर्गात पर्यटन व्यावसायिकांकडून पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी कोकम सरबतचा सर्रास वापर केला जातो. कोकम सोलपासून तयार करण्यात येणा-या कोकम कढीने तर कोकणचे नाव साता-समुद्रापार नेले आहे.

कोकम हे फळ काही ठिकाणी मासे टिकविण्यासाठी, रबराचा चिक गोठविण्यासाठी आणि टॉनिक तसेच इतर औषधे बनविण्यासाठी वापरले जाते. त्यात असणारी आम्ल द्रव्ये पोटाचे विकार, अंगदुखी, ह्दय रोग यावर परिणामकारक असतात. कोकमाच्या बियांमध्ये २६ ते २७ टक्के इतके तेल असते. या तेलाला कोकम बटर असे म्हंटले जाते. ते नेहमीच्या तापमानाला मेणासारखे घट्ट रहाते. ग्रामीण भागात कोकमच्या बियांपासून निघणा-या तेलाचे मुठयालल तयार करून वापरले जाते. या तेलाचा उपयोग उद्योगक्षेत्रात चॉकलेट, मिठाई निरनिराळी औषधे, मलमे आणि सौंदयप्रसाधने तयार करण्यासाठी वापरतात. थंडीमध्ये ओठ, हात, पाय फुटू नयेत म्हणून या तेलाचा ग्रामीण भागात उपयोग केला जातो. तेल काढून उरलेली पेंड जनावरांचे खाद्य म्हणून वापरात येते. कोकम तेल निर्यात करून परकीय चलन मिळविण्यासाठी कोकम लागवड चांगला हातभार लावू शकेल.


  • संध्या गरवारे
  • No comments:

    Post a Comment