पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आजूबाजुला सर्वत्र पाणी साचुन राहील्याने या दिवसांमध्ये काही विशिष्ठ आजार उद्भवण्याची शक्यता असते. नदी, नाल्यातील तसेच साचलेल्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याचा धोका असतो. त्यामुळेही आजारांचा धोका संभवतो. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे जलजन्य आजार या दिवसात साधारणत: पसरण्याची भिती असते. योग्य काळजी घेतल्यास तसेच आरोग्य विभागाने सुचविलेल्या उपाययोजना राबविल्यास या आजारांपासुन दूर राहणे शक्य होते.
पावसाळ्यातील हे आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून पिणे आवश्यक आहे. जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, उघड्यावरील अन्न पदार्थ आणि शिळे अन्नपदार्थ खावु नये. यासारख्या बाबींकडे लक्ष दिल्यास जलजन्य आजारांपासून दुर राहता येवू शकते.
जलजन्य आजाराची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कॉलरा हा जलजन्य आजार उद्भवू शकतो. हा आजार व्हिब्रीओ कॉलरा या विशिष्ट जिवाणूमुळे होतो. या आजारात प्रथमत: जुलाब सुरु होतात व त्यानंतर उलट्यांमुळे रुग्ण त्रस्त होतो. गॅस्ट्रो हा जलजन्य आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणू आणि विषाणुमुळे होतो. या आजाराची लागण झाल्यास उलट्या व जुलाब एकाचवेळी सुरु होतात. अतिसार हा आजार जिवाणू आणि विषाणूमुळे होतो. या आजारात प्रामुख्याने जुलाब होतात. या तीनही आजारांची सदर लक्षणे जाणवल्यास तातडीने नजिकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा. हे आजार टाळता येवू शकतात.
आजाराची ही लक्षणे आढळल्यास प्राथमिक स्वरुपात ओआरएस चे पाणी पिणे फायदेशीर ठरते. ओआरएस उपलब्ध नसल्यास भाताची पेज, सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी आदी भरपुर प्रमाणात सेवन करावे.
हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी सेवन होणारे पाणी शुध्द असणे अतिशय आवश्यक आहे. गावातील नळ योजनेच्या पाईपलाईनची गळती असल्यास तसेच नळयोजनेचे नळ, हातपंप, विहीर आदींच्या ५० फुट आसपास घाण, चिखल, अस्वच्छता होवू देवू नये. अशी अस्वच्छता आढळल्यास ती तात्काळ दूर करणे फायदेशीर ठरते. तसेच हे आजार टाळण्यासाठी वैय्यक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असते. उघड्यावर शौचास बसणे टाळले पाहिजे तसेच शौचावरुन आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. उघड्यावरील व माश्या बसलेले अन्न खालल्याने आजारांचा संसर्ग होण्याची भिती असते त्यामुळे अशा प्रकारचे अन्न टाळणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment