शाळांमध्ये विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही चिंताजनक बाब होती. ही उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. तथापि ही केवळ शासनाची जबाबदारी न मानता पुढाकार घेणाऱ्या समाजाचे उदाहरण परभणी जिल्ह्यात पहावयास मिळाले आहे.
तांडा म्हाणजे गावापासून दूर असलेली वस्ती. शिक्षणाचे कमी प्रमाण. ऊसतोड कामगारांची मुले कारखाना सुरु झाला की गाव सोडून जातात. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या आणि शाळेत शंभर टक्के उपस्थितीपट ठेवण्याचे शिक्षकांसमोरील आव्हान पेलत परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण तांड्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक बी.डी.शिंदे, एस.व्ही.सिद्धेश्वरे, एस.के.इंद्राळे या शिक्षकांनी गावात शिक्षणाचे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष वापरामुळे कोणतेही ज्ञान-कौशल्य लवकर आत्मसात होते. यादृष्टीने संगणक हे आपल्याला आधुनिक जगाशी जोडणारे प्रभावी साधन आहे. संगणकाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून ते स्पर्धेच्या युगात धाडसीपणे वावरू शकणार आहेत. यामुळे आजच्या संगणकाच्या युगात शालेय विद्यार्थ्यांना संगणकाची जवळून ओळख होणेही गरजेचे आहे. मुलांच्या मनातील संगणकाची भीती घालविण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने हाताळणी केली जाणे देखील आवश्यक असते.
ही गरज लक्षात घेऊन या शाळेत शिक्षकांच्या सहकार्याने ३५ हजारांची लोकवर्गणी जमा करून शाळेला संगणक भेट देण्यात आला आहे. संतराम लक्ष्मण राठोड यांनी शाळेच्या नवीन इमारतीसाठी चार गुंठे जमीनही दान केली आहे. या माध्यमातून तांड्यांवरील नागरिकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा कौतुकास्पद प्रयत्न झाला आहे.
No comments:
Post a Comment