Tuesday, July 24, 2012

'निसर्ग वाचन'

कोकणातील दाट वनराईने नटलेल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील प्रत्येक वाडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे कार्य सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून केले जात आहे. डोंगराच्या कुशीतील हिरव्यागार परिसराने वेढलेल्या शाळेला भेट दिल्यावर इथल्या शैक्षणिक वातावरणाचा हेवा वाटतो. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नाते जन्मापासूनच जोडले गेले असल्याने पर्यावरण विषयाबद्दल त्यांना अधिक जाणून घेण्याची इच्छा असतेच. सभोवती जंगल असलं तरी त्यात प्राणी नसल्याने वाघोबाची त्यांची भेट तशी पुस्तकातच.

डिस्कव्हरी, नॅशनल जॉग्राफीक अशा वाहिन्यांपासून दूर असल्याने वाघोबा, कोल्होबा, जंगलचा राजा सिंह, हे सगळे केवळ त्यांच्या गोष्टीतील पात्र. त्यांचं विश्व कसं असेल, ते काय खात असतील, कुठे राहत असतील, असे प्रश्न बालसुलभ मनाला पडणं स्वाभाविकच. त्यांच्या मनातले हे प्रश्न ओळखून रत्नागिरी जिल्ह्यातील राजवाडी येथीली 'पेम' संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'निसर्ग वाचन' हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

वरिष्ठ पत्रकार सतिश कामत आणि उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत गावडे यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शनिवारी पालकमंत्री महोदयांच्या दौरा कार्यक्रमाच्या निमित्ताने गुहागरला जाताना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अशाच एका कार्यक्रमाला उपस्थित राहता आले.

मध्यान्ह भोजनाची वेळ झालेली तरी 'पिक्चर' पाहायला मिळणार म्हणून बालगोपालांची सेना अगदी शांत बसून होती. काही विद्यार्थी स्वयंसेवक होऊन कार्यक्रमाच्या तयारीत उत्साहाने सहभागी झाले होते. पडद्यावर काय दिसणार याची फारशी कल्पना त्यांना नव्हती. 'जंगलात फिरायला जायचंय' एकाची लाजतच प्रतिक्रिया. सरपंच प्रकाश रांजणे देखील उत्साही. स्वत: पदवीधर असल्याने मुलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यामुळे वेळेपूर्वी तेदेखील हजर झालेले. शाळा व्यवस्थापनाकडून पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्यावर कार्यक्रमाला सुरूवात झाली.

वर्गाच्या खिडक्या बंद झाल्या. अंधारात भितीवरील पडद्यावर प्रकाशझोत आला आणि त्यातून परिवर्तित होणाऱ्या किरणांनी समोरच्या अनेक चकाकणाऱ्या डोळ्यातील उत्सुकता शिगेला गेल्याचे स्पष्ट दिसत होते. कामत यांचे प्रास्ताविक आणि प्रश्न सुरू झाले. वाघ पाहायचा का, जंगलाची सफर आवडेल का, काय पाहिलं ते घरी सांगायचं, लहान टिपण केलं तर पुढच्या महिन्यात परत येईन...आणि एकदाचा माहितीपट सुरू झाला. समोरचे चित्र पाहिल्यावर वाघ..सिंह..अस्वल..ससा..असे शब्द मुलांच्या तोंडातून बाहेर पडत होते. तर एकीकडे कामत यांचे धावते समालोचन सुरू होते. त्यांनी संशोधक डेव्हीड ऍ़टनबरो यांना 'डेव्हीड काका' बनविले. हे डेव्हीड काका..ते बघा वाघाच्या किती जवळ गेले...मांजरीला वाघाची मावशी का म्हणतात...हे प्राणी सायबेरीयातच आढळतात...त्याचे कान पहा कसे हालतात ते...आणि मधूनच फिल्म पॉज करून ते मुलांना प्रश्न विचारित. माहिती देत..पुन्हा फिल्म सुरू...

पन्नास मिनिटाच्या वेळात मांसभक्षी प्राण्यांविषयी माहिती त्या माहितीपटाच्या माध्यमातून मुलांना मिळाली. हसतखेळत मुलांनी तो माहितीपट पाहिला. अगदी 'एन्जॉय' केला म्हटलं तरी चालेल. माहितीपट संपल्यावर मुलांमध्ये त्यातील प्राण्याविषयी चर्चा सुरू झाली. उपक्रम यशस्वी झाल्याची ती पावती होती. आवडलं का, या प्रश्नाला जोरदार आवाजात 'हो' असं उत्तर मिळालं. मुलांना हसतखेळत निसर्गाची माहिती देणारा हा उपक्रम खुपच सुंदर वाटला. हा उपक्रम सुरू करण्यासाठी डॉ.राजेंद्र जगदाळे यांनी सॉफ्टवेअर दिले आहे तर पुण्याच्या परिमल चौधरी यांनी एलसीडी प्रोजेक्टर आनंदाने दिले. राजवाडी परिसरातील पाच शाळांमध्ये प्रत्येक महिन्याला एक माहितीपट दाखविण्यात येणार आहे.

वर्गाबाहेर पडतांना आपल्याला आता 'पोटोबा' करायचा आहे, हेदेखील काही क्षण मुले विसरली. नेहमी ताटली घेण्यासाठी रांग लावणारी मुले सिंह काय डेंजर होता...किती बर्फ होता...अशी एकमेकांना प्रतिक्रीय देत होती. चिमुकला आदित्य खुष होता. कारण त्याला वाघोबा भेटला होता. ही भेट घडविण्यासाठीच हा उपक्रम होता.


  • डॉ.किरण मोघे
  • No comments:

    Post a Comment