दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटूंबाला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याची किमया सुवर्ण जयंती शहरी स्वयंरोजगार योजनेने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे घडवून आणली आहे. या योजनेमुळे उपलब्ध झालेल्या रोजगारातून संतोष रायजी हिंगमीरे या बेरोजगार तरुणाने दरमहा दहा हजार रूपयांपर्यंत उत्पन्न मिळवून दारिद्र्यरेषा ओलांडली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे राहत असलेल्या संतोष हिंगमीरे यांचे कुटूंब दारिद्र्यरेषेखाली होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू ठेवले होते. प्रथम किराणा दुकानात सामान्य नोकर म्हणून त्यांनी नोकरी स्विकारली. यातून त्यांना जेमतेम वेतन मिळू लागले. परंतु या व्यवसायाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना भविष्यात उपयोगी पडली. आठवड्यातला एक दिवस सुटी असल्याने त्यांनी या सुटीच्या दिवशी ग्राहकांना घरपोच किराणा माल पोहचविण्याचे काम सुरू केले. यामधूनच त्यांना किराणा माल घरपोच पोहचविण्याचा सेवा उद्योग स्वत: सुरू करण्याची संकल्पना सूचली.
नगर परिषदेमार्फत हिंगमीरे यांनी सन २००३ मध्ये ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना घरगुती कामे करण्यास वेळ मिळत नाही, अशा गरजू ग्राहकांशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून किराणा मालाची यादी घेऊन तो माल दुचाकीने ते घरपोच पोहचवू लागले. सुरूवातीला त्यांनी १५ ग्राहकांकडे ही सेवा सुरू केली. प्रामाणिक व मनमिळावू वृत्तीमुळे त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला.
या घरपोच सेवा उद्योगासाठी त्यांना भारतीय स्टेट बँकेच्या उमरखेड शाखेने सन २००५ मध्ये ६० हजार रुपये कॅश क्रेडीट लोन दिले. कर्जाची परतफेड नियमितपणे सुरू असल्याने बँकेचा विश्वास वाढला. त्यामुळे सन २००७ मध्ये याच बँकेने अतिरिक्त ४० हजार रुपये कर्ज दिले.
या सर्व परिश्रमामुळे आज हिंगमीरे यांचे उमरखेड शहरात स्वत:चे किराणा दुकान आहे. या दुकानाच्या कामकाजात त्यांची पत्नी हातभार लावते. त्यांची दोन मुले व एक मुलगी शिक्षण घेत आहेत. या घरपोच किराणा माल सेवा उद्योगामुळे हिंगमीरे यांना महिन्याला सात हजार रुपये तसेच किराणा दुकानात विक्री होणाऱ्या मालातून तीन हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये मिळतात.
प्रारंभी केवळ बाराशे रुपये उत्पन्न असलेल्या हिंगमीरे यांनी शासकीय योजनेच्या मदतीमुळे आणि स्वत:च्या परिश्रमाने दरमहा दहा हजार रुपये उत्पन्नापर्यंत मजल मारली असून यामुळे त्यांच्या कुटुंबाने दारिद्र्यरेषा ओलांडली आहे.
No comments:
Post a Comment