Tuesday, July 10, 2012

सेंद्रीय शेतीद्वारे परिस्थितीवर मात

चूल आणि मूल इतकेच मर्यादित कार्यक्षेत्र समजल्या जाणाऱ्या महिलांनी कर्तृत्वाच्या बळावर ज्ञान, विज्ञान तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. रणरागिणींचा असाच गौरवपूर्ण वारसा जपणाऱ्‍या महिलांमध्ये अकोला जिल्ह्यातील आदर्श गाव गोर्धाच्या ज्योती पागधुने यांचाही समावेश होतो. कधीकाळी परिस्थितीशी झगडणाऱ्‍या ज्योती यांनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून परिस्थितीवर मात केली आहे. कोणत्याही वेगळ्या खर्चाशिवाय त्यांनी कपसाचे एकरी चार क्विंटल एवढे उत्पादन मिळविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल डिस्कवरी या वाहिनीने घेतली आहे.

राष्ट्रसंतांच्या संकल्पनेतील आदर्श गाव म्हणून तेल्हारा तालुक्यातील गोर्धा गावाने ओळख मिळविली. ७४८ लोकवस्तीच्या या गावात १९४८ चा अपवाद वगळता आजवर ग्रामपंचायत निवडणूकच झाली नाही. येथे सामंजस्यातून ग्रामपंचायत सदस्य व सरपंचाची निवड होते. ग्रामस्वच्छता अभियानातदेखील गावाने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. ग्रामविकासाचा असा गौरवशाली इतिहास असलेल्या या गावातील ज्योती पागधुने या विधवा महिलेने शेती व पूरक व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ज्योती यांचे हे प्रयत्न हातावर हात धरुन रडत जीवन कंठणाऱ्‍यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहेत.

ज्योती यांचे पती व गोर्धा गावचे पोलीस पाटील गोपाल रामदास पागधुने यांचा आजारापणामुळे लग्नानंतर काही दिवसातच मृत्यू झाला. वयाच्या चोविसाव्या वर्षी वैधत्व आलेल्या ज्योतीताईंवर आभाळ कोसळले. दोन मुले व दोन दीरांची जबाबदारी त्यांच्यावर होती. या धक्यातून स्वत:ला सावरत त्यांनी परिस्थितीशी दोन हात करण्याचा निश्चय केला. मुलांच्या भविष्याचा विचार करुन त्यांनी दोन्ही मुलांना अकोल्यात भावाकडे पाठवून चांगल्या शाळेत दाखल केले. या मुलांचा सांभाळ करणाऱ्‍या त्यांच्या भावाचा दुदैवी मृत्यू झाला. त्यानंतर मोठ्या भावाने त्यांच्या मुलांचा सांभाळ केला. सासरी राहत कौटुंबिक जबाबदारी सांभाळणाऱ्‍या ज्योतीताई खचल्या नाहीत. त्यांच्या सासरी कोरडवाहू शेती होती. सासऱ्‍यांसोबत या शेतीत राबणाऱ्‍या ज्योतीताईंनी गावात कृषी विभागाद्वारे आयोजित शेतीशाळेच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे धडे घेतल्यानंतर सेंद्रीय भाजीपाला उत्पादनाचा निर्णय घेतला. 

तत्कालिन जिल्हाधिकारी एकनाथ डवले, अकोटचे तत्कालिन तालुका कृषी अधिकारी कुवरसिंह मोहने, अशासकीय संस्थेचे संजय रोमन, राजेश तिवारी यांच्याकडून मार्गदर्शन घेत ज्योतीताईंनी शेती क्षेत्रात बायोडायनामिक पद्धतीचा अवलंब केला. घरी असलेल्या सात गुरांच्या माध्यमातून मिळणाऱ्‍या शेणाचा वापर सेंद्रीय शेतीत केला. तत्पूर्वी परिसरातील काही सेंद्रीय शेती कसणाऱ्यांणचे प्रयोग त्यांनी अनुभवले. परिणामी २००७ मध्ये कोणत्याही जादा खर्चाविना त्यांनी एकरी चार क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले. ज्योतीताईंच्या या सेंद्रीय कपाशीला बाजारभावापेक्षा ३०० रुपयांचा अतिरिक्त दर मिळाला. त्यांनी एकरी दहा क्विंटल गहूही घेतला. गव्हाला लागणारे पाणी त्यांनी दुसऱ्‍याकडून खरेदी केले. ज्योतीताईंची धडपड व प्रयोगशीलता पाहता त्यांना कृषी विभागाकडून निम पल्वलायझर यंत्र अनुदानावर मिळाले. त्या माध्यमातून निंबोळी पावडर तयार करुन त्या त्याची विक्री करतात. त्यांनी यावर्षी एस-९ कल्चरची दहा हजार रुपयांची विक्री केली. या शेतीपूरक व्यवसायातून मिळणाऱ्‍या पैशांवर कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविणे शक्य होते, असे त्या सांगतात. 

दूध देणाऱ्‍या गायीचे ६० किलो शेण व त्यात बायोडायनामिक मदर कल्चर (२५० रुपये किलोप्रमाणे सर्ग विकास समितीकडून पुरवठा होणारे) मिसळून शेणमातीच्या कुंडात ६० दिवस ठेवले तर ३० ते ३५ किलो एस-९ कल्चर तयार होते. ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्मा, नत्र, स्फुरद, पालाश (एनपीके) यासारख्या उपयुक्त जीवाणूंचे एकत्रित मिश्रण म्हणजे एस-९ कल्चर होय. या एस-९ कल्चरची ज्योती पागधुने ७५ रुपये प्रती किलो दराने विक्री करतात. गावातील शेणखत व शेतातील पऱ्‍हाट्या, तुराट्या गव्हांडा, पालापाचोळा यांचे कंपोस्टिंग (कुजविण्याकरिता) करण्याकरिता एस-९ कल्चर वापरतात. त्याच्या वापराने महिनाभरात शेतकामात उपयोगी सेंद्रीय घटक तयार होते.

तरलखाद : गोमुत्र, शेण बायोडायनामिक ऊर्जा (हिमाचल प्रदेशातील बिच्छू नामक गवताचा पाळलेला पाला), कडुलिंबाचा पाला, बेशरमचा पाला व रुई, सुबाभुळीचा पाला, द्विदल धान्याचा पाला, शेतातील तण व उपयुक्त जीवाणू (एस-९ कल्चर) चे मिश्रण याचा वापर तरलखाद तयार करण्याकामी केला जातो. अशाप्रकारे तयार होणारे तरलखाद फवारल्यास किडीपासून संरक्षण होण्यासोबतच व पिकाच्या वाढीसाठी टॉनिक म्हणूनही याचा उपयोग होतो, अशी माहिती माजी तालुका कृषी अधिकारी कुंवरसिंह मोहने यांनी दिली. बीज प्रक्रियेकामी देखील या घटकाचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

ज्योतीताईंचा संघर्ष डिस्कव्हरीवर : राखेतून नव्या जीवनाची उभारी घेणाऱ्या ज्योती पागधुने यांची संघर्षगाथा ऐकून त्यांच्या सेंद्रीय शेती प्रकल्पाला देश-विदेशांतील अनेक तज्ज्ञांनी भेट दिली. त्यापैकीच एक असलेल्या स्वीडनचे डॉ.वॉल्डेन यांनी ज्योतीताईंच्या संघर्षगाथेवर माहितीपटच तयार केला. या माहितीपटात कुंवरसिंह मोहने यांनी इंग्रजी संवाद दिले असून, डिस्कव्हरी वाहिनीवर हा माहितीपट प्रसारित होणार आहे.

No comments:

Post a Comment