Friday, July 6, 2012

स्वसामर्थ्यातून समृद्धी

अनुदान नको पण बँकेचे कर्ज विनासायास मिळावे, त्याची परतफेड आम्ही न चुकता करू, असा संकल्प गिराटा या गावाने दोन वर्षापूर्वी केला. पॅकेजला नकार देत, कोणत्याही प्रकारच्या अनुदानाचा लाभ न घेता, या स्वाभिमानी गावाने स्वयंप्रेरणेनेतून आणि स्वसामर्थ्यातून समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 

वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गिराटा हे दुर्गम भागात वसलेले गाव. सातशे लोकवस्तीच्या या गावात भिलखेड गट ग्रामपंचायत आणि बंजाराबहुल लोकवस्ती. प्रकाश पांडुरंग राठोड हे गावातील एकमेव उच्चशिक्षीत तरुण. शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यानंतरही प्रकाश राठोड गावाला विसरले नाहीत. आपण गावाचे काहीतरी देणे लागतो, या विचाराने गावाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी कृषीक्षेत्रात परिवर्तन घडविण्याचा निश्चय केला. 

पीक कर्जासाठी घेण्यात आलेल्या दहा लाख रुपयांची परतफेड या गावाने न चुकता केली. गावात एकही थकित कर्जदार नसणे, हे या गावाचे वैशिष्ट्य होते. हे लक्षात घेऊन प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी संत सेवालाल महाराज शेतकरी बचतगटाची स्थापना केली. बिकट परिस्थितीत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शासनाने पॅकेज जाहीर केले असताना या गावातील शेतकऱ्यांनी पॅकेजची मदत नाकारुन बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी जीवनाची कास धरली. सगळीकडे कर्जमाफीचे वारे वाहत असताना आम्हाला कर्जमाफी नको, अन् पॅकेजही नको असे सांगण्याची हिम्मत या गावाने दाखवली. 

बचतगटाच्या माध्यमातून समृद्धीचा नवा मार्ग या गावाला सापडला आहे. शेती आणि जोडधंद्यातून या गावाच्या विकासाची वाट अधिक सुकर झाली आहे. बँकेकडून बचतगटाच्या शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज विनासायास मिळावे, एवढीच या गावाची अपेक्षा आहे. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्यात त्यांनी पॅकेज नाकारत सुलभ कर्जाची मागणी केली. हेच निवेदन त्यांनी शेंदूर्जना येथील स्टेट बँकेतही दिले. तत्कालिन शाखा व्यवस्थापक शेखर नटराजन यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत आणि कुठलाही त्रास न देता शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाकरिता ४० हजार रुपयांचे कर्ज दिले. सेवालाल बचतगटाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. 

दोन म्हशींपासून सुरू झालेला हा उद्योग आज दोनशे म्हशींपर्यंत पोहोचला आहे. या माध्यमातून दररोज तीनशे ते चारशे लिटर दूध संकलन होते. ते ऑटो रिक्शाद्वारे जिल्ह्याच्या ठिकाणी १५ ते १८ रुपये भावाने विकले जाते. दरमहा दोन लाखांचा हा व्यवसाय महिन्याकाठी २५ हजारांचा नफा मिळवून देतो. हा नफा बचतगटातील सर्व सदस्य वाटून घेतात. पुरूष बचतगटांना या कामी महिलांच्या जगदंबा, जय भवानी, सामकीमाता या बचतगटांची मदत मिळते. दुग्धव्यवसायाचा आर्थिक लेखाजोखा हे महिला बचतगट पाहतात. आज या सर्व बचतगटाच्या मालकीची वाशिम येथे तीन दुकाने आहेत. बचतगटाच्या मालकीचे फ्रिजर, ऑटो आणि ट्रॅक्टरही आहे. या बचतगटाने गावात पशुखाद्य केंद्रही सुरू केले आहे. अदिलाबाद येथून सातशे रुपये क्विंटल प्रमाणे पशुखाद्य आणून आठशे रुपये क्विंटलने त्याची विक्री केली जाते. पूरक उद्योगामुळे शेणखत आणि गावातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गावातील अरुणावती नदीवरील सिंचन प्रकल्पाचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने कपाशी, सोयाबीन, भुईमूग, गहू, ऊस, सिमला मिरची अशी विविध व्यावसायिक पिके येथील शेतकरी घेतात. 

भारतीय स्टेट बँकेच्या शेदूर्जना आढाव शाखेने ग्रामनिवास योजनेअंतर्गत गिराटा येथील शेतकऱ्यांना अडीचशे घरे बांधून देण्यासाठी हे गाव दत्तक घेतले आहे. बँकेच्या शाखेने या गावातील सर्व शेतकऱ्यांचा तीन कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. बचतगट आणि दुग्धव्यवसायातून गिराटाचे शेतकरी दरमहा शंभर रुपयांची बचत करतात. गावातून दरमहा वीस हजार रुपयांची बचत बँकेत जमा केली जाते. सोबतच कर्जाचे हप्ते बँकेत नियमित जमा केले जातात. त्यामुळे या गावात एकही थकबाकीदार शेतकरी नाही, हे विशेष. ग्रामस्थांनी आपसातील कटुता बाजूला सारून बंधुभावाचा परिचय देत हे कार्य सिद्ध केले आहे. गिराटा येथील शेतकऱ्यांचा आदर्श इतर गावांनी घेतल्यास गावागावात विकासाची नवी पहाट उगवेल, यात शंका नाही.

No comments:

Post a Comment