Wednesday, July 4, 2012

चाकातिर्थने भागविली मालेगावकरांची तहान


वाशिम जिल्हयातील मालेगाव हे तालुक्याचे ठिकाण. येथे ग्रामपंचायत कार्यरत आहे. पुर्वीपासूनच पाणी टंचाईग्रस्त म्हणून मालेगाव परिचित आहे. दरवर्षी उन्हाळयात या शहराला भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवते. यावर्षी स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने नळयोजना कार्यन्वीत केल्यामुळे आज मालेगावकरांना चाकातिर्थ येथील प्रकल्पाचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

मालेगावसाठी पंचवीस वर्षापुर्वी कुऱ्हळा धरणावरुन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली होती. त्यावेळी गावची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास होती. आज ती पंचवीस हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. वाढती लोकसंख्या, कमी होत असलेले पर्जन्यमान आणि त्यामुळे जलस्त्रोतातील अत्यल्प जलसाठयामुळे मालेगावला एप्रिल, मे व जून महिन्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत होती. दहा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे, तसेच बऱ्याचवेळा जास्त पैसे देऊन सुध्दा पाणी विकत घ्यावे लागे.

पाणी टंचाई ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीमार्फत तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी, स्थानिक सरपंच व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी चाकातिर्थ व कुऱ्हळा धरणाची पाहणी केली. त्यावेळी कुऱ्हळा धरण ते चाकातिर्थ पाच कि.मी. पाईप लाईन टाकून मालेगाव नळ योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी १४.९० लक्ष रुपयाची मान्यता दिली.

चाकातिर्थ ते कुऱ्हळा धरणामध्ये युध्दस्तरावर पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु करुन पंधरा दिवसात ते पुर्ण करण्यात आले आहेत. माहे मे च्या पहिल्या आठवडयात ते काम पुर्ण होऊन पुर्वी बारा दिवसांनी येणारे नळाचे पाणी आता पाचव्या दिवशी नागरिकांना मिळत आहे. या योजनेमुळे टँकरसाठी होणारा शासनाचा मोठया प्रमाणातील खर्चही वाचला आहे. स्थानिक लोकांचे सहकार्य व लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि अधिकाऱ्यांची कार्य तत्परता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून योजना राबविण्यासाठी प्रयत्न झाल्यास योजना जलदगतीने पुर्ण होऊन त्याचा सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारे फायदा होतो. ही योजना तातडीने कार्यान्वित करुन नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिल्यामुळे मालेगावची जनता प्रशासनास धन्यवाद देत आहे.

अर्जून गुडदे, जिल्हा माहिती अधिकारी, वाशिम.

No comments:

Post a Comment