सांगोला तालुक्यात पाण्याअभावी दुष्काळाची भीषणता वाढत
असून माणसांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला
आहे. अशा बिकट परिस्थितीवर मात करून डाळींबाची तीन हजार झाडे जगविण्यासाठी
चोपडीतील बाबर भावंडांची धडपड निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे. दुष्काळी
परिस्थितीतही त्यांनी डाळींबाची बाग अतिशय उत्तमरित्या फुलवली आहे.
सोलापूर
जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील चोपडी हे लहानसे गाव. येथे बाळासाहेब
बाबर, दिगंबर बाबर व भोजलिंग बाबर हे तीन भाऊ एकत्र राहतात. त्यांच्या
शेतात तीन विंधन विहिरी असून पावसाअभावी सध्या त्या पुर्णपणे कोरड्या आहेत.
त्यांनी दहा एकर क्षेत्रात डाळींबाची साडे तीन हजार झाडे लावली असून
गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्या झाडांना जगविण्यासाठी टँकरने पाणी
पुरवठा केला जात आहे. दररोज पाच टँकरच्या खेपा केल्या जात आहेत. तीन
भावांनी मिळून ही डाळींबाची झाडे जगवली असून त्याद्वारे आतापर्यंत जवळपास
एक लाखाचे उत्पादन मिळाले आहे. त्या तीन हजार झाडांपासून सुमारे सात ते आठ
लाख रुपये उत्पादन मिळू शकेल, असा त्यांना विश्वास आहे.
आतापर्यंत
जगविलेल्या झाडांचे त्यांनी दुष्काळातही प्रयत्नपूर्वक उत्तमप्रकारे संगोपन
केले आहे. बिकट परिस्थितीवर मात केल्यामुळे बाबर भावंडांचा आदर्श
परिसरातील इतर शेतकरीही घेत आहेत. शासनाकडून टँकरसाठी वापरलेल्या पाण्याचे
अनुदान मिळावे व एक लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज माफी मिळावी यासाठीही बाबर
भावंड प्रयत्नशील आहेत. टँकरने वाढलेली झाडे सध्या फळांनी बहरलेली असून
'तेल्या' (एक प्रकारचा रोग) आला नाही तर केलेल्या सर्व कष्टाचे चीज होईल,
असे मत बाबर बंधूंनी व्यक्त केले आहे.
- रुपाली गोरे, जिमाका, सोलापूर
No comments:
Post a Comment