पाहे आकाशाची वास / जाणता तु जगदीश
संयोगे विस्तार / वाढी लागे अंकुर
तुका म्हणे फळे / चरणाबुजे ती सकळ
जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात अकलुज येथे प्रवेश केला तेव्हा अख्खं अकलुज विठ्ठल नामाच्या गजरात न्हाऊन निघालं होतं. अकलुजमध्ये जणू विठ्ठलनामाची शाळाच भरली होती. तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये अभिनव पद्धतीने स्नान घातल्यानंतर अकलुजकर रिंगण पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात - ज्ञानोबा - तुकाराम असा नामघोष करीत सकाळच्या प्रसन्न वातावरणात वैष्णवांच्या चेहऱ्यावर आपण पंढरीच्या दारात पोहोचल्याचे भाव जाणवत होते.
तेथील मोकासी चार भुजा त्यासी / बाहिला सोहळा हजार रे /
नाचत जाऊ त्याच्या गावा रे / खेळीया सुख देईल विसावा रे /
विठ्ठलाच्या दर्शनाची लागलेली ओढ आता केवळ काही तासावर आल्याच्या भावनेतून अकलुज मध्ये पडणारी पावले विसावली, पण ती फक्त काही क्षणासाठीच - अकलुजच्या सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी केवळ वारकरीच उत्सुक होते असे नव्हे तर सावळ्या विठुरायाला वारकऱ्यांच्या रुपात पाहण्यासाठी हजारो अकलुजकर शिस्तीत उभे होते.
ज्ञानोबा - माऊली - तुकाराम असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज टाळ मृदुंगांचा गजर - डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताका - अश्वांच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी उडालेली झुंबड - देहभान विसरुन नाचणारे भाविक आणि पाठशिवीचा खेळ डोळ्यात साठवत या भक्तिरसाच्या रिंगण सोहळ्याचा साक्षीदार झालेलो मी !
अकलुजचं रिंगण पार पडल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर भक्तीरसात न्हाऊन निघाल्याचा आनंद डोळ्यात साठवून वारकऱ्यांच्या साथीने मीही पंढरीच्या वाटेला लागलो.
No comments:
Post a Comment