Monday, July 2, 2012

सिंचनासाठी शेततळ्यांची निर्मिती

कोरडवाहू शेतीला वरदान ठरणाऱ्‍या शेततळी योजनेस अहमदनगर जिल्‍ह्यात उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्‍ह्यात गेल्‍या तीन वर्षात 6 हजार 951 शेततळ्यांची निर्मिती झाली असून त्‍यापोटी 45 कोटी 7 लाख रुपये अनुदान शेतकऱ्‍यांना वाटप करण्‍यात आलेले आहे.

राज्‍य शासनाच्‍या कृषी विभागामार्फत केंद्रीय कृषी मंत्रालयाच्‍या राष्‍ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्‍या माध्‍यमातून शेततळी निर्मितीचा कार्यक्रम सन 2008-09 पासून राज्‍यात राबविण्‍यात येत आहे. या योजनेतून शेततळ्यासाठी शंभर टक्‍के अनुदान दिले जाते. त्‍यामुळे शेततळ्याच्‍या निर्मितीस शेतकऱ्‍यांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सिंचनाच्‍या माध्‍यमातून बागायती शेती व फलोत्‍पादनाचे प्रमाण वाढविण्‍याच्‍या हेतूने या योजनेची अंमलबजावणी केली जाते. सन 2008-09 पासून सन 2011-12 या तीन वर्षांसाठी जिल्‍ह्याला 6 हजार 600 शेततळ्यांचे उद्दिष्‍ट देण्‍यात आले होते. परंतू बहूसंख्‍य क्षेत्र कोरडवाहू असलेल्‍या व जलसिंचनाचा अभाव असलेल्‍या नगर, पाथर्डी, संगमनेर, पारनेर आदी तालुक्‍यातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्‍यामुळे जिल्‍ह्यात 31 मार्च 2012 अखेर 6 हजार 951 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

अहमदनगर जिल्‍ह्याचे सरासरी पर्जन्‍यमान 497.4 मि.मि. असले तरी काही तालुक्‍यात पावसाचे प्रमाण सातत्‍याने कमी असते. त्‍यामुळे संपूर्ण जिल्‍ह्यात पाऊस सारखा पडत नाही. कमी पाऊस असणाऱ्‍या भागातील कोरडवाहू शेती या योजनेमुळे सिंचनाखाली येऊ लागली आहे. जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेतून 3 हजार 970 व महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 2 हजार 981 शेततळ्यांची निर्मिती झालेली आहे. उद्दिष्‍टापेक्षा 351 शेततळ्यांची अधिक निर्मिती करण्‍यात कृषी विभागाला यश आले आहे. नगर तालुक्‍यात सर्वाधिक 1152 शेततळ्यांची निर्मिती झाली आहे, तर कोपरगाव तालुक्‍यात 99 शेततळी पूर्ण झाली आहेत. संगमनेर तालुक्‍यात 911, पारनेर 807, पा‍थर्डी 792, अकोले 774, कर्जत 755, शेवगांव 491, श्रीगोंदा 249, राहूरी 280, नेवासा 212, जामखेड 193, श्रीरामपूर 114 तर राहाता तालुक्‍यात 104 शेततळी पूर्ण झालेली आहेत.

कमी होणारा पाऊस, पाण्याची घटलेली पातळी यामुळे सिंचनाखाली कमी होणारे क्षेत्र या पार्श्‍वभूमीवर शेततळी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहेत. पिकांसाठी सं‍रक्षित पाण्‍याची व्‍यवस्‍था झाल्‍याने पीक उत्‍पादनात वाढ, टंचाईच्‍या काळात शाश्‍वत पाण्‍याची व्‍यवस्‍था आदी फायदे शेततळ्यांपासून मिळत आहेत. शेततळ्यांमुळे जिल्‍ह्यात अनेक ठिकाणी हजारो हेक्‍टर कोरडवाहू शेतीवर फळबागा फुललेल्‍या दिसतात. या शेत‍तळ्यातील पाण्‍याचा काटकसरीने वापर केल्‍याने भर उन्‍हाळ्यातही फळबागासह इतर पिके जगविल्याचे दिसून येत आहे.


  • दिलीप गवळी, माहिती अधिकारी, अहमदनगर
  • No comments:

    Post a Comment