Monday, July 2, 2012

मंत्रालय…

आज 28 जून. सकाळपासूनच पावसाच्या धारा कोसळत होत्या. ऑफिसला जायचा कंटाळा आला होता, पण जावं तर लागणार होतं. नाईलाजानंच ऑफिसमध्ये पोहचलो. टेबलवर पडलेली वर्तमानपत्र वाचायला सुरूवात केली. पहिलीच बातमी आठवड्यापूर्वी मंत्रालयाला लागलेल्या आगीची होती. नकळत खिडकीच्या बाहेर पाहीलं आणि विचार आला हाच पाऊस मंत्रालयाला आग विझविण्यासाठी पडला असता तर?

माझा हा विचार माझ्या मित्राला सांगितला. त्यानेच आठवण करून दिली, मंत्रालयाला आग लागून आठवडा झाल्याची. त्या काळ्या दिवसाच्या स्मृती पुन्हा एकदा डोळ्यासमोर तरळून गेल्या. मंत्रालयाला आणि पाच निष्पाप जीवांना आपल्या कवेत घेणाऱ्या अग्निप्रलयाला आठवडा झाला हे अजूनही पटत नाही. काल परवाच ही घटना घडली असावी असं अजूनही वाटतयं. पण मंत्रालयाचं नव रुप पाहिल्यानंतर आपण गतस्मृतींना कवटाळून बसलो आहोत, याची जाणीव होते. जे झालं ते वाईटचं होत, पण त्याच्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणं नव्यानं उभारी घेत सजलेलं मंत्रालय पाहिलं की माणसातल्या दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि कुठल्याही प्रसंगाला धैर्यानं सामोरं जाण्याच्या वृत्तीची प्रचिती येते.

आज मंत्रालयाला बाहेरून बघितलं तर ते एखाद्या नववधूसारखं सजलेलं दिसतयं. काळ्या धूरानं आणि आगीच्या तडाख्यानं काळवंडून गेलेला मंत्रालयाचा दर्शनी भाग आज पाहिला तर आठवड्यापूर्वी ही इमारत एखाद्या भयानक आपत्तीला सामोरी गेली असेल, असं सांगून देखील पटणार नाही. शेकडो हात या मंत्रालयाला त्याचं पूर्वीचं रुप मिळवून देण्यासाठी झटत आहेत. युद्धपातळीवर सुरू असलेलं हे कामच माझ्यासारख्या या वास्तूत काम करणाऱ्या एका सामान्य माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहे.

ही आग मानवनिर्मित की निसर्गनिर्मित हा वाद नेहमीच चर्चिला जाणार आहे. आगीच कारण काय, आग विझवताना कोणत्या अडचणी आल्या, आग विझवायला का वेळ लागला, आग लवकर विझवण्यात यश आलं असतं तर बळी पडलेल्या निष्पापांचे जीव वाचवता आले असते का या प्रश्नांवर चर्चेची अनेक सत्र झडतील. पण त्याहीपेक्षा या घटनेतून आपण काय शिकलो हे माझ्यादृष्टीनं सगळ्यात महत्वाचं आहे. एवढ्या भयानक परिस्थितीला सामोरे जावूनसुद्धा अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात शासन यशस्वी ठरलं हे नाकारून चालणार नाही. सोमवारी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आपल्या शब्दांमधून हा विश्वास निर्माण केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील प्रशासनावरील आपली पकड दाखवत विविध विभागांचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी देखील प्रसंगाचं गांभीर्य ओळखून प्रशासनाच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देऊन कामावरील आपली निष्ठा व्यक्त केली आहे.

काळ आणि वेळ यातला नेमका फरक काय असतो, हे त्या दिवशी बऱ्याच जणांनी अनुभवलं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं जे म्हटलं जातं त्याचा अर्थ त्यादिवशी कळाला. डिस्कव्हरी चॅनेलवर आय शुडन्ट बी अलाईव्ह ही मृत्यूवर मात करणाऱ्यांच्या अनुभवावर आधारित मालिका सध्या दाखविली जात आहे, त्या मालिकेचाच एक भाग प्रत्यक्ष पाहिल्याचा भास अनेकांना झाला. झालं ते घडून गेलं, पण पुन्हा असं घडू नये म्हणून या घटनेकडं आपण किती गांभीर्यानं पाहणार आहोत यावरच या वास्तूतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचं सुरक्षित भवितव्य अवलंबून असणार आहे. राज्याचा हा मानबिंदू निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मित आपत्तींपासून सदैव सुरक्षित कसा राहिल या दृष्टीनं विचार होणं गरजेचं आहे. राज्याचा प्रशासन असा विचार निश्चितच करेल अशी मंत्रालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आशा आहे.


  • विशाल ढगे
  • No comments:

    Post a Comment