तळमजल्यासाठी सचिव तथा महासंचालक प्रमोद नलावडे यांची फ्लोअर मार्शल म्हणून नियुक्ती झाली असल्याने त्यांनी ही मॉकड्रील यशस्वी होण्यासाठी जी टीम तयार केली त्यात मला असिस्टंट फ्लोअर मार्शल म्हणून काम करण्याची संधी दिली. या मॉकड्रीलमध्ये तळमजल्यात तसेच पोटमजला येथील विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना सुखरुपपणे बाहेर काढणे ही महत्त्वाची बाब होती. त्यादृष्टीने दोन ते तीन दिवसांपासून बैठका घेऊन साहेबांनी सूचना दिल्या. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याच्या प्रयत्न आम्ही केला.
तळमजल्यावरील आमच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाव्यतिरिक्त असलेली इतर विभागाची कार्यालये आणि पोट मजल्यावरील मंत्रालय उपहारगृहाचे कर्मचारी तसेच मंत्रालयीन कर्मचारी संघटनेचे कार्यालये या सर्व कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचारी यांना मॉकड्रीलची माहिती देण्याचे काम मी करत होतो. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर होणारी ही मॉकड्रील कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच एक कुतूहलात्मक बाब होती. मॉकड्रील झाल्यानंतर त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत हे पूर्वीच व्हायला पाहिजे होते. तथापि 'देर आए दुरुस्त आए', यानुसार योग्यवेळी मॉकड्रील झाली, अशाही चर्चा झाल्या. सुरुवातीचे दोन दिवस काही कर्मचारी मित्रांना याचे महत्त्व वाटले नाही. मात्र आज प्रत्यक्ष मॉकड्रीलच्या दिवशी याचे महत्त्व लक्षात येऊन हे कर्मचारी गांभीर्याने सहभागी झाले.
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक कार्यालयात जाऊन आज जेव्हा बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या, त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि दुपारी 4 वा. सायरन झाला. त्याबरोबर सर्व कर्मचारी/अधिकारी शांतपणे मंत्रालयाच्या बाहेर पडून त्यांना नेमून दिलेल्या जागी पोहोचू लागले. पोटमजला व तळमजला येथील स्वच्छतागृहांपासून प्रत्येक दालनात कोणी नसल्याची खात्री करुन आम्ही बाहेर नियोजित ठिकाणी पोहोचलो. अवघ्या 10 ते 12 मिनिटात अख्खे मंत्रालय रिकामे झाले, ठरविल्याप्रमाणे दुपारी 3 वा. प्रत्यक्ष उपस्थितांची हजेरी घेऊन मॉकड्रीलनंतर प्रत्यक्ष शिरगणती करुन सर्व कर्मचारी/अधिकारी खाली उपस्थित असल्याची खात्री केली. माझ्याकडे सोपवलेले काम फत्ते झाल्याचा आनंद वाटला मात्र दु:खाची एक सल मनास चाटून गेली. काश! त्या दिवशी म्हणजे 21 जूनला देखील अशी 100 टक्के शिरगणती का झाली नाही ? म्हणूनच ही मॉकड्रील एक आवाहन नव्हे तर आव्हान ठरले.
मंत्रालयातील आम्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरुवातीला मॉकड्रीलची चर्चा होत असताना हा विषय वरकरणी रटाळ व शासकीय कामकाजाचा भाग वाटला असला तरी प्रत्यक्षात ही एक गांभीर्यपूर्ण घटना असून भविष्यातील दुर्घटनेपासून वाचण्यासाठी असलेले आव्हान ठरले. मुख्य सचिवांपासून सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत मेहनतीने हे मॉकड्रील यशस्वी केले.
शिस्त, संयम आणि धाडस यांचा धडा घालून देणारे हे मॉकड्रील मंत्रालयातील साऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.
No comments:
Post a Comment