येत्या ७ फेब्रुवारी रोजी राज्यातील मराठवाडा विभागातील औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, अहमदनगर. विदर्भात नागपूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ,वर्धा,गडचिरोली,चंद्रपूर तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या २७ जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी मतदान होईल. या सर्व जिल्ह्यातील एकूण १ हजार ६४१ जिल्हा परिषद जागांसाठी तर ३ हजार २५२ पंचायत समितींच्या जागांसाठी मतदान होणार आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी- चिंचवड, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या १० महानगरपालिकांसाठी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये एकूण १ हजार २४४ उमेदवार आपले नशिब आजमाविणार आहेत. जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी होणार असून या दिवसापासून हे सदस्य अधिकृत लोकप्रतिनिधी म्हणून गणले जातील. आता सच्चा लोकप्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी जनतेची असून यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सध्या प्रत्येक निवडणुकीत कमी होत जाणारी निवडणुकीची टक्केवारी ही राजकीय पक्ष आणि सरकार दोघांनाही चिंतेची ठरत आहे. मतदारांमध्ये जागृती निर्माण करुन त्यांना मतदान करण्याकडे वळविण्यासाठी केंद्र सरकारने २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदारदिन जाहीर केला असला तरी. मतदानाची घटती टक्केवारी चिंताजनकच आहे.
लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही बहुतांश ठिकाणी ५० टक्क्यापेक्षाही कमी मतदान होत आहे. ज्यांना नव्यानेच मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते युवक मतदानाकडे फारशा गांभीर्याने पाहत नाहीत. काही ठिकाणी केवळ २० ते २५ टक्के मतदान होत आहे. देशातील मतदानाची सरासरी सन २००४ चा अपवाद वगळता ५५ टक्क्यांच्या वर आहे. मात्र राज्यामध्ये व मतदार संघामध्ये हे प्रमाण कमी होत आहे.
सध्या जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीतील उमेदवार जनतेच्या दारापर्यंत येत आहेत. लोकव्यवस्थेत मतदान करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे. देशात सुधारणा होणारच नाही, राजकारणी एकाच माळेचे मणी, माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, अशी नकारात्मक विचारसरणी सुशिक्षित वर्गात बळावत चाललेली आहे. अशी विचारसरणी लोकशाहीस घातक आहे. सशक्त लोकशाहीच्या बळकटी करणासाठी सुशिक्षितांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. निवडणुकीत सर्वात कार्यक्षम, प्रामाणिक व चारित्र्यवान उमेदवाराची निवड करणे मतदारास सहज शक्य आहे. मतदारांनी अशा उमेदवारांना पसंती देऊन सुदृढ लोकशाही बळकट करावी.
अधिक बारकाईने कानोसा घेतला तर लोकांचा राजराकारणावरचा विश्वास उडू लागल्याचे चित्र समोर येत आहे. यात लोकशाही यंत्रणेचा दोष नाही ती राबविणारे आपल्या फायद्या तोटयाचा विचार करतात त्यातून मूळ तत्वाला बाधा येते. त्यामुळे माझ्या मताने काय फरक पडणार आहे असा निराशेचा सूर लोकांत दिसतो. दुसरी बाब अशी की, राजकारण हे आपले क्षेत्र नाही असे मानणारेही या प्रक्रियेपासून दूर राहतात. सुट्टी मजेत घालवितात. मात्र मतदानाला जात नाहीत. मतदान करत नाहीत. विशेष म्हणजे यात तरुण-तरुणींचे प्रमाण जास्त आहे.
सशक्त लोकशाहीच्या बळकटी करणासाठी प्रत्येकाने विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे. लक्षात घ्या! तुमच्या एका बहुमूल्य मताने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल यात शंका नाही. तेव्हा ७ फेब्रुवारी (जिल्हा परिषद ) व १६ फेब्रुवारी (महानगरपालिका) रोजी होणार्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वत: तर मतदान कराच परंतु १८ वर्षापुढील आपले नातेवाईक, शेजारी, मित्र परिवार यांनाही मतदानासाठी प्रवृत्त करा अन् सशक्त लोकशाही बळकटीकरणाचे साक्षीदार व्हा....!
No comments:
Post a Comment