चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून सांस्कृतिक आणि सामाजिक एकता निर्माण करण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच चित्रपटांनी लोकांच्या हृदयामध्ये अढळ स्थान निर्माण केलं आहे. आपल्या देशाच्या संस्कृतीबरोबरच इतर देशांची संस्कृती जाणून घेण्याची सुप्त मनीषा प्रत्येकातच असते. या इच्छेला तृप्त करण्याचं काम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखे उपक्रम करीत असतात. याचं उत्तम उदाहरण एनसीपीए येथे होत असलेल्या १२ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पहायला मिळते. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या रुपानं जागतिक संस्कृतीचं दर्शनच जणू घडत आहे. ही संधी केंद्राच्या फिल्म डिव्हिजनने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने उपलब्ध करुन दिली आहे.
दि. ०३ फेब्रुवारीच्या सायंकाळी पाच वाजता नरीमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’चा परिसर रसिकांनी जणू फुलून गेला होता. याचं कारणही तसंच होतं. मुंबईकर रसिक वर्षभर ज्या चित्रपटरुपी मेजवानीची वाट आतुरतेने पहात होता, ती त्याला आजपासून पुढील सहा दिवस भरभरून मिळणार होती. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते होणार होते. टाटा नाट्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर आयोजकांसह शिंग फुंकणारे, भालदार, कासोटा घातलेल्या सुंदर युवती, कॅमेरामन, फोटोग्राफर प्रमुख पाहुण्यांची वाट पाहत होते. आतल्या बाजूला वाजणारे सनई-चौघडे वातावरण निर्मिती करीत होते. चित्रपट रसिक, निमंत्रित, व्हीआयपी व व्हीव्हीआयपी, दिग्दर्शक, निर्माते, पत्रकार यांनी सभागृह अगदी खचाखच भरुन गेले होते.
गाड्यांच्या आवाजापाठोपाठ शिंग फुंकल्याचा आवाज ऐकू आला आणि वातावरणात उत्साह संचारला. हातात आरती घेऊन उभ्या असलेल्या तरुणी औक्षण करण्यासाठी पुढे सरसावल्या. टाळ्यांच्या कडकडासह राज्यपालांचे स्वागत झाले. संयोजकांची लगबग सुरु झाली. अभिनेता अमन वर्माने सूत्रसंचालनासाठी माईकचा ताबा घेतला आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक मान्यवरांची नावे पुकारली गेली आणि फिल्म डिव्हिजनचे महासंचालक तथा मिफचे संचालक शंकर मोहन बंकिम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
यथोचित सत्कार स्वीकारुन राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री चौधरी मोहन जटुआ, प्रसिद्ध चित्रपट इतिहासकार विजया मुळे आदी मान्यवर व्यासपीठावर आले. दीपप्रज्वलन करुन महोत्सवाचे उद्घाटन झाल्याचे घोषित केल्यावर सर्वजन आसनस्थ झाले. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवातील माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन पट यांना तराजूमध्ये तोलून गौरवास पात्र चित्रपट निवडणाऱ्या परीक्षकांचा यावेळी श्री. जटुआ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०१२ च्या व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा होत असलेला क्षण उत्कंठावर्धक ठरला. भारताचे मातब्बर पर्यावरण चित्रपट निर्माते माईक पांडे यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांनी त्यांना मानवंदना दिली. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप होते. राज्यपालांसह अन्य मान्यवरांनी हा पुरस्कार माईक पांडे यांना बहाल केला. त्यावेळी माईक हे अत्यंत भावूक झाले होते. आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे त्यांचा चेहरा सांगत होता. माहिती, शिक्षण, अनुभवांच्या आदानप्रदानाबरोबरच क्षमता वृद्धी हे अशा चित्रपट महोत्सवांचे उद्दिष्ट असते. पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज बनली असून त्यादृष्टीने लोकांचे मन बदलावे लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
केंद्रीय राज्यमंत्री जटुआ यांनी माहिती, शिक्षणाबरोबरच भारताचा चित्रपटरुपी इतिहास संरक्षित करण्यासाठी फिल्म डिव्हिजन काम करत असल्याचे सांगितले. या महोत्सवास रसिकांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचेही प्रतिपादन केले. फिल्म डिव्हिजनच्या संकेतस्थळावरुन आपल्याला आवडणारी फिल्म शुल्क भरुन मागवता येईल, अशी सुविधा सुरु करण्यात येत असल्याची घोषणाही केली. राज्यपालांनी या महोत्सवास आपल्या शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनाचा कार्यक्रम संपला, नव्हे मध्यांतर झाला होता. मध्यांतरानंतर निसर्गात गुंतणाऱ्या संजिताचे चित्रण करणारा ‘बांबू सिंफनी’ हा संगीतप्रधान कार्यक्रम सादर करण्यात येणार होता. पाऊस, वारा यांच्या तालात नाचणाऱ्या बांबू किंवा वेळूच्या बनात प्रकट होणारे संगीत ऐकण्यासाठी सर्वच रसिक आसुसले होते. त्यामुळेच बहुतांश प्रेक्षकांनी आपल्या जागा सोडल्या नव्हत्या.
स्टेजवर अंधुक प्रकाश पडला. काळा सदरा आणि भगवी लुंगी घातलेले आठ-नऊ जण जंगलातून सरपण आणावे तसे बांबूच्या वस्तू घेऊन इतस्तत: ठेवू लागले. बांबूचा गिटार, पावा, ढोलक आणि बांबूचेच वेगवेगळ्या आकाराचे तुकडे याच्यातून निसर्ग संगीताची निर्मिती होणार या आनंदाने मन प्रसन्न झाले. माईक जोडले गेले आणि पक्षांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. हळूहळू प्रकाश स्पष्ट होत गेला आणि पहाट झाल्याचा अनुभव आला. मग एकापाठोपाठ एक असे संगीत जलसे सादर होऊ लागले आणि रसिकही ठेका धरत त्या संगीतात न्हाऊन गेले. दीड तास कसा गेला हे घड्याळालाही सांगणे मग कठीण गेले.
‘मुला पादूम रावू’ या नावाने भारतीय लोकसंगीताला एकत्र आणणारा हा कार्यक्रम त्रिशूर, केरळ येथील उन्नीकृष्णन पक्कानर यांनी सादर केला. संगीताचे मूळ निसर्गात असल्याने कोणतीही कलाकृती ही पर्यावरण स्नेही असली पाहिजे या सूत्रावर हा कार्यक्रम आधारलेला होता. अलिकडची वाद्ये जैविकदृष्ट्या विलयाला जात नाहीत. मात्र बांबू सिंफनीमधील सर्व वाद्ये बांबू किंवा लाकूड यासारख्या नैसर्गिक साधनांनी तयार केलेली असतात, हे या वाद्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
या सुंदर कार्यक्रमाचा शेवट ‘द कन्फेशन’ फिल्म दाखवून करण्यात आला. शाळेत शिकविलेल्या गोष्टींची वैयक्तिक जीवनात अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी आणि झालेल्या चुका कबूल करताना मनाला होणाऱ्या वेदना यांवर आधारित ही फिल्म होती. उत्तम निसर्गसौंदर्य आणि दोन मुलांमधील अर्थवाही संवाद हा फिल्मचा आत्मा होता. हा या कार्यक्रमाचा शेवट असला तरी ती खऱ्या अर्थाने सुरूवात होती सहा दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवाची. चला तर मग मजा लुटुया...
No comments:
Post a Comment