स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान
असा अत्यंत पराकोटीचा अभिमान, कळवळा असणारे आणि मराठी भाषेला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आयुष्यभर झगडणारे कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हाच दिवस मराठी राजभाषा दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो.वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या बहुतेक भाषणांत, लेखांमध्ये मराठी हा विषय समान असे. मराठीवर सर्वच बाजूने होणारे आक्रमण मराठीची शोचनीय परिस्थिती यावर ते वेळोवेळी भाष्य करीत. जागतिक मराठी परिषदेमार्फत त्यांनी समाजात याविषयीची जाण निर्माण केली.
स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना कुसुमाग्रजांना कधीही मानवली नाही. अनेकांनी त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न केले. पण वाढदिवसाच्या आधी दोन दिवस ते अज्ञातवासात निघून जात. परंतु त्यांच्या पंचाऐंशीव्या वाढदिवशी मात्र त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाची भेट दिलीच. कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एका ताऱ्यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिले. स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (स्टार इन द गेट ऑफ हेवन्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. एवढयावरच त्यांचे चाहते थांबले नाहीत तर त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला.
पारतंत्र्याच्या काळात सर्वच भारतीय भाषांकडे दुर्लक्ष होणे साहजिक होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात विशेषत: भाषाधारित राज्यरचना झाल्यानंतर महाराष्ट्रातच सर्वत्र मराठीला मान खाली घालून चालावे लागते ही परिस्थिती अत्यंत शोचनिय आहे असे कुसुमाग्रजांना वाटे. प्राचीन काळात धर्मभाषा होण्यासाठी मराठीला लढावे लागले. आज राज्यभाषा होण्यासाठी तिला पुन्हा लढावे लागले ही खंत त्यांना होती. १९८९ च्या जागतिक मराठी परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की,डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात उभी आहे. कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झाली असली तरी तिला अधिक धोका आहे तो लोकभाषा म्हणून तिच्यावर होणाऱ्या आक्रमणांचा. मुंबई हे सर्वाश्रयी शहर आहे. इथे अनेक प्रांतातील लोक येतात, रहातात याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु धनसत्तेच्या बळावर तिला कोणी आपली बटीक करण्याचा प्रयत्न करु नये. मंत्रालयात जाऊन मंत्र्यांशी वा मुख्यमंत्र्यांशी आपण मराठीत बोलू शकतो पण इतरत्र हॉटेलमध्ये, दुकानात आपल्याला हिंदी किंवा इंग्रजीतच बोलावे लागते. कलकत्ता, मद्रास ही शहरेही सर्वाश्रयी आहेत. पण तेथील बहुतांश व्यवहार स्थानिक भाषेत चालतात. परिस्थिती बदलायची असेल तर सामाजिक व्यवहाराच्या क्षेत्रात मराठीचा प्रवेश होणे गरजेचे आहे.
मराठीसाठी लढणा-या कुसुमाग्रजांनी इंग्रजीचा कधीही द्वेष केला नाही उलट त्यांचे इंग्रजीवर मनापासून प्रेम होते. केवळ जागतिक साहित्याचेच नव्हे तर जगातील ज्ञानविज्ञानाचे दरवाजे इंग्रजीने आपल्याला उघडून दिली आहेत हे इंग्रजीचे ऋण ते मानत. भूतकाळात रुतलेल्या या समाजाला आधुनिकतेपर्यंत नेण्याचे कार्य इंग्रजीने केले असेही ते म्हणत. असे असले तरी शिक्षण क्षेत्रात इंग्रजीची लुडबूड मात्र त्यांना मान्य नसे.
कविता, नाटक, कथा, कादंबरी, ललित निबंध असे बहुविध साहित्य प्रकार समर्थपणे हाताळून त्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजविले. गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार, अन् वज्रांचे छातीवरती, घ्या झेलून प्रहार ही कविता म्हणजे प्रत्येक देशबांधवाचे मनोगत आहे.त्यांच्या प्रतिभेने कवितेप्रमाणेच नाटकही समृद्ध केले. नटसम्राटने तर सारे उच्चांकच मोडले होते. साहित्य सेवेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे होते. नाशिकचे सार्वजनिक वाचनालय, लोकहितवादी मंडळ यांच्या जडणघडणीत ते सक्रीय होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सहभागी होते. आयुष्याच्या उत्तरार्धात आदिवासींसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्नशील होते. असा मराठीच्या क्षितिजावरील झळाळता तारा दिनांक १० मार्च १९९९ रोजी कायमचा अस्तंगत झाला.
त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या विकास तसेच संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव प्रयत्न केले आहेत. नाशिक येथील कुसुमाग्रज बहुउद्देशीय स्मारकाला पन्नास लाखांची मदत यापुर्वीच केली आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने वेगळ्या विभागाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत साहित्य-संस्कृती मंडळामार्फत व्युत्पत्तीकोश, खाद्यकोश, अलंकार आणि भूषणांविषयक कोश, राज्यातील विविध नद्या तसेच सह्याद्री पर्वतविषयक कोश, राज्यातील विविध बोली भाषांविषयक कोश यांची निर्मिती केली जाणार आहे. ग्रंथोत्सव तसेच साहित्योत्सवाच्या माध्यमातून राज्यात तसेच राज्याबाहेरील मराठी भाषिक भागांमध्ये मराठी भाषेचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. विश्वकोश फक्त कोषातच न राहता तो सर्वसामान्य जनता, विद्यार्थी आदी सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी भरीव प्रयत्न करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment