Thursday, February 2, 2012

झाडा-फुलांचा जिव्हाळा जपणारी कविता

निसर्गाचे विभ्रम आणि कविता यांचं एक अतूट असं नातं असतं. निसर्गाचं रूप टिपणारी कविता शुद्ध आस्वादपर, वर्णनपर असू शकते, तशी ती अनेकदा मानवी जीवनाशी या निसर्गाला जोडून एक विलक्षण असा आविष्कार घडवते. मराठीतील एक ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांची कविता याच जातकुळीतली आहे. मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला त्यांचा ‘बरेच काही उगवून आलेले’ हा कवितासंग्रह जगण्यात निसर्गाच्या खुणा शोधत जाणाऱ्या कवितांनी सजलेला आहे. 

धामणस्करांच्या कवितेतून भेटणारा निसर्ग वाचकांच्या ओळखीचा आहे. निसर्गातले त्यांचे सर्वात जवळचे घटक म्हणजे हिरवेपणा उधळणारी झाडं आणि रंगवर्षाव करणारी फुलं. माणूसही तसा निसर्गाचाच भाग आहे, पण झाडा-फुलांमधले रंग-विभ्रम त्याच्यात नाहीत. मात्र त्यांना टिपणारी संवेदनशीलता माणसाकडे नक्कीच आहे. म्हणूनच मनुष्य आपल्या जगण्याच्या संदर्भात निसर्गाचा विचार करतो, निसर्गात स्वतःच्या आयुष्याच्या खुणा शोधू पाहतो, झाडा-फुलांच्या तटस्थपणे फुलण्या-कोमेजण्यातून आपल्या जगण्याचे संदर्भ जागवतो. धामणस्करांची कविता याच पठडीतली आहे. निसर्ग हा त्यांच्या अनुभवाचा आणि चिंतनाचा विषय आहेच पण तो केवळ सौंदर्याचा आविष्कार म्हणून किंवा दृश्य जाणीवांचा आस्वाद म्हणून अवतरत नाही. मानवी आयुष्यातल्या विविध जाणीवांशी कुठेतरी तो एकरूप होऊन जातो, तर कधी या आयुष्यातला एक संदेश तो देतो. म्हणूनच धामणस्कर हे निसर्ग कवी असले तरी ते फक्त निसर्गपूजक कवी नाहीत. निसर्गप्रेमी तर ते नक्कीच आहेत. याच कारणाने त्यांच्या कवितेत निसर्गाच्या बरोबरीने आयुष्याचे संदर्भही डोकावतात. या दोहोंचं नातं विणतच त्यांची कविता साकारते. 

मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही
झाडांची पोपटी पालवीच मला अधिक विश्वासार्ह वाटली,

असा निसर्गावर विश्वास टाकणारे धामणस्कर ‘प्राक्तनाचे संदर्भ’ या पहिल्या काव्यसंग्रहातून भेटले होते. त्यांच्या मनातला हा विश्वास आजही अढळ-अविचल आहे. याची साक्ष ‘बरेच काही उगवून आलेले’ हा त्यांचा दुसरा संग्रहही देतो. त्यांच्या कवितेतला हिरवा रंग हा मातीतून फुटणाऱ्या अंकुराप्रमाणे स्वाभाविक, म्हणूनच ताजा आहे. अकृत्रिमपणे फुलण्यातली सहजता या कवितेत आहे... 


मी पृथ्वीचा पाण्याचा
चुकून शिडकावा झाला तरी
उमलून येणारा...
(मी)

अशा सहजतेने फुलत जाणारी त्यांची कविता या संग्रहातून भेटते. आयुष्यातल्या अनुभवांचं प्रतिबिंब त्यांना भोवताली असलेल्या झाडा-फुलांमधून दिसतं आणि त्यांचं शब्दरूप मग कवितेतून उमटतं. त्यांच्या या कवितेत म्हणूनच केवळ सौंदर्यच ठसलेलं नाही. जीवनातली आच व आस, अन्याय व आघात हेही इथे भेटतं. हिरव्या अस्वस्थ पानांमधून या कवीला माणसाच्या आयुष्यातले चढ-उतार, पीडा हे वास्तव खुणावत राहतं-

पानं फाटलेली : वाऱ्याचे
सारे अतिप्रसंग सहन केलेली.
पानं भुईवर विखुरलेली : झाडानेच
अपरात्री घराबाहेर काढलेली.

पानं असहाय्य : सीतेसारखीच शेवटी
मातीच्या गरीब आश्रयाला आलेली...
(पानं)

निसर्गातले आणि जगण्यातले वाटेकरी आयुष्यात थोडी उणीव निर्माण करत असले, तरी या वाटेकऱ्यांमुळेच जीवनाला गोडी लाभते. आपलं अस्तित्व राखताना दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करावं लागतं. जे आयुष्याचं तेच झाडांचं आणि आकाशाचंही. धामणस्करांच्या मनातल्या या संदर्भातील नोंदी एक वैचारिक डूब घेऊन कवितेत अवतरतात, ‘डायरीतील काही ओळीं’च्या रूपाने :
प्रत्येक नवी डहाळी
द्वैताची ग्वाही असते
आपले द्वैत
झाडालाच सांभाळावे लागते.

कधी ही भागिदारी लटक्या तक्राराच्या आविर्भावाने ते व्यक्त करतात. मानवी आयुष्य आणि निसर्गातले घटक एकमेकांना बांधून टेवणारे असले, तरी या नात्यातही एखादा तक्रारीचा सूर राहतोच, तो असा-
सूर्योदय होताच पक्ष्याने
झाड खाली करायचे
सूर्यास्त होताच आकाश.
म्हणजे पूर्ण चोवीस तास
ना झाड आपलं असतं,
ना आकाश!

निसर्गाच्या विविध आविष्कारांनी हा कवी संमोहित होतो. फुलणं आणि गळणं दोन्हीतलं फुलाचं फूलपण जन्म-मृत्यूच्या तत्त्वाचा सहजपणे स्वीकार करणारं असतं, ही गोष्ट त्याला अंतर्मुख करून जाते. आयुष्याचं तत्त्वज्ञान निसर्गाच्या सहस्र हातांनी मिळत राहतं. निसर्गप्रेम ही एक पवित्र प्रेरणा असल्याची जाणीव खोल मनात जपणारे धामणस्कर त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे ‘एक पुण्यात्मा’ आहेत. झाडांशी, ढगांशी संवाद साधत जगणारा हा कवी आयुष्यातल्या दुःखांनी नामोहरम होणारा नाही. कारण त्याचा संबंध चराचर विश्वाशी आहे. रोज नव्याने जन्म घेणारा आणि मरण पत्करणारा हा कवी माणसाच्या नियमांपेक्षा निसर्गाशी बांधीलकी मानणारा आहे. ‘मी चराचराशी निगडित’ या कवितेत हाच सूर प्रकट होतो-
मी फिरेन संवादात कधी जवळच्या झाडाशी, कधी
दूरच्या मेघाशी, एकटेपणा संपलेला
मी एक पुण्यात्मा आहे...मी
सर्व चराचराशी निगडित : सूर्यास्त पाहताना
मीही होतो निस्तेज सांजावताना
काळाभोर हळूहळू. मी
नष्ट होतो रात्रीच्या अंधारात आणि उगवतो
नवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा...

हिरव्या चैतन्यावर जीव ओवाळून टाकणारा हा कवी आयुष्यातल्या प्रेम-जिव्हाळ्यालाही तेवढाच जपणारा आहे. पुढच्या पिढीत निसर्गाबद्दलचा जिव्हाळा उमटताना पाहून हा कवी सुखावतो-
आकाश-झाड-पक्ष्यांचा उमाळा यापुढेही घरात
असणार आहे ही केवढी गोष्ट!
(आजीचा नातू)

‘झाडांची माती झाडांना परत करा’, ही या कवीची विनवणी आहे. त्याच्या कवितेत अलंकारिकता नाही, तरी ती साजशृंगार केल्याप्रमाणे सुंदर वाटते. मुक्तछंदातही एक लय जागवत ताजेपणाचा शिडकावा करत येणारी ही कविता मन प्रसन्न करते.

No comments:

Post a Comment