कारंजा अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नारेगावापासून दोन कि.मी. अंतरावर लोणी (अरब) हे गाव आहे. लोणी मध्ये कुणबी, मुस्लीम आणि बौध्द समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून, येथे मंदिर, मशीद आणि बौध्द विहार ही धार्मिक स्थळे आहेत. परिणामी, सर्वधर्म समभाव आणि धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून या गावाची परिसरात ओळख आहे. ग्रामस्थांचा एकोपा आणि ग्राम पंचायत प्रशासनाची दूरदृष्टी यामुळे आजघडीला गाव विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. गावात खाकीनाथ महाराजांचे मोठे मंदिर आहे. या ठिकाणी पौष महिन्याच्या पोर्णिमेला मोठी यात्रा भरते.
येथील ग्राम पंचायत सदस्य संख्या सात आहे. १२०० च्या जवळपास लोकसंख्या आहेत. सरपंचपदी रमेश तिडके आहेत. सौ. मेहरनिगारबी ज. रजाऊल्लान खॅ पठाण उपसरपंच आहेत. ग्राम सचिवपदी योगिराज शंकरपुरे कार्यरत आहेत. गावामध्ये बारावा वित्त आयोगा मधून नळ योजना विहिरींचे खोलीकरण नाली बांधकाम, जिल्हा परिषद फंडातून आरोग्य उपकेंद्र बांधकाम, पंचायत समिती स्तर बाराव्या आयोगामधून काँक्रीट रस्ता, सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत दोन शाळा खोल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. गाव ८० टक्के हागणदारीमुक्त झालेले आहे. मागसवर्गीय आणि इतरांकरिता घरकुले प्रस्तावित केलेली आहेत. गावात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शाळा आहे. शिवाय उर्दू शाळाही आहे.
लोणी अरब येथून मुंगूटपूर, वाढोणा, कार्ली, यावर्डी आदी गावाकडे जाणारे डांबरी रस्ते आहेत. झोपडपट्टीमध्ये दुहेरी हातपंप, योजना नाल्यांचे रुंदीकरण, सोबतच निर्मल ग्राम योजना राबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गावात महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी मोतीराम वानखडे आणि पोलीस पाटील रन्तमाला आंधळे यांचे सहकार्य मिळत आहे. सरपंच उपसरपंच आणि ग्राम सचिवासह ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे गावाचा विकास होत आहे.
No comments:
Post a Comment