वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील हळद पिकाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथील शेतकरी यादवराव ढवळे यांनी गेल्या तीन वर्षापासून उन्हाळी तीळ लागवड करुन एका एकरात ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. या पिकासाठी आलेला खर्च वजा जाता त्यांना ३० ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबिनचा पट्टा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्याने शेतकरी प्रामुख्याने सोयाबिननंतर हरभऱ्याचे पीक घेतात. तर ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा आहे ते शेतकरी गहू किंवा भाजीपाला वर्गीय पिके घेतात. परंतु बाजारामध्ये भाजीपाल्यांचे प्रमाण वाढले तर भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती करणे फारसे परवडत नाही.
अशातच शिरपूर जैन येथील या शेतकऱ्याने उन्हाळी तिळाचे पीक घेण्याचा प्रयत्न केला. इतर पिकाच्या तुलनेत तिळाचे उत्पन्न चांगले आल्यामुळे गत तीन वर्षापासून त्यांनी उन्हाळी तिळाचे उत्पन्न घेणे सुरु केले आहे. त्यांनी आतापर्यंत ऊस व केळीसोबत सुद्धा तिळाचे आंतरपीक घेतले आहे. तीळ हे ९० दिवसांचे पीक आहे. तर, या पिकाचा उत्पादन खर्च सुद्धा अत्यल्प आहे.
तिळाचे पीक घेण्यासाठी बी-बियाणे, मशागत, पेरणी, रासायनिक खते व युरिया, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास कीटकनाशकाचा एखादा फवारा या सर्व बाबींवर एकरी सरासरी २५०० ते ३ हजार रुपये खर्च होतो. तर, एका एकरामध्ये सरासरी ५ ते ६ क्विंटल उत्पन्न मिळते. बाजारात तिळाला ७५ ते ८० रुपये किलो या प्रमाणे दर आहे. त्यामुळे ढवळे यांना खर्च वजा जाता ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
तीळ पिकाची लागवड ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी लागते. लागवडीपूर्व मशागतीच्या कामास आता त्यांनी सुरुवात केली असून सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीळ पिकाची लागवड करावी, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment