ज्या दुकानासमोर रेशन घेण्यासाठी तासनतास रांग लावावी लागत होती तेच दुकान आता आम्ही स्वत: चालवतोय. त्याद्वारे कार्डधारकांना तत्पर रेशन माल देता येत असल्याचे समाधान मिळत असल्याची भावना बचतगटाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील पहिले रेशन दुकान चालविणाऱ्या गृहलक्ष्मी बचतगटाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. नंदुरबार मधील नवनाथनगर भागात बचत गटाच्या महिलांनी चालविलेले हे रेशन दुकान सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
गृहलक्ष्मी बचतगटाने रेशन दुकान मिळावे म्हणून अर्ज केला होता. त्यांना रेशन दुकान मंजूर झाल्यानंतर नवनाथनगर भागात हे दुकान सुरु झाले. बचतगटातील २० महिलांनी रेशन दुकान चालविण्यास मिळाल्याचा आनंद साजरा करीत दुकान थाटले.
महिन्याला येणारा रेशनचा कोटा उचलणे, त्यासाठी चलन घेणे, ते बँकेत भरणे, आलेला माल उतरवून घेणे, कार्डधारकांना ते योग्य वजनात वाटप करणे, रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे ही सर्व कामे बचतगटातील महिलाच करतात. त्यासाठी ते कोणाचीही मदत घेत नाहीत.
बचतगटातील महिला ५० किलोचे तांदूळ, गहू, साखर यांचे कट्टे स्वत: हाताळतात. आपण स्वत: जेव्हा रेशन दुकानासमोर तासनतास रांगेत उभे रहायचो आणि एकदाचे रेशन मिळाल्याचा आनंद काही औरच राहायचा. ती बाब लक्षात घेऊन आता त्या रेशनमाल घेण्यास येणाऱ्या महिलांना जास्त वेळ रांगेत उभे करीत नाही. ग्राहकांना तातडीने माल देऊन रवाना करण्यात येत असल्याचे या गटाचे लेखी व्यवहार सांभाळणाऱ्या रंजना आनंदा गुरव यांनी सांगितले. दुकानात सोनल गुरव, यमुना माळी, चंद्रभागा माळी, प्रतिभा गुरव अशा एकूण पाच महिला काम पाहतात.
याशिवाय याच बचतगटातील काही महिला शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याचे काम करीत असतात. यामुळे गृहलक्ष्मी बचतगटाची उलाढालही वाढली आहे. बचत, व्यवसाय करण्यातील आनंद, त्यातून मिळत असलेले स्थैर्य आणि महत्त्वाचे म्हणजे आपण देखील काही करू शकतो याबाबत मिळालेला आत्मविश्वास ही या महिलांची खरी कमाई आहे, असे म्हणता येईल.
No comments:
Post a Comment