Wednesday, February 15, 2012

बचतगटाने साकारला सीएफएल बल्ब निर्मितीचा उद्योग

बचतगटातील महिला उद्योग स्थापनेत मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. आता त्या पारंपरिक गृह उद्योगांपलिकडे झेप घेऊ लागल्या आहेत. घरगुती खाद्यपदार्थ बनविण्याच्या चौकटीबाहेर जाऊन या महिला पुरुषांच्या बरोबरीने उद्योगांची कास धरीत आहेत. यवतमाळ शहरालगत असलेल्या उमरसरा येथील एका बचतगटाने तर सीएफएल बल्ब निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचतगट असे गटाचे नाव असून पाच वर्षापूर्वी १० महिलांनी मिळून या बचतगटाची स्थापना केली. प्रत्येकी ५० रुपये मासिक बचतीतून महिलांनी या उद्योगात भरारी घेतली आहे. पारंपरिक वस्तुंच्या निर्मितीपलिकडे विचार करुन या महिला आज महिन्याला दोन हजारावर सीएफएल बल्बची निर्मिती करुन त्याची विक्री करतात. बी.ए. शिक्षण झालेल्या सुषमा फुलकर या महिलेच्या संकल्पनेतून हा उद्योग सुरु झाला. श्रीमती फुलकर यांचा मुलगा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तो ज्या इमारतीत राहायचा त्या ठिकाणी महिला सीएफएल बल्ब निर्मितीचा उद्योग करायच्या. एकदा त्यांच्या मुलाने या उद्योगाबद्दल गावातील महिलांना सांगितले. त्यांनी तो उद्योग प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तसा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सीएफएल बल्बची कल्पना डोळ्यासमोर ठेवून सुषमा फुलकर यांनी पुणे येथे यशदाच्या प्रशिक्षण केंद्रात बल्ब निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. पुणे येथे या बल्बची निर्मिती करीत असलेल्या महिलांकडूनही त्यांनी या उद्योगाबाबत जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी बचतगटाच्या अन्य महिलांनाही याचे प्रशिक्षण दिले. आज गटातील अन्य महिलांच्या सहकार्याने हा उद्योग यशस्वीपणे उभा राहिला आहे.

बल्बसाठी लागणाऱ्या कच्चा माल व बल्ब निर्मितीसाठी लागणारी मजूरी धरुन एका बल्बसाठी एकूण ४० रुपये खर्च येतो. बाजारात हा बल्ब ८० रुपयाला विकला जातो. उद्योगासाठी बचतगटाने जुलै २०११ मध्ये १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. काही महिन्यातच गटाने कर्जाची परतफेड केली असून गटाला महिन्याकाठी १५ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न होत असल्याचे फुलकर यांनी सांगितले. बचतगटाच्यावतीने उत्पादीत या बल्बची १ वर्षाची गॅरंटीही दिली जाते. या दरम्यान बल्ब खराब झाल्यास दुरुस्त करून देण्याची किंवा बदलून देण्याची सोयही करुन देण्यात आल्याने ग्राहकांकडून या बल्बला विशेष मागणी आहे. गटाच्या नावाने यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत डा.टी.सी.राठो रूग्णालयाजवळ बल्ब विक्रीचे दुकानही सुरु करण्यात आले आहे.

येत्या काळात बल्ब निर्मितीच्या व्यवसायाला व्यापक स्वरुप दिल्यानंतर लाखो रुपयांची उलाढाल होऊ शकेल असा विश्वास श्रीमती फुलकर यांना आहे. या उद्योगामुळे गटातील महिलांच्या आयुष्यात स्थैर्य येत असून सकारात्मक बदलही होत आहे. या बचतगटाच्या महिला केवळ उद्योग स्थापन करुन थांबल्या नाहीत तर या उद्योगात त्यांनी नेत्रदीपक प्रगती करुन इतर महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

1 comment:

  1. very good. i like very much the mahila bachat gat manufacturer CFL bulb. it's very talented job.

    ReplyDelete