Tuesday, February 28, 2012
ग्रंथ वाचनासोबत मनही जुळले
‘पुस्तक प्रेमींचा हा सोहळा,
वाचकांचा हा मेळा,
ग्रंथोत्सव घेऊन आला.’
दिल्लीतील ग्रंथोत्सवाने वाचन संस्कृतीत भर पाडली सोबतच येथील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वाचकांचे, प्रकाशकांचे मनही जुळले. महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर चांदण्याच्या सोबतीने ग्रंथोत्सवाच्या सोहळयास सुरूवात झाली. ग्रंथ/पुस्तक प्रदर्शन व विक्रीची वेळ दुपारी ३ ते ९ या कालावधीत ठेवण्यात आली होती. या ग्रंथोत्सवाचे आयोजन वाचनाची अभिरूची निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आला. दिल्लीकर वाचक प्रेमींनी या ग्रंथोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला.
पहिला दिवस सोमवार २० फेब्रुवारी २०१२ सांयकाळी ६.३० वाजता नियोजन आयोगाचे सदस्य, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि प्रख्यात लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याचा ग्रंथोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे ते यावेळी बोलले. त्यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला हा उपक्रम दिल्लीतील मराठी वाचक तसेच वाचन संस्कृतीला चालना देणारा प्रगतीशील उपक्रम असल्याचे विदीत केले.
उद् घाटनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दै. लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सुनील चावकेही उपस्थित होते. त्यांनी आपले विचार व्यक्त करतांना, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री महोदय तांत्रिक क्षेत्रात विशेषज्ञ असूनही मराठी साहित्य अधिक लोंकापर्यंत पोहचाविण्यासाठी ग्रंथोत्सव रूपात अभिनव उपक्रम सूरु केला. त्याबद्दल प्रशंसनीय गौरवद् गार त्यांनी काढले.
पहिल्या दिवसाला ‘स्वर आराध्य’ या मराठी गीतांच्या मैफलीचा कार्यक्रम ठेण्यात आला होता. रसिक वाचक प्रेमींनी या कार्यक्रमाचा मन मुराद आनंद लुटला.
दुस-या दिवशी म्हणजे मंगळवारी २१ फेब्रुवारीला ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन’ याविषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला. कित्येक वर्षापासून जी मंडळी दिल्लीत अथवा बृहन्महाराष्ट्रात राहतात. तरीही मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन विविध माध्यमाने हे लोक करीत आहेत. त्यामुळे मराठी भाषा वृध्दींगतच होत असल्याचा सूर या परिसंवादात उमटला.
दिल्ली येथे विविध क्षेत्रात शासकीय तसेच अशासकीय काम करत असूनही मराठी भाषेचे जतन कश्या पद्धतीने ही लोक करीत आहेत त्यांचे अनुभव कथन यावेळी त्यांनी केले. जोपर्यंत ‘आई’ हा शब्द या जगात जिवंत राहील तोपर्यंत मराठी भाषा जिवंत असल्याचेही सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व सूत्रसंचालन अरविंद दीक्षित यांनी केले तर चौगुले विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका पूजा साल्पेकर, माजी प्रशासकीय अधिकारी सचिन भानूशाली, ज्येष्ठ पत्रकार धर्मांनंद कामत, महाराष्ट्र शासनाचे दिल्लीस्थित विधी सल्लागार संजय खर्डे आणि सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी मंगेश वैश्यंपायन यांनी सहभाग घेऊन विचार व्यक्त केले.
यानंतर युवा कवी संमेलन ठेण्यात आले होते. रूपेश कावलकर आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी व-हाडी तसेच प्रमाण भाषेतील कविता, गझल, चुटकुले सादर करून उपस्थित प्रेक्षकांची दाद घेतली. शेतक-यांच्या समस्या, कापूस पीकाची कोंडी, ग्रामीण तरूणाईचे प्रश्न घेऊन प्रेम, विरह, व्यंग, दु:ख, व्यथा अश्या कविता सादर केल्या.
विविध काव्य संमेलन गाजविणारे, कवीतेसाठी विविध पुरस्कार मिळालेले पाच तरूण प्रतिभावंत कविंचा संच प्रा. रूपेश कावलकर यांच्या सूत्रसंचालनातील हा कार्यक्रम दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरूणाईच्या पुढील प्रश्नांची उकल करून गेला. यामध्ये सुप्रसिद्ध व-हाडी कवी किशोर मुगल, संतोष खडसे हास्य व्यंगाचे सादरकर्ते प्रा. प्रवीण तिखे, गझलकार पुनीत मटकर आणि प्रसिद्ध कवी प्रा. रूपेश कावलकर यांचा समावेश होता. या सर्वांनी दोन तास हास्याची कारंजी महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीत रूजवली.
तिसरा व अंतिम दिवस बुधवार दिनांक २२ फेब्रुवारीला गल्ली ते दिल्ली हा अनुभव कथनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी दिल्ली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे होते. या कार्यक्रमात प्रफुल पाठक, क्षमा पाठक, पत्रकार प्रशांत लिला रामदास, अजय बुवा, गिरीश अवघडे, टेकचंद सोनवणे, रश्मी पुराणिक, निवेदिता वैशंपायन यांनी भाग घेतला. दिल्लीत असुनही आपण आपल्या गावातील गल्लीचे आयुष्य कधी विसरू शकत नाही तसेच दिल्ली जरी देशाची राजधानी असली, केंद्रीय मंत्री मंडळ येथे असले, सर्व राजकीय क्षेत्राच्या मोठया घडामोंडी येथे होत असल्या तरी या दिल्लीतही प्रत्येकाने आपली एक गल्ली बनविली आहे. ती गल्ली तो कधीच विसरू शकत नाही.
ही गल्ली त्याच आयुष्य होते. सुरुवातील येथे आल्यावर खाण्यापिण्याचे होणारे वांदे, भाषेची अडचण, येथील ठगेगिरी, या सर्वांचा अनुभव कथन येथे सांगण्यात आले. दिल्ली राजधानी असल्यामुळे इथला कॅनवास मोठा आहे. विविध राज्यांतील विविध भाषेच्या पत्रकारांशी रोज भेटीगाठी होतात त्यातून समविचारी पत्रकार एकत्र येतात त्यांच्याशी जमलेली गाढ गट्टी, आता ही माणसही आपल्या गल्लीत आली आणि ही गल्ली अधिक रूंद होत असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाची पत्रकारांकडून तसेच उपस्थित प्रेक्षकांकडून मोठया प्रमाणात पसंती देण्यात आली. असा कार्यक्रम वांरवांर ठेवण्यात यावा अशा सकारात्मक सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमाची सांगता अँड. अनंत खेडकर यांच्या मराठी, हिंदी कविता, किस्से व हास्यविनोदांच्या बहारदार कार्यक्रम ‘माझ्याजवळ बसा खुदुखुदु हसा’ ने झाली. त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात कधी हसून हसून डोळयात अश्रू आणले तर कधी आईच्या आठवणीने हदय भरून आले.
वीस एकविस बावीस फेब्रुवारी २०१२ हा तीन दिवसीय ग्रंथोत्सव पुस्तकप्रेमींसाठी मेजवानीच ठरला. दिल्लीत महाराष्ट्र शासनातर्फे असा कार्यक्रम आयोजित होणे प्रकाशकासह वाचक प्रेमींकरिता सुखद अनुभव होता. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साजरा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमांमुळे दिल्ली येथे मराठी तसेच हिंदी पुस्तक प्रकाशित करणा-या नॅशलन बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, सम्यक प्रकाशन, याशिवाय ग्रंथाली प्रकाशन, रसिक प्रकाशन या प्रकाशकांना विशेष आनंद झाला यामुळे त्यांच्या संस्थेतून प्रकाशित होणा-या पुस्तकांना यामाध्यमाने प्रोत्साहन मिळाले तसेच लोकांपर्यंत त्यांची माहिती गेली. महाराष्ट्र शासनाने प्रथमच उचललेले हे पाऊल भविष्यात मैलाचा दगड ठरेल. हा उपक्रम सातत्याने व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या ग्रंथोत्सवाने वाचक, वाचन, प्रकाशक यामध्ये जवळीकता निर्माण करून दिली. त्यामुळे वाचक, वाचन, पुस्तक, प्रकाशकांची मनही यामुळे एकमेंकांशी अधिक जुळली.
अंजु कांबळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment