बचतगट म्हटले की आता नजरेसमोर येते ते शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विशेषत: ग्रामीण भागातील महिलांचे चित्र. या चळवळीच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अनेकांनी आपल्या आयुष्यात कायापालट घडविला आहे. अशाच प्रयत्नांमधून सुरू केलेला दुधाचा व्यवसाय वर्धा जिल्ह्यातील जय अंबिका महिला बचत गटातील सदस्यांसाठी समृद्धीचा ठरला आहे.
देवळी पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली गावातील लोकसंख्या तशी जेमतेमच. येथील १२ महिलांनी संघटिका छाया मनोज चिखलकार यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन जय अंबिका बचतगट स्थापन केला. बचत म्हटले की काटकसर ही आलीच. परंतु त्याचा भविष्यातील उपयोग पटल्याने या गटातील सर्व सदस्यांनी दरमहा ५० रु. बचतीपासून श्रीगणेशा केला. त्यातून बचत करणे आणि आपापल्या गरजा भागविणे या उद्देशांसह एकमेकींच्या सहकार्याने अडचणींवर मात करण्यासही सुरूवात झाली.
कालांतराने गटाला बँकेकडून मिळालेल्या २५ हजार रूपयांच्या खेळत्या भांडवलामधून त्यांनी अंतर्गत कर्जवाटप करण्यास सुरूवात केली. त्यातून रक्कम वाढत गेली आणि थोड्यात अवधीत त्यांनी खेळत्या भांडवलाची परतफेडही केली. त्यानंतर त्यांना म्हशीपालन व्यवसायासाठी १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्याचा ८० हजार रुपयांचा पहिला हप्ता १८ नोव्हेंबर २००९ रोजी मिळाला. त्यामधून प्रत्येक सदस्यासाठी एक याप्रमाणे म्हशी घेण्यात आल्या. उपलब्ध होणारे दूध या महिला गावातीलच डेअरीवर देतात. त्यामुळे उत्पन्नात उत्पन्नात वाढ झाली आणि त्यांनी मिळालेल्या कर्जातून ४१ हजार ४०० रुपयांची परतफेड केली आहे.
महिलांमध्ये उत्साह वाढल्याने कामावर सकारात्मक परिणाम झाला. त्यांचे अंतर्गत आर्थिक व्यवहार, मासिक बचत, अडीअडचणी सोडविणे या बाबी सहजतेने आणि सुरळीत सुरू झाल्या. त्यांच्या बैठका नियमित होऊ लागल्या. या गटातील महिला फारशा शिकलेल्या नाहीत परंतु गटामध्ये एकत्र आल्यामुळे चारचौघींमध्ये बोलण्याचे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण झाले आहे. घरातील सर्व बाबींसाठी केवळ पतीवर अवलंबून न राहता आता त्याही घरखर्चाला मदत करू लागल्या आहेत. कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये आता त्यांचाही वाटा आहे. हा गट स्त्रीशक्ती महिला ग्रामसेवा संघामध्ये सामील झाला आहे.
अल्पावधीतच आपल्या मेहनतीच्या जोरावर या बचतगटाच्या सदस्यांनी आपल्या आयुष्याचा कायापालट घडविला आहे. इतरांसाठी हा निश्चितच मार्गदर्शक आहे.
No comments:
Post a Comment