पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, प्रदूषणाचे गंभीर संकट आदी समस्या विज्ञानाचा कल्पकतेने वापर करीत कशा सोडवता येतील याची मांडणी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या प्रयोगांमध्ये केली होती. वीजनिर्मितीसाठी नवीन पर्याय, सौर ऊर्जा, वाढती लोकसंख्या व नव्या गरजा यांचा विचार करता कोणत्या सेवा देता येतील यांचाही केलेला विचार बाल वैज्ञानिकांच्या प्रयोगातून दिसत होता. बाल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या प्रयोगांतून त्याच्या बुध्दिमत्तेची चुणूक दिसून येत होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. विज्ञान जत्रेच्या अंतर्गत नेचर वॉक आयोजित केला होता. पक्षीनिरीक्षक डॉ. महेश पाटील, डॉ. महेश गायकवाड व अनुज खरे हे मागदर्शनासाठी यावेळी उपस्थित होते. एन्व्हॉयर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सौ. सुनेत्रा पवार याही यावेळी आवर्जून विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होत्या. आपल्या आसपास नित्याने बागडणारे अनेक पक्षी यावेळी अभ्यासकांनी सर्वांना दाखविले.
मानवाची क्रांती कशी होत गेली हे आपण पुस्तकांतून वाचत आलो आहोत, परंतु हे संक्रमण या प्रदर्शनात लेझर शोद्वारे दाखविण्यात आले. सूर्यमाला कशी तयार झाली, पृथ्वीची रचना, गरुड, पोपट, घार इ. पक्षी, डॉयनॉसॉर, जगातील सात आश्चर्ये, सॅटेलाईटच्या वापरामुळे बदलून गेलेले जग, कम्प्युटर मोबाईल वापर, प्रयोगशाळांमधील आधुनिक उपकरणे, संगीताची निरनिराळी वाद्ये, महानकाशा इ. विज्ञान विषयक गोष्टी असा साराच पट या शो द्वारे दाखविला गेला.
प्रदर्शनामध्ये आयोजित केलेल्या नेचर फिल्म फेस्टिव्हलमध्ये पर्यावरण, आसपास दिसणारे पशू-पक्षी, बनस्पतींबाबत मुलांमध्ये प्रेम आणि पालकत्वाची भावना निर्माण व्हावी हा या फेस्टिव्हलच्या आयोजनामागचा आयोजकांचा मुख्य हेतू होता.
या प्रदर्शन व जत्रेस सिक्कीमच्या २२ सनदी अधिकाऱ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर मांडलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून ते भारावून गेले. दररोज ५० हजारांहून अधिकजण या प्रदर्शन व जत्रेला भेट देत होते. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवावर पॅराजंपिंग करणारी जगातील पहिली महिला पद्मश्री पुरस्कार विजेती शीतल महाजन हिने विज्ञान प्रदर्शन व जत्रा पाहण्यासाठी आलेल्या मुलांसोबत गप्पा मारल्या. सिने व नाट्य कलावंत अशोक समर्थ व राहुल कराड यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शरवरी जमेनीस हिने पृथ्वीची व्यथा मांडणारी वसुधात्मिका ही नृत्यसंरचना सादर केली.
सायन्स फिल्म फेस्टिव्हल, हितगुज शास्त्रज्ञांशी, अनुभव कथन नामवंतांचे, पपेट शो द्वारे विज्ञानाची माहिती, अंधश्रध्देमागील नेमके विज्ञान, निसर्ग व विज्ञान विषयक छायाचित्र प्रदर्शन, नकलाकार अंबादास कलकट्टी यांचा नकलांचा व हास्यदर्पण कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमांचीही रेलचेल या जत्रेत होती. शिवाय अम्युजमेंट पार्क व खाऊ गल्लीचे आयोजन यावेळी केले होते. प्रदर्शन व जत्रेच्या समारोप विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या हस्ते झाला. विज्ञानाची कास, तंत्रज्ञानाची आस व माणुसकीचा ध्यास विसरु नका असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. बुध्दीच्या बाबतीत जगात सर्वमान्य ठरावयाचे असेल तर बुध्दी तितकीच तयारीची ठेवली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. शैक्षणिक पाया पक्का केला पाहिजे व कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. याचा उपयोग देशाला होणार आहे. ही वैज्ञानिक व तंत्रज्ञान क्रांती करत असताना सगळे प्रश्न सोडवताना जगाचे भानही राखले पाहिजे. सगळ्या गोष्टींचे संतूलन राखले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री गणेशाला आपण 'त्वम ज्ञानमयो विज्ञान मयोसि' असे म्हणतो. त्याचप्रमाणे या प्रदर्शनात छोटे छोटे बालगणेश विज्ञानमय झालेले दिसत होते. ग्रामीण भागात राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केल्यामुळे या भागातील विज्ञान प्रेमी व विद्यार्थ्यांना जवळून पाहता आले. हे पाच दिवस आमच्यासाठी जणूकाही प्रवणीच म्हणावी लागेल. खूप काही पाहता आले. शिकता आले, अशा भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.
No comments:
Post a Comment