Saturday, February 25, 2012

शिवणकलेतून जुळली घरच्‍यांची मने...!

लग्नापूर्वी शिवणकलेची असलेली आवड आयुष्य घडविण्यासाठी आणि काही कारणांमुळे कुटुंबातील दुभंगलेली मने जुळविण्यासाठीही उपयुक्त ठरली. ही कहानी आहे वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर येथील साधना कांबळे यांची. ढासळत असलेल्या आयुष्याला बचतगटाच्या माध्यमातून आधार मिळाला आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला.

साधना यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कसेबसे जीवन जगणे सुरु होते. परिस्थितीमुळे कुटुंबातील व्यक्तींची मने दुभंगलेली होती. त्या आपली कहाणी सांगतात... अशा परिस्थितीत एके दिवशी माविम सहयोगिनींनी मला बचतगटात समाविष्‍ट करून घेतले आणि गटातील सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. नवीन काहीतरी करायला मिळणार या उद्देशाने मी त्‍यांना होकार दिला. काहीतरी केल्याशिवाय घराचे गाडे चालणार नव्हते. त्यामुळे पुढाकार घेण्‍यास मी तयार झाले. गटाच्‍या माध्‍यमाने व सहयोगिनींच्‍या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्‍यवहार उत्‍तमरित्‍या शिकले. ह्यातून माझा आत्‍मविश्‍वास वाढला. 

मी लग्‍नापूर्वी शिवणकलेचा कोर्स केला होता. मी ठरविले की, गटातून कर्ज घेऊन शिलाई मशीन घ्‍यायची आणि स्‍वतःच्‍या पायावर उभे राहून घरच्‍यांची मने जिंकायची. मी शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगला सुरु आहे. उद्योगामुळे घरच्‍या परिस्थितीला आर्थिक पाठबळ मिळाले. घरच्‍या परिस्थितीत सुधारणा व्‍हायला लागली. त्‍यामुळे माझ्याकडे घरच्‍या लोकांचा पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला. मी आता स्‍वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. गटाचे व्‍यवहार पाहू शकते. घरखर्चात हातभार लावू शकते. या कामी आता पतीचीही चांगली साथ मिळते आहे. 
बचतगटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग सुरु झाला. कपडे शिवता शिवता काही कारणांमुळे कुटुंबातील दुभंगलेली मने जोडली गेली हेच माझे खरे यश आहे.

No comments:

Post a Comment