बचत गट महिलांना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान देतात याची जाणीव झाल्यानंतर बचत गटातील महिलांनी आपल्या कार्यात सातत्य राखले आहे. त्यामुळेच नेटाने प्रयत्न करीत वेगळेपणा दाखविणारा वर्धा जिल्ह्यातील सेलू जवळील बाभूळगावचा विशाखा स्वयंसहायता बचतगट अग्रेसर ठरत आहे.
दुस-या प्रतवारीच्या व्यवसायात या गटातील महिलांनी बकरी पालनाचा व्यवसाय सुरू केला. ३६ बक-या घेऊन त्यांचे सामुहिकरित्या संगोपन तसेच त्याची नियमितपणे होणारी वाढ यावर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवले. त्यांची व्यवस्थित काळजी घेणे, देखभाल करणे या बाबी सर्व महिला स्वत:हून करू लागल्या. बक-यांची संख्या वाढविणे यावर बचत गटाचा भर असून, त्याविषयी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यातच त्यांना कधी कधी नैसर्गिक रोगराईला सामोरे जावे लागते, अशावेळी खचून न जाता त्या आता परिस्थितीचा सामना करायलाही शिकल्या आहेत.
या बचतगटाचा हिशेब व्यवस्थित राखला जात आहे. तसेच गटातील सदस्यांचा परस्परांशी व्यवहार सुद्धा चांगला आहे. त्यांचे हे संबध आता बचतगटापुरते मर्यादित नसून किंवा फक्त आर्थिक बाबींपुरते संकुचित नसून या व्यवसायाच्या माध्यमातून त्या एकमेकांच्या कुटुंबाशी जोडल्या गेल्या आहेत.
एकमेकांच्या संकट प्रसंगी गरजेनुसार त्या एकमेकांच्या पाठीशी उभ्या राहतात. बचत गटातील व्यवहाराचा भार हा एका व्यक्तीवर न टाकता सामुहिकरित्या उचलतात. तसेच गटातील कमी शिक्षित महिलेला दुय्यम वागणूक न देता त्यांना सर्वांमध्ये सामावून घेतले जाते. बचतगटात वयोवृद्ध महिलेचा मान ठेवणे, आदर करणे ह्या गोष्टी त्या समजून घेतात व अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांच्यामध्ये भावनिक नाळ जुळलेली आहे. त्यातून त्या एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत आहेत. बचतगटातील त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही निर्णय त्या सर्वानुमते घेतात. त्यासाठी दर महिन्याला न चुकता त्यांची बैठक होते. या बैठकीस गटातील सर्व महिला उपस्थित राहतात हे ही विशेष. त्यांची होणारी बचत ही नियमित असून, ते बचत गटाचा हप्ताही नियमित भरतात. तसेच बचत गटातील महिलांना हवे असलेले कर्ज ते सर्वानुमताने निर्णय घेऊन देतात. कधी शिल्लक कमी आणि वाटप जास्त असेल तर सदस्यांच्या गरजेनुसार ते कर्जवाटप करीत असतात. कर्ज वाटप झाल्यानंतर परतफेडीचे हप्ते सदस्य नियमितपणे भरतात.
त्यांचा सामाजिक कार्यात सुद्धा चांगला सहभाग आहे. त्या ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेतात. गावात होणा-या राष्ट्रीयदिनाच्या समारंभात सुद्धा सहभाग नोंदवितात. त्यातूनच त्यांच्या विचारशक्तीत भर पडत आहे.
महिलांच्या अधिकाराचा एक भाग म्हणून त्यांच्यात राजकीय जागृती झालेली आहे. त्यामुळेच त्या ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये न चुकता मतदान करण्यास जातात.
त्यांच्या या गटाचे काम बघून यंदा पुरस्कारासाठी या गटाची शिफारस झाली आहे हे विशेष.
No comments:
Post a Comment