राज्यात अद्यापपर्यंत एकूण ३६ राष्ट्रीय मोहीमा व ५१ उपराष्ट्रीय मोहीमा राबविण्यात आल्या आहेत. सन २०११ या वर्षात जानेवारी व डिसेंबर, २०११ या कालावधीत राज्यात एकूण २ राष्ट्रीय व ६ उपराष्ट्रीय माहिमा राबविण्यात आल्या. यावर्षी देखील १९ फेब्रुवारी व १५ एप्रिल २०१२ या दिवशी सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेविषयी व एकंदरीतच पोलिओ विषयी माहिती देणारा हा लेख...
सन २०११ मध्ये देशात फक्त १ पोलिओ रुग्ण पश्चिम बंगाल राज्यात जानेवारी २०११ मध्ये आढळून आला आहे. पोलिओ निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून ते सन २०११ या वर्षात प्रथमच एवढ्या कमी संख्येने पोलिओचे रुग्ण आढळले आहेत.
यावर्षीच्या पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख ९७ हजार ६७२ बालकांना पोलिओची अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये पोलिओ लसीचे दोन थेंब प्रत्येक बालकाला पाजण्यात येणार आहेत.
राज्यात पोलिओ निर्मुलनासाठी राज्य शासनाने उपाययोजना मोठ्या प्रमाणावर केली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, नासिक जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी राष्ट्रीय पोलिओ लसीकरणा मोहीमेसोबतच उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमही हाती घेण्यात येते. मालेगाव, भिवंडी, बीड याठिकाणी शासनाने विशेष लक्ष केंद्रीत करून लसीकरण मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
नियमित लसीकरण कार्यक्रम :-
• नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा सत्रांच्या माध्यमातून पोलिओ व इतर विविध लसी देण्यात येतात या कार्यक्रमामध्ये खाजगी वैद्यकिय व्यावसायीकांचाही सहभाग घेतला जातो. १ वर्षाचे आतील बालकांना ६ आठवडे, १० आठवडे व १४ आठवडे या वयोगटात प्रत्येक वेळी पोलिओचा एक डोस असे ३ डोस असे एकूण ३ डोस देण्यात येतात. पोलिओचा बुस्टर डोस १६ महिने ते २४ महिने या वयोगटात देण्यात येतो. ही लस तोंडावाटे देण्यात येते.
एएफपी सर्व्हेलन्स :-
• १५ वर्षाखालील बालकांमधील अचानक आलेला लुळेपणा हे संशयित पोलिओचे लक्षण असते. त्यामुळे सर्वेक्षण करुन संशयित पोलिओचे रुग्ण शोधून काढण्यात येतात. सर्व शासकिय रुग्णालय, प्रा.आ.केंद्रे, अशासकिय/ खाजगी बालरुग्णालये यांचेकडून अचानक लुळेपणा उद्भवलेल्या रुग्णांची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्यात येते व सर्व जिल्ह्यातून प्रत्येक आठवड्यास ही माहिती राज्य कुटुंब कल्याण कार्यालयास प्राप्त होते.
• अचानक लुळेपणा आलेल्या रुग्णाची माहिती कळताच ४८ तासाचे आत जिल्हा लसीकरण अधिकारी / एसएमओ हे रुग्णाची तपासणी करतात. रुग्णाचे दोन शौच नमुने २४ तासाच्या आंत तसेच रोगाची लक्षणे दिल्यापासून १४ दिवसांचे आत घेवून ते तपासणीसाठी शितसाखळीमध्ये एन्टेरो व्हायरॉलॉजिकल रिसर्च सेंटर परळ मुंबई येथे पाठविण्यात येतात.
दि. १९ फेब्रुवारी २०१२ रोजी घेण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी अशा प्रकारे करण्यात येणार आहे. :-
• मोहिमेच्या पहिल्या दिवशी बुथवर लसीकरण करण्यात येऊन नंतर घरभेटीद्वारा बुथवर लस न दिलेल्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.
घरभेटीतील काम :-
• असंरक्षित बालके शोधून काढणेसाठी प्रत्येक घराला भेट देण्याकरिता घरभेटीची पथके तयार करण्यात येवून त्याद्वारे त्यांना पोलिओ लस देण्यात येईल. एकही बालक असंरक्षित राहणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्यात येईल.
• त्याशिवाय रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, विमानतळ, मंदिरे, बगिचे, टोल नाके, तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी ट्रांझिट टिममार्फत पोलिओ लसीकरण करण्यात येईल.
• गावाबाहेरच्या/ शहराबाहेरच्या तुरळक वस्त्या, वीटभट्या, उसतोड कामगार वस्त्या, बेघर व फुटपाथ वरील लाभार्थी यांचेकरिता फिरत्या पथकांद्वारे लसीकरण करण्यात येईल.
• मुंबई व इतर शहरामध्ये रात्रीची पथके कार्यरत राहाणार आहेत.
पल्स पोलिओ मोहीमे विषयी...
• ५ वर्षाखालील सर्व बालकांना एकाचवेळी पोलिओ लसीचा अतिरिक्त डोस देणे हे पोलिओ निर्मूलनातील महत्वाचे सुत्र होय. पल्स पोलिओ मोहीमेत या सर्व बालकांना एकाच वेळी पोलिओ लसीचा डोस दिला जातो. त्यामुळे वाईल्ड पोलिओच्या विषाणूंचे संक्रमण रोखण्यात मोठी मदत मिळते. तसेच बाळाच्या आतड्यांमध्ये वास्तव करणारे वाईल्ड विषाणूंचे निष्कासन शक्य होऊन त्यांची जागा लसीचे विषाणू घेतात.
• पल्स पोलिओ मोहीमेत पोलिओ लसीचे किमान दोन डोस ४ ते ६ आठवड्याच्या अंतराने देणे आवश्यक असते.
पोलिओचे विषाणू
• पोलिओ लसीचे विषाणू तीन प्रकारचे असतात. पी - १, पी - २, पी-३ यापैकी पी - २ चे निर्मूलन १९९९ पासून झालेले आहे.
पोलिओ लस केव्हा देऊ नये?
• पोलिओ लस अत्यंत सुरक्षित असल्याने सर्व बालकांना देता येते. केवळ अत्यंत आजारी (Critically ill Child) बालक असेल तरच त्याला पोलिओ लस देवू नये. आजार बरा झाल्यावर पोलिओची लस द्यावी.
• पाच वर्षाच्या आतील एक जरी मुल पोलिओ डोस घेण्याचे राहिले तरी त्या बाळाबरोबर इतरांना पोलिओची लागण होऊ शकते. म्हणजेच एक मुल जरी डोस शिवाय राहिले तर आपले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील म्हणून आपल्या मुलाला पोलिओ होऊ नये व त्याच्यापासून इतरांना होऊ नये यासाठी या तारखांना प्रत्येक आई वडीलांनी आपल्या पाच वर्षाच्या आतील बाळाला पोलिओचा डोस नव्हे तर दो बुँद जिंदगीके देणे आठवणीने आवश्यक आहे.
पोलिओ लसीची संरक्षक क्षमता
• पोलिओ लसीचे तीन डोस घेतल्यानंतर ६० ते ७० टक्के बालके संरक्षित होतात. मात्र १०० टक्के संरक्षित होण्यासाठी १० डोस देखील लागू शकतात. त्यामुळे नियमित लसीकरणांतर्गत दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसीबरोबरच पल्स पोलिओ मोहीमेत दिले जाणारे डोसही तेपढेच महत्वाचे आहेत.
No comments:
Post a Comment