हुरडा, कोवळा लुसलुसीत.गुळभेंडीचा, कुचकूचीचा. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यानं खवय्यांची हौस भागवणारा. नातेसंबंधांचे आणि मैत्रीचे धागे अधिक दृढ करणारा. हा हुरडा म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातलं एक सांस्कृतिक संचितच आहे. .
हुरड्याचे दिवस आले की घरी शेती असेल तर स्वत:च्या शेतात नाही तर मित्र-मैत्रिणींच्या शेतात 'हुरडा पार्ट्या' रंगायला लागतात. निसर्ग व कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी ही या 'हुरडा पार्ट्या'चे आयोजन करण्यात येत आहे. 'अगं माहितीय नं उद्या आपल्याला हुरडा खायला जायचंय शेतात' असं म्हणत अशाच एका 'हुरडा पार्टीचा बेत घरच्यांनी आखला. घरातील सगळी नातीगोती एकत्र येतील अन या निमित्तानं एक छानसं 'गेट टुगेदर' ही होऊन जाईल हा हेतू. या निमित्ताने सुखदु:खाची देवाणघेवाण होते. मदतीचे अनेक हात पुढं येतात आणि आयुष्यभराची सोबत करणारी नवी नातीही यातून निर्माण होतात.
मोहरलेल्या आंब्याच्या सोबतीनं काळ्याशार मातीची ढेकळं तुडवत हुरडा खाण्यासाठी जाताना ज्याला आपण आता 'निसर्ग पर्यटन' म्हणतो त्याची किती चांगली तजवीज माणसानं फार पूर्वीपासून करुन ठेवली आहे हे लक्षात येतं होतं. भरलेली पण कोवळी कणसं आगटीत भाजून ती हातावर चोळली किंवा पोत्यावार बदडली तर ज्वारीचे जे दाणे बाहेर येतात त्याला 'हुरडा' म्हणतात. असा कोवळा-गोडसर हुरडा खाण्याची चव आणखी वाढते ती त्यासोबतच्या चटण्यांनी. तीळाची, लसणाची, शेंगदाण्याची, खोबऱ्याची तिखट चटणी, गूळ, दही, रेवड्या हे त्याचे चविष्ट साथीदार.
हुरड्याच्या एका घासासोबत चटणीची मिमूट तोंडात टाकली की येणारी मजा काय सांगावी ? सोबत गावरान बोरांची लज्जतही न्यारीच. तोडून आणलेले ज्वारीचं कणीस मडक्यात लावलेल्या घट्ट दह्यात भिजवून ते भाजायचं. नंतर हातावर चोळायचं किंवा जमिनीवर बडवायचं. या आंबट-गोड हुरड्याची चवही बराच काळ जीभेवर रेंगाळत राहिली नाही तर नवलच. हुरडा तर हुरडा ज्वारीचं कोवळं ताटं ऊसासारखं सोलून खाण्याची मजाही काही औरच.
ज्वारीच्या हुरड्याप्रमाणे याच काळात गव्हाच्या 'ओंब्या' भाजून 'हुळा' खाण्याचा तसेच ज्याला मराठवाड्यात 'टहाळ' म्हणतात तो हरभरा भाजून खाण्याचा आनंदही खूप वेगळाच. पिझ्झा बर्गर खाणाऱ्या आजच्या मंडळींना या रानमेव्याचा चविष्ट स्वाद आवर्जून चाखतो यावा म्हणून अलिकडच्या काळात या कौटुंबिक हुरडा कार्यक्रमास व्यावसायिक रुपदेखील आलं आहे. अनेक शेतकरी आता आपल्या शेतात 'हुरडा पार्ट्या' आयोजित करताना दिसू लागले आहेत. ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे ज्वारीची कणसं विकायची, ती भाजायची आणि सोबतच्या चटण्यांच्या प्रकारासह हुरडा खाण्याचा आनंद खवय्यांना उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम आता एक छानसा व्यवसायही होऊ लागला आहे. हुरडा जेवढा चविष्ट तेवढीच त्याची पेज ही रुग्णांसाठी पौष्टिक असल्यानं उकडलेल्या हुरड्याची पेज घेणं आजही गुणकारी समजलं जातं.
हुरडा खाण्याची वेळ साधारणत: सकाळी आठपासून अकरापर्यंतची असली तरी एकदा रानात गेलेली माणसं दिवस अस्ताला गेल्यानंतरच घरी परतात हे विशेष. सकाळच्या हुरड्याप्रमाणंच दुपारचं चुलीवरचं कांदा-भाकरीचं जेवणही तितकच स्वादिष्ट लागतं. याचा अनुभव घेताना कामाचा सारा शीण नाहीसा झाला.
या ठिकाणी विविध स्वरुपात मनोरंजनाची सोय करुन देण्यात आली होती. फार पूर्वीपासून याची मजा काही औरच आहे. खेळ-गाण्यांच्या चढाओढी, झाडावर चढणं, झोका खेळणे, बैलगाडी चालवणे यासारखे खेळ तर अंताक्षरीपासून कोड्यापर्यंत बुद्धीचातुर्य पणाला लावणारे शब्दखेळ अनेकदा अनुभवले आहेत. 'पडेल हस्त तर पिकेल मस्त' ही हस्त नक्षत्रातील पावसाची महती सांगणारी म्हण असो किंवा 'घाम गाळा कण कण धान्य येईल मण मण' अशी कष्टाची महती सांगणारी म्हण असो, शेतामध्ये राबणाऱ्या बाईच्या तोंडून ऐकताना तिचं जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान प्रकर्षानं स्पष्ट झालेलं दिसून येतं होते.
हुरडा खाऊन झाला की. मग रंगलेल्या मैफलीत अचानक समोरच्या माणसाची हुशारी तपासून पाहण्याची लहर येत होती आणि तो त्याला कोडं टाकत म्हणतो, 'काळ्या रानी रोवला फोक, त्यावर बसले हजार लोक,' सांगा पाहू याचं उत्तर ? बराच वेळ बुद्धीला ताण देऊनही उत्तर आलं नाही तर हार पत्करुन 'नाही येत तुम्हीच सांगा बाबा' असं म्हणताच अरे ज्याचा तुम्ही हुरडा खाताय ते ज्वारीचं कणीस एवढंही कळत नाही असं म्हणत एकमेकांच्या बुद्धीचातुर्याचे वाभाडे काढले जात होते.
कामाच्या निमित्तानं गावाकडची माणसं आता पांगू लागली असली तरी त्यांच्या मनात त्यांचा गाव नेहमीच वसलेला आणि गजबजलेला असतो. त्याची त्यांना सतत ओढ असते. निसर्ग व कृषी पर्यटनाच्या निमित्ताने ही संधी चालून येताच त्याची पाऊलं आपोआप गावाची वाट धरतात कारण 'रानबोली' चे हे शब्द त्याच्या मनात सातत्याने रुंजी घालत असतात. मनातली हीच हिरवाई त्यांना जगण्याची नवी उमेद देत राहते.
No comments:
Post a Comment