जिद्द, चिकाटी आणि प्रबळ आत्मविश्वास यांची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या महिलांनी याच गुणांच्या बळावर बचत गट चळवळ पुढे नेली आहे. बचत गटाच्या माध्यमातून एकत्रितपणे जीवनातील अनेक समस्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य महिलांना प्राप्त झाले आहे. अडचणीतून वाट काढीत आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने आश्वासक वाटचाल सुरू करण्यास ही चळवळ उपयुक्त ठरली आहे. रत्नागिरीतील सम्यक संकल्प स्वयंसहायता बचत गटाचे कार्य पाहिल्यावर याची प्रचिती येते.
गटातील महिला प्रारंभी केवळ घरकामात गुंतून राहात असत. मात्र एका मासिकातील लेखाने त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. या लेखातून बचत गटाची माहिती मिळाल्यावर सत्यशीला पवार यांनी महिलांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रारंभी या कार्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र गटाचे फायदे महिलांना समजाविण्याचे प्रयत्न सुरू ठेवल्याने शेवटी त्याला फळ येऊन महिला एकत्र आल्या आणि १४ एप्रिल २००७ रोजी सम्यक संकल्प स्वयंसहायता बचत गटाची स्थापना करण्यात आली.
गटाच्या सदस्यांनी प्रारंभी स्वत:च्या बचतीतून व्यवसायाची सुरूवात केली. येणारा पैसा व्यवसायासाठी उपयोगात आणताना काटकसरीने व्यवहार करण्यावर गटाने भर दिला. अल्पावधीतच गटातर्फे तयार होणाऱ्या उत्पादनांची संख्या वाढत गेली. आता या गटामध्ये २० महिला एकत्रितपणे काम करीत आहेत. फिनेल, लिक्वीड साबण, अगरबत्ती, सेंट ही उत्पादने तयार करुन त्यांची विक्री करणे तसेच समारंभांसाठी जेवणाच्या ऑर्डर घेणे ही सर्व कामे या महिला चोख पार पाडतात. दरमहा दुसऱ्या शनिवारी गटाची सभा घेतली जाते. या सभेमध्ये महिलांच्या अडचणी, कामाचे वाटप, कर्जवाटप इत्यादी विषयी चर्चा केली जाते.
गटाच्या अध्यक्षा श्रीमती पवार गटाच्या आर्थिक व्यवहारामध्ये स्वत: जातीने लक्ष घालतात. बांधकाम खात्यामध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर कार्य केल्याने कामाचा अनुभव बचतगटाच्या व्यवस्थापनासाठी उपयोगी पडतो, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. परिसरातील गरज ओळखून कामाच्या स्वरूपात गटाने सातत्याने बदल केला आहे. नुकताच बचतगटाने रोपांची लागवड करण्याचा एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. फिनोलेक्स कंपनीमार्फत ५०० रोपे तयार करुन देण्याची ऑर्डर या बचतगटाला मिळाली असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमात गटाच्या सर्व महिला सदस्या उर्त्स्फूतपणे सहभागी होत आहेत.
बचतगटाच्या माध्यमातून एकत्रित सहभागामुळे जीवनात येणाऱ्या विविध प्रश्न व समस्यांना विश्वासाने सामोरे जाण्याचे धाडस आज महिलांकडे आले आहे. याचबरोबर महिला स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवित आहेत, असे सांगताना श्रीमती पवार यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे जाणवतो.
बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या महिलांना चांगला रोजगार मिळत आहे. या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक प्राप्तीमुळे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब प्रमुखाची जबाबदारी अनेक महिला पार पाडत आहेत. यातूनच आर्थिक प्रगतीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही वाव मिळत आहे.
No comments:
Post a Comment