कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी येथील अधिवेशनात आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक एम. तुपकर यांची भेट झाली. तत्पुर्वी जिल्हा मुख्यालयात शासकीय बैठकींसाठी उपस्थित असतांना एक दोन वेळा तोंडओळख झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुर्वेद महाविद्यालय असतांना आणि संपूर्ण कोकणात प्रचंड मोठय़ा प्रमाणात वनौषधी असतांना त्या महाविद्यालयाकडे पहाण्याचा दृष्टीकोन अजूनही फारसा चांगला नसल्याचे जाणवले. वेळ काढला आणि एका सायंकाळी संपूर्ण महाविद्यालय फिरून घेतल. याच भेटीत डॉ. डि.के. परिदा यांची ओळख झाली. आणि अवघ्या पाच मिनीटात त्यांनी सुरु केलेल्या कामाबद्दल कुतूहल निर्माण झाल.
कामाच्या गडबडीत ही सारी घटना मी विसरून गेलो होतो. कामाचा वाढता व्याप, कोकणातील बदलणारे हवामान आणि वाढते वय यामुळे शरीरावर कोठेतरी परिणाम होतोय याची जाणीव व्हायला लागली. अचानक घाम येऊन जिना चढतांना होणारा त्रास धोक्याची घंटा देऊ लागला होता. ऍलोपॅथीपेक्षा आयुर्वेद उपचार करावा असा सल्ला अनेक डॉक्टर मित्रांनी मला दिला आणि आचारसंहितेचा चांगला मुहूर्त पाहून मी थेट डॉक्टर डी.के. परिदा यांची भेट घेतली. प्राथमिक तपासण्या केल्या आणि त्यांच्याच सल्ल्यानुसार पंचकर्मातील एक प्रकार विरेचन करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दहा सलग दिवस या उपचारामुळे बराच फायदा झाला.
आयुर्वेदात पंचकर्माचे पाच प्रकार आहेत. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण. प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळा उपचार म्हणून केला जातो. मी पंचकर्म करतोय असे म्हटल्यानंतर अनेकांना केवळ वमनाच्या पलिकडे काही माहिती आहे असे वाटले नाही. शरिरातील पित्त, टॉक्सीन, यकृत, लहान व मोठे आतडे, डोकेदुखी, मधुमेह, अस्थमा, त्वचेचे आजार आणि अनावश्यक असलेले वजन कमी करणे यासाठी विरेचन केले जाते. त्याचा फायदा शास्त्रशुध्द उपचार पध्दतीने निश्चित होतो.
मुळात साडेपाच वर्षाची आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर तात्काळ पंचकर्माच्या पाटय़ा लावणारे अनेक डॉक्टर माझ्या परिचयाचे आहेत. वमन उपचार पध्दतीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या देखील कमी नाही. आयुर्वेदाला अनुभव आणि शास्त्रशुध्द उपचार पध्दतीची गरज खूपच अत्यावश्यक आहे. वेदकालीन चिकित्सा पध्दती आयुर्वेदाचा उल्लेख होतो तो ही यासाठीच. जागतिकीकरणाचे वारे जसे समाज मनावर परिणाम करू लागले. त्यात वैद्यकीय क्षेत्र देखील अपवाद नाही. कट प्रॅक्टीसच्या नावाखाली चालणारे प्रकार तर आता राजमान्य होऊ लागले आहेत. डॉक्टर पासून तर थेट मेडीकलशॉप पर्यंत असणारी लिंक आता सहज नजरेस पडते. अशा या वातावरणात आयुर्वेदातील शुध्दपणा जपणारे महाविद्यालय आणि तेथील डॉक्टर पाहून आश्चर्यच वाटले. चरकसहिंतेत म्हटल्याप्रमाणे जीवन हे शरीर, ज्ञानेंद्रिय व मन यांचे एकत्रीकरण असून ते आत्म्याचे पुनरुज्जीवन आहे. आयुर्वेद हे जीवनाचे महत्वाचे धार्मिक विज्ञान आहे. हे या जगात व जगापलीकडेही फायदेशीर आहे. हे अगदी खरे आहे कारण स्वत:ला जाणून घेण्याचे आणि स्वत:ला प्राकृत करण्याचे विज्ञान म्हणजे योग व आयुर्वेद आहे.
अन्नाला पूर्णब्रम्ह म्हणतात. ब्रम्हाला अन्न हा पहिला संस्कृत शब्द आहे. अन्नापासून सर्व प्राणीमात्रांचा जन्म झाला आहे. ते अन्नामुळेच जगतात व अन्नातच परततात असे तैतरिय उपनिषदमध्ये म्हटले आहे. अलिकडे खाण्यावरील अनियंत्रण सात्विक अन्नाचा अभाव, कच्चा अन्नाचा वापर यामुळे अनेक आजार उद्भवतात. मासांहारी अन्नामुळे आणि फास्टफुडमुळे देखील आजार उत्पन्न होतात. त्याची माहिती सर्वसामान्य माणसाला असून देखील त्या दृष्टीने तो वागत नाही. त्यामुळे आजार होतात.
डॉ. परिदांशी बोलतांना अनेक गोष्टी समजत होत्या. आतापर्यंत त्यांनी १० हजाराच्या वर विरेचन पध्दतीचा वापर रुग्णांवर केला आहे. बस्ती, वमन, नस्य आणि रक्तमोक्षण उपचार पध्दतीतही त्यांनी केलेले उपचार देशपातळीवर संशोधकांना उपयुक्त असे ठरणारे आहेत. उपलब्ध साधनसामग्री आणि अपूरा कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे उपचार सुरु आहेत. सतीश चव्हाण आणि महादेव सावळ यांच्या मदतीने विविध प्रकारच्या मालीश यशस्वीपणे पूर्ण केल्या जातात. पुणे-मुंबई येथे या उपचारासाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. सावंतवाडीतील वैद्यकीय महाविद्यालयात मात्र अवघ्या २ हजार रुपयात संपूर्ण उपचार पूर्ण होतो.
जेथे पिकते तेथे विकत नाही. असेच म्हटले तर वावग होणार नाही. आज अनेक घातक औषधांच्या मार्यामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. साध्या साध्या रोगालाही माणूस बळी पडतो. हे टाळण्यासाठी शरीरातच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून चांगले आरोग्य जगता येऊ शकते. विशेषता चाळीश नंतर येणारे आजार वेळीच टाळायचे असतील तर आजाराची पूर्व काळजी घेण आवश्यक आहे. चाळीशी नंतर आहारशास्त्र, व्यायामशास्त्र, कामजीवन, मृत्युसंकल्पना आणि अर्थकारण याबद्दल इच्छा असो की नसो विचार करावाच लागतो. आई-वडीलांचे वृध्दत्वातले आजारपणातले खर्च जेव्हा आपल्या चाळीशीत समोर येतात. तेव्हा आपल्या वृध्दत्वात हा खर्च टाळता येईल का याचा विचार करत असतांना हेल्थ कॉन्शस ही संकल्पना कळत नकळत पुढे येते आणि त्यातून उपचार पध्दती सुरु होते.
दिर्घायुक्तम अर्थववेदातील कांड १९ मध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही शंभर शरद ऋतू पहावे. आम्ही शंभर शरद ऋतू जगावे. आम्ही शंभर शरद ऋतू अनुभवावे. आम्ही शंभर शरद ऋतू उत्कर्ष पावावे. आम्ही शंभर शरद ऋतू पुष्ट व्हावे. शंभराहून अधिक शरद ऋतू असावे. अशा दिर्घायुषी जगण्याच्या कल्पनेसाठी आणि बदलणार्या चाळीशीला दूर करत एकदा तरी विरेचन प्रक्रिया करायला काय हरकत आहे ?
No comments:
Post a Comment