Tuesday, February 7, 2012

स्वच्छतेसाठी अनोखा उपक्रम

स्वच्छतेचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शाळेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेतील कच-याच्या साफसफाईसाठी शाळेत दोन मिनिटांचा नाशिक ढोल वाजविला जातो. या दोन मिनिटाच्या वेळेत शाळेत तसेच परिसरात पसरलेला हा कचरा साफ होतो. त्यानंतर शाळेत ज्ञानदानाचे कार्य सुरू होते. हा अनोखा उपक्रम जिल्ह्यातील पुसद येथील कोषटवार दौलतखान या विद्यालयाने सुरू केला आहे.

पाचवी ते बारावीचे वर्ग असलेल्या या शाळेत ४९ तुकड्या व सुमारे ३ हजार ५०० विद्यार्थी आहेत. नेहमीच भेडसावत असलेली कागदी कच-याची समस्या मार्गी लागावी यासाठी विचारमंथन सुरु होते. अशातच एका शिक्षकाने नाशिक ढोलची कल्पना मांडली आणि मुख्याध्यापक रविंद्र आमले यांनी ती कल्पना लगेच प्रत्यक्षात आणली.

आता दररोज प्रार्थना संपताच सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जातात व लगेचच सुरु होतो दोन मिनिटांचा नाशिक ढोल. नाशिक ढोल वाजेपर्यंत वर्गातील प्रत्येक विद्यार्थी वर्गातील केरकचरा बाहेर कचरा कुंडीत आणून टाकतात. दोन मिनिटांचा ढोल वाजणे बंद होताच सर्वजण आपली जागा घेतात आणि त्यानंतर ज्ञानदानास सुरूवात होते. अवघ्या दोन मिनिटात शाळेची साफसफाई करण्याचा हा उपक्रम परिसरात अनोखा उपक्रम म्हणून परीचित झाला आहे. शाळेच्या या उपक्रमाची ओळखच ‘स्वच्छता ढोल’ अशी झाली आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही स्वच्छतेची आवड निर्माण झाली आहे. या निमित्ताने शाळा विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार रूजवत आहे. या शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. कॉपी दाखवा ५० रुपये मिळवा यासारखे अन्य अनेक उपक्रमही शाळेत राबविले जात असल्याची माहिती मुख्याध्यापक आमले यांनी दिली. या कामी त्यांना आशा चापके, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत लामकाणीकर, अनिल जोशी, नंदकुमार वायकोस सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. या शाळेचे उदाहरण इतरांसाठीही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.

No comments:

Post a Comment