स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिला आता एकत्र येऊन स्वावलंबी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. ग्रामीण भागातही बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळते आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जवळ मारळ गावातील विश्वकर्मा महिला बचतगटाने लाखांच्या घरात व्यवसाय करून आपल्या व्यवसाय कौशल्याची चुणूक दाखवितानाच महिलाशक्तीचे दर्शन घडविले आहे.
देवरुख येथील मातृमंदिर या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने मारळ गावातील ११ महिलांनी एकत्र येऊन २२ ऑगस्ट २००६ ला विश्वकर्मा महिला बचतगटाची मुहूर्तमेढ रोवली. विविध प्रकारचे पापड, घरगुती लोणचे, भाजणी, नाचणीचे पीठ, गोड आमसूल, हातसडीचे तांदूळ इत्यादी पदार्थ तयार करुन विक्री करण्याचे काम या महिला बचतगटाच्या माध्यमातून करू लागल्या. कच्चा माल आणि भांडवलाची समस्या त्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर सोडविली. अल्पावधीतच बँकेकडून दोन लाखांचे कर्ज मंजूर झाले. कर्ज मिळाल्याने वाढलेल्या आत्मविश्वासामुळे व्यवसायाला अधिक चालना मिळाली आणि मग या बचतगटाने मागे वळून पाहिले नाही.
प्रारंभी उत्पादनाची विक्री पंचक्रोशीतच केली जाई. मात्र उत्पादन वाढीसोबतच विक्री वाढविण्यासाठी महिलांनी प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी आयोजित प्रदर्शनात आपली उत्पादने मांडण्याची धडपड गटाच्या सदस्यांनी केली. त्याला अल्पावधीतच यशही आले. गतवर्षी नवी मुंबई-बेलापूर येथे आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनात विश्वकर्मा बचतगटाने दुस-यां क्रमांकाची सुमारे रुपये १ लाख ४० हजारांची विक्री करुन जिल्ह्यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले.
बचतगटाचे सर्व आर्थिक व्यवहार अध्यक्षा सुरेखा पांचाळ बघतात. दरमहा ५ तारखेला गटातील महिलांची बैठक घेऊन गटातील महिलांच्या समस्या, आर्थिक व्यवहार, मालाची विक्री याबाबत चर्चा केली जाते. या उत्पन्नातून मासिक प्रत्येकी ५० रुपये बचत करून व्यवसायाच्या भविष्यातील विस्ताराचा विचारही महिला करीत आहेत.
पापड, लोणची विक्री व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून या बचतगटाने मार्लेश्वरच्या पायथ्याशी रसवंतीचे दुकान सुरू केले आहे. उसाच्या रसासोबत कोकम सरबत आणि बचतगटातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू देखील विक्रीला ठेवल्या जातात. प्रत्येक सदस्याने आपले काम वाटून घेतले आहे.
बचतगटामुळे ग्रामीण भागातील महिलांना सक्षम होता आले. एका चौकटीबाहेर पडून महिला स्वत:चा विकास साधत आहेत, हे सांगताना सुरेखा पांचाळ यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसून आली. भविष्यात स्वत:चे विश्वकर्मा मंडळ तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मारळसारख्या ग्रामीण भागात शेती, गुरे सांभाळून बचतगटाद्वारे यशस्वी व्यवसायाचा एक आदर्श विश्वकर्मा बचतगटातील महिलांनी अन्य बचतगटांसमोर ठेवला आहे.
No comments:
Post a Comment