वर्धा जिल्ह्यात बचतगटांनी उत्पादित केलेल्या सर्व पदार्थांना ‘वर्धिनी’ ब्रँड नेम देण्यात आले आहे. घरात हळद, तिखट, शेवया, सरगुंडे आदी पदार्थ विशिष्ट मानकानुसार तयार करायचे आणि वर्धिनी ब्रँडखाली एकाच पद्धतीच्या पॅकिंगमध्ये विक्री करायची असा नवा विपणन कार्यक्रम जिल्ह्यात सुरु झाला आहे.
या उत्पादनांना आपल्या बचतगटात बनविणारा आणि खात्रीची बाजारपेठ मिळविणारा एक बचतगट साखरा येथे आहे. ‘क्रांती’ स्वयंसहायता महिला बचतगट असे त्याचे नाव.
गटाच्या कामकाजाबद्दल उत्सुकता वाटणे साहजिकच आहे. त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तेथे भेट दिली असता गटाच्या महिलांनी स्वतःच माहिती दिली. सप्टेंबर २००७ मध्ये या गटाची स्थापना झाली. या गटाचे खाते कोरा येथील बँक ऑफ महाराष्ट्रा च्या शाखेत काढण्यात आले आणि बचतीच्या पैशामधून गटातील महिलांनी आपल्या घरगुती गरजा भागविणे सुरु केले.
सुरूवातीला गटातील प्रत्येक महिलेला आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही सर्वांनी छोटे उद्योग, जसे मेणबत्ती, धूपबत्ती, अगरबत्ती आदी बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. वर्धा जिल्ह्यात असलेल्या वर्धिनी ब्रँडमुळे आमच्या गटाकडून बनविल्या गेलेल्या वस्तूला बाजारपेठही मिळाली आणि त्यातून आमचा व्यवसायही वाढत गेला. वर्धिनीमुळे वस्तू कशी विकायची ही कला आम्हालाही आत्मसात झाली.
कालांतराने आम्ही महिलांनी एकत्र येऊन बचतीचा हप्ता वाढवून घेतला. थोडा आत्मविश्वास आल्यानंतर आम्ही मोठ्या उद्योगासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. त्यासाठी कर्जाचा प्रस्ताव तयार केला. मे २०१० ला बँकेकडून १ लाख रुपये मिळाले. ज्यातून आम्ही आटा चक्की, कांडप मशीन सुरु केली. आजच्या स्थितीत संपूर्ण गाव आमच्या गिरणीवर दळण दळतात. उत्पन्नाची आवक चांगली चालू आहे. त्याचबरोबर गावातील शेतकऱ्यांची हळद मिरची ठोक भावाने घेऊन बारीक करुन वर्धिनी ब्रँड अंतर्गत पॅक करुन विकणे, मसाले, लोणचे, साबण, वन औषधी, चकली, सरगुंडे तयार करुन विकणे आदी कामे सुरू झाली. या पदार्थांच्या विक्रीसाठी गटाच्या महिला स्वतः जाऊ लागल्या आहेत.
गटामुळे महिलांमधला आत्मविश्वास वाढीस लागला. महिन्याच्या २ तारखेला गटाची मिटींग न चुकता होऊ लागली. त्यात छोट्या मोठ्या प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा होऊ लागली. महिलांचे अस्तित्व गावात, समाजात जाणवू लागले.
बचतगटाच्या माध्यमातून आत्मविश्वास प्राप्त झाल्यानंतर आर्थिक स्थैर्य मिळाले आणि समाजात स्वत:चे अस्तित्व निर्माण झाल्यानंतर गावातील सामाजिक कार्यात बचतगटाची दखल घेतली जाऊ लागली, हेच बचतगटांच्या माध्यमातून महिलांना संधी मिळाल्याचे खरे यश म्हणता येईल.
No comments:
Post a Comment