Saturday, February 18, 2012

… हर शख्स परेशान सा क्यूँ है?

मुंबई शहराकडे पाहिलं की, मला एका उर्दू गझलमधील दोन ओळी पटकन आठवतात…


सीने में जलन, आँखों मे तुफान सा क्यों है?
इस शहर में हर शक्स परेशान सा क्यों है?

अहोरात्र धडपडणाऱ्या या शहराचं किंवा या शहरातील माणसांचं वर्णन करण्यास या दोन ओळी तशा पुरेशा आहेत. प्रख्यात उर्दू साहित्यिक शहरयार खान यांच्या एका गाजलेल्या गझलमधील या दोन ओळी. या प्रतिभावंत साहित्यिकाचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त वर्तमानपत्रात वाचत असताना त्यांच्या अशा अनेक गझला मनात रुंजी घालत होत्या.

उर्दू भाषा ही तशी कुणालाही भुरळ पाडणारी…. या भाषेच्या अनेक चाहत्यांना तर उर्दू लिपी अवगतही नसते पण तरीही ते उर्दूतील शेरोशायरी, गझल यांचा आनंद घेण्यासाठी वेडे असतात. देवनागरी, गुजराती, कानडी किंवा आपल्याला ज्ञात असलेल्या आणखी कुठल्याही लिपीत उर्दू भाषा लिहून ते तिचे रसग्रहण करतात. उर्दू लिपी ही त्यांच्यासाठी कधीही अडचणीचा विषय ठरत नाही. मीही अशाच चाहत्यांपैकी एक. 

देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझला, शायरी वाचून मी त्यांचा मनमुराद आनंद नेहमीच लुटत आलो आहे. प्रख्यात शायरांच्या गझलांनी मला नेहमीच भुरळ पाडली आहे. कधी गालिबने रंगवलेला प्रेमळ अल्लडपणा, कधी बहादूरशहा जफरांनी रंगवलेली उत्स्फूर्त देशभक्ती, कधी अमीर खुस्रोंनी रंगवलेला नकोसा विरह, कधी साहीर लुधीयानवींनी रंगवलेली अल्लड प्रेयसी, तर कधी शहरयारांनी रंगवलेला भावनांचा उद्‌वेग….अशा नाना रंगांमध्ये मी नेहमीच चिंब होऊन जातो. त्यातल्या त्यात शहरयारांचा उद्‌वेग आणि त्यांच्या गझलांमधील हृदयाला भिडतील अशा शब्दांचा चपखल वापर मला नेहमीच त्या गझलांभोवती खिळवत राहिला आहे. म्हणूनच शहरयारांच्या निधनाचं वृत्त माझ्यासारख्या त्यांच्या एका चाहत्याला वेदनामय ठरलं.

शहरयारांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल मागच्याच वर्षी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. त्यावेळी शहरयारांना आपल्या हस्ते पुरस्कार दिला जाणे हा आपलाच गौरव असल्याचे बच्चन यांनी म्हटल्याचे मला अजूनही आठवते. शहरयारांच्या साहित्यिक योगदानाकडे पाहिले की या विधानाची सत्यता पटते.

शहरयारांची सर्वसामान्यांशी ओळख ही साधारणपणे १९७८ च्या दरम्यान आलेल्या `गमन` या हिंदी चित्रपटापासून झाली. या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेल्या गझला खूप गाजल्या. या लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या दोन ओळीही याच चित्रपटातल्या. शहरयार हे या चित्रपटाच्या कितीतरी पूर्वीपासून गझला लिहित होते. पण जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आपल्या गझला चित्रपट माध्यमात येण्यापर्यंत वाट पहावी लागली. खरं तर एका मोठ्या साहित्यिकाला चित्रपटात वापरलेल्या त्यांच्या गझलांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळावी हे एक प्रकारचे विडंबनच म्हणावे लागेल. असो.… या चित्रपटानंतर त्यांनी `उमराव जान` चित्रपटासाठी गझल लेखन केले. हा चित्रपट आणि त्यातील गझला आजही मैलाचा दगड मानल्या जातात. या चित्रपटातील गझलमध्ये आपल्या निस्सीम सौंदर्यावर कमालीचं गर्व करणारी आणि आपल्याच प्रेमात अखंड बुडालेली सौंदर्यवती एका प्रेमिकाला म्हणते…

ईक तुमही नही तनहा, उल्फत में मेरी रुसवा
इस शहर में तुम जैसे, दिवाने हजारो है
इन आँखों की मस्ती के, मस्ताने हजारो है
इन आँखो से बाबस्ता, अफसाने हजारो है

शहरयारांच्या ओळी, रेखाचं सौंदर्य, आशाताईंचा आवाज आणि खैय्याम साहेबांचं संगीत! हा चित्रपट आणि त्यातील गझला भारतीय उर्दू संस्कृतीतील महत्त्वपूर्ण ठेवा ठरल्या आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. 

शहरयारांच्या शायरीमध्ये एक वेगळेपण मला नेहमीच जाणवत राहिलंय. फक्त प्रेम, प्रेयसी, विरह आणि धर्म यामध्ये अडकून न राहता त्या पलिकडे जाऊन विविध मानवी भाव-भावनांवर त्यांनी वारंवार भाष्य केलंय. म्हणूनच खूप प्रयत्न करुनही अद्याप यश न पाहिलेल्या व्यक्तीची समजूत घालताना ते म्हणतात….

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता
कहीं जमीं तो कहीं आसमाँ नही मिलता

याच गझलमध्ये शहरयार पुढे म्हणतात…

जिसे भी देखीए वो अपने आपमें गुम है
जुबान मिली है मगर हमजुबाँ नही मिलता

आजकाल प्रत्येकजण आपल्याच विश्वात गुंग आहे. त्या प्रत्येकासाठी या दोन ओळी चपखलपणे लागू पडतात. 

मानवी भाव-भावनांशिवाय अव्यवस्थेविरुध्द शब्दरुपी संघर्ष करण्यासही शहरयार आपल्या शायरीचा प्रभावी वापर करतात. अशाच एका अव्यवस्थेवर प्रहार करताना ते म्हणतात... 

तुम्हारे शहर में कुछ भी हुआ नही है क्या
कि तुमने चीखों को सचमुच सुना नही है क्या
मैं इक जमाने से हैरान हूँ कि हाकीम-ए-शहर
जो हो रहा है उसे देखता नही है क्या

तर कधी प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रियकराची वेदना मांडताना ते म्हणतात…

जुस्तजू जिसकी थी, उसको तो न पाया हमने
इस बहाने से मगर, देख ली दुनिया हमने

प्रेम, वेदना, विरह, उद्‌वेग, सौंदर्य, उत्कटता, आवेश, आकर्षण, त्याग, समर्पण अशा विविध मानवी भाव-भावनांचा स्पर्श शहरयारांच्या गझलांना नेहमीच होताना दिसतो. आपले एक सहकारी मित्र असअद बदायुँनी यांच्या मृत्यूनंतर शहरयारांनीच लिहिलेल्या या दोन ओळी मला शहरयार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लिहाव्याशा वाटतात…

जीना भी एक कारे-जुनूं है इस दुनिया के बीच
ये दिवानगी का काम करके वे जा चुके
अब उनकी शायरी है और यादें….


  • इर्शाद बागवान 
  • No comments:

    Post a Comment