शेती व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे सांगून अनेकजण काळ्याभोर जमीन पडीक ठेवत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र घाम गाळण्याची तयारी व योग्य नियोजनातून पडीक जमिनीतूनही सोने उगविता येते, याची प्रचिती यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील हनुमान बुरडकर या शेतकऱ्याने दिली आहे. ५ एकर मुरमाड जमिनीतून त्यांनी तब्बल १२५ क्विंटल पांढरे सोने (कापूस) पिकविण्याची किमया साधली आहे.
पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य भूमीपुत्रांमध्ये शेतीविषयी जिज्ञासा आहे. होतकरु, मनाने धाडसी असलेल्या अशाच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कृषीक्रांती घडवून आणली आहे.
अशाच प्रकारे केळापूर तालुक्यातील हनुमान बुरडकर यांनी आपल्या मुरमाड जमिनीत विक्रमी कापूस पिकविला आहे. त्यांच्याकडे १० एकर जमीन आहे मात्र त्यात एकरी एक क्विंटल कापूस सुद्धा पिकत नव्हता. मुरमाड व पडीक जमिनीवर काय पिकवावे असा विचार करुन मात्र ते थांबले नाहीत. अपार मेहनत करण्याची जिद्द उराशी बाळगून बुरडकरांनी शेतात सिंचनाची सोय करुन घेतली. ठिंबक सिंचनाचे तंत्र अवलंबून कापसाची पेरणी केली. डवरणी, फवारणी, निंदण या बाबी सुनियोजित वेळी केल्याने त्यांना एकरी २५ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले आहे.
त्यांच्या शेतात पऱ्हाटीची लागवड करीत असताना ५X१ फूट अंतरावर टोबणी केली असल्याने पऱ्हाटीच्या झाडाची उंची ६ फूट तर फळ फांद्या ४ फूटापर्यंत आहेत. प्रत्येक झाडात ५ फूटाचे अंतर असताना सुद्धा आत चालणे कठीण असून प्रत्येक झाडाला जवळपास १५० गाठी तयार आहेत. याद्वारे त्यांना नवीन हंगामात १४० क्विंटल कापूस निघण्याची अपेक्षा आहे. त्यांची ही किमया पाहण्यासाठी त्यांच्या शेतावर अनेक मान्यवरांनी व प्रसार माध्यमांनी भेट दिली आहे. त्यांनी आपल्या शेतात शिमला मिर्ची, टमाटर, वांगे आदी भाजीपाल्यांच्या पिकांचेही विक्रमी उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
No comments:
Post a Comment