Wednesday, February 1, 2012

पडीक जमिनीतून पिकविले सोने



पेरणी योग्य नसलेल्या पडीक जमिनीमध्ये अहोरात्र काबाडकष्ट करीत कुटुंबाच्या उन्नतीसाठी झपाटलेल्या युवा शेतकऱ्याने कृषीक्रांती घडविली आहे. पडीक जमिनीवर त्याने भरघोस कपाशीचे उत्पादन घेण्याचा करिश्मा केला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील डेहनीच्या दिनेश रामभाऊ मारशेटवार या नवोदित शेतकऱ्याने आपल्या अपार परिश्रमाच्या जोरावर जराशा संकटाने कंपित होणाऱ्या शेतकऱ्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले असून तालुक्यात त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले जात आहे.

उद्यमशीलता, धेर्य, सचोटी आदी गुणांच्या जोरावर माणूस विपरित परिस्थितीवर मात करु शकतो, हे अनेकदा ऐकायला मिळते. या गुणांची कास धरुन दिनेशने आपल्या मालकीच्या तीन एकर मुरमाड व पडीक जमिनीमध्ये कृषीक्रांती घडवून आणली आहे. एकीकडे काळ्याभोर मातीच्या जमिनी योग्य नियोजनाअभावी पडीक करून निसर्गाला दोष देणा-या शेतक-यांची संख्या वाढत असताना दिनेशने मात्र परिस्थितीशी दोन हात करण्याचे धैर्य दाखविले आहे.

वडिलोपार्जित असलेल्या या जमिनीमध्ये गेल्या २० वर्षापासून कुठलेही पीक येत नसल्याचे, इतकेच नव्हे, तर लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे पाहून एखाद्या खचलेल्या शेतक-यांने ही जमीन विकून टाकली असती. मात्र दिनेशने अपार कष्ट करण्याची तयारी दाखवत या जमिनीतून पांढरे सोने पिकविण्याचा निश्चय केला. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने त्याने तीन एकरामध्ये बेडसिस्टीम प्रमाणे तीन बाय एक फूट अंतरावर कपाशीची लागवड करुन भरघोस उत्पादन घेण्याचा मार्ग निवडला. हताश होऊन आत्महत्येसारखे विचार डोक्यात घेणा-यां शेतक-यांना आपल्या मेहनतीच्या किमयेतून त्याने यशाचा मार्ग दाखविला.

परंपरागत शेती करुन हातात काहीही लागत नसल्याने दिनेशने आपल्या शेतात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. आज दिनेशच्या शेतातील कपाशीने त्याच्या कुटुंबाला उन्नतीच्या मार्गावर नेले आहे. पुढच्या वर्षी याहीपेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ट शेती करण्याचा त्याने संकल्प केला आहे. परिसरातील अनेक शेतक-यांनी त्याच्या मेहनतीचे फळ पाहण्याकरिता शेताला भेट दिली आहे. बोंडांची संख्या व दर्जा पाहून अनेक शेतक-यांनी आता दिनेशच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा निश्चय केला आहे.

No comments:

Post a Comment