हळबी या बोलीचा इतिहास वेगळाआहे. ती बोलणारे हळब लोक हे मूळचे अनार्य असावेत व त्यांना कोणत्यातरी अपरिहार्य कारणांनी आर्यसंस्कृती व आर्यभाषा स्वीकारावी लागली. या बोलीवरही छत्तीसगडी हिंदीचा प्रभाव आहे. `मी देखलो नाही` यासारख्या हळबीतील वाक्यात `देख` हिंदी व `लो` हा मराठी प्रत्यय अशी वेगळी रचना आढळते. तरी तिच्यावरील मराठीचा प्रभाव अधिकआहे. हळबीत स्त्रीलिंग व पुल्लिंग अशी दोनच लिंगेआहेत मराठीतील नपुसकलिंगी शब्द (नामे) पुल्लिंगात येतात. मन हा अनेक वचनदर्शक प्रत्यय उदा. बाबामन (अनेक बाप) हममन (आम्ही) हळबीची सर्वनामाची रूपे लक्षात घेण्यासारखी व प्रमाण मराठीपेक्षा वेगळी आढळतात. हिंदीप्रमाणेच पूर्वीच्या अनार्य भाषेतील संस्कार सर्वनामाच्या प्रत्ययावर टिकून राहिले असतील
अहिराणी ही मराठीची एक महत्त्वाची बोली आहे. तिचा उल्लेख करताच `अरे संसार संसार` हे बहिणाबाईचे गाणे आठवले नाही तर तो मराठी माणूसच नव्हे. अहिराणी हे नाव अभीर-अहिर जातीवर पडलेले आहे. प्रदेशावरून पडलेले नाव खानदेशी बोली. काही अभ्यासकांच्या मते या बोलीचे आंतरिक रूप गुजराती आणि राजस्थानी भाषांशी मिळतेजुळते आहे. श्री. भा.रं.कुलकर्णी सारख्या अभ्यासकाच्या मते, अहिराणी भाषा ही आर्यवर्गातील एका टोळीची संस्कृतपूर्व अशी परंपरा चालत आलेली व अर्थातच स्थलकालपरिस्थितीचा कमी अधिक संस्कार झालेली भाषा दिसते. ती मराठीची पोटभाषा नाही आणि गुजरातीची तर नाहीच नाही. एके काळची भाषा या पातळीवर असलेली ही अहिराणी त्या लोकांचा राजकीय-सांस्कृतिक अधिकार संपुष्टात आल्याने सभोवतालच्या मराठीचे विशेष स्वीकारत बोली म्हणून विकसित होत राहिली. तिच्या या पूर्ववैभवाची जाणीव पुढील अहिरणी गीतातूनही जतन झालेली आहे. `बोली मनी अहिराणी, जशी दहिमान लोणी / सगया ताकना पारखी इले पारख नही कोणी` यामधून आपल्या बोलीविषयी अस्मिता व सध्या तिला पुरेशी प्रतिष्ठा नसल्याची खंत व्यक्त होते. भाषिक अस्मितेच्या राजकारणाची बीजे अशा लोकभावनेत असतात असे म्हणून डॉ. रमेश वरखेडे पुढे म्हणतात कोकणीला मराठीपासून वेगळे करुन स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता मिळविताना अशीच अस्मितेची लढाई लढविली गेली, हे येथे लक्षात घ्यायला हवे. (समाजभाषाविज्ञान पृ. ४८)
हळबी बोलीप्रमाणे अहिराणी बोलीतही नामाला विभक्तिप्रत्यय लावताना सामान्यरूप न करण्याची प्रवृत्ती आहे. उदा. मराठीत घर-घराला पण अहिराणीत घर-घरले घरसे. नामाचे अनेकवचन केवळ शेवटचे अक्षर लांबवून साधले जाते उदा. घर - एकवचन घरss - अनेकवचन अहिराणीत कर्त्यांच्या लिंगाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही. मी करस हे वाक्य स्त्री व पुरुष दोघांच्याही तोंडी एकच असते.मराठीत जसे मी करते (स्त्रीलिंग) व मी करतो (पुल्लिंगी) असा फरक अहिराणात नाही. बंगई (झोपाळा), शेनफडी (केरसुणी), फुई (आत्याबाई), डिकरा(मुलगा), चिडी (चिमणी), डोंगा (लहान होडी) असे अनेक शब्द मराठीपेक्षा वेगळेपणा दाखविताना अहिराणीतील लई ले सूं (मी आहे) यांचे गुजरातीशी साम्य असले तरी ते मर्यादितच आहे. हिंदी किंवा गुजराती यांच्या सीमलेगतच्या या बोलींवर त्या भाषांचा असा परिणाम दिसत असला तरी त्यांचा इतिहास व प्रत्यय व्यवस्था यांनी त्या मराठीशी बांधलेल्या आहेत.
झाडीबोली हीसुद्धा हिंदी बोलणाऱ्याच्या प्रदेशाच्या जवळची असल्याने तिच्यावरही हिंदीचा परिणाम दिसून येतो. झाडीपट्टी या प्रदेशावर प्रदीर्घकाळ गैंडलोकांची सत्ता होती. या बोलीचा बहुसंख्य समाज शहरीकरणापासून दूर आहे. हेल काढत बोलणे हा या सगळ्यांचा उच्चार स असाच करतात. ण व ळ हे दोन ध्वनी या बोलीत नाहीत. हिंदीचा प्रभाव असल्याने स्त्रीलिंग व पुल्लिंग अशी दोनच लिंगे या बोलीत आहेत. हिंदी वाक्यरचनेच्या प्रभावातून करून राहिलो (कर रहा हूं) अशी रुढ आहे. लस्करी (लष्कर), सिनगारी (शृंगारगीत) इतिहासिक (ऐतिहासिक) या लावणी सदृश गीतांच्या नावामध्ये मराठीत जाणवते. या बोलीतील रामायण थोडे वेगळे आहे. राम हा वनात गाई पाळतो सीता दही घुसळून लोणी काढते. `ऊड ऊड पाखरा जा माज्या मायरो` या लोकगीतावरुन कुणालाही ज्ञानेश्वरांच्या `उड उड रे पाऊ ` या गीताचा आठवण व्हावी. या बोलीतही लिंगभेद दर्शक प्रत्यय क्रियापदाला लागत नाहीत. `राम जातो वावरी! सीता नेते सिदोरी ` या सारख्या गीतावरुन ते स्पष्ट होते.
या सगळ्याच बोलीमधील म्हणी, वाक्प्रचार हे तेथील प्रादेशिकतेशी, सामाजिक जीवनाशी संबंधित आहेत. या विविध बोलींमधील लोकसाहित्य हे मराठी माणूस समजून घेण्याचे मोठे दालनच आहे.
आज पुणेरी व मुंबई या दोन्ही ठिकाणच्या विकसित झालेल्या प्रादेशिक बोलीचे स्वरुपही लक्षणीय आहे. प्रमाण मराठी भाषेशी त्या जवळच्या असल्या तरी बोलण्यातील व लेखनातील त्यांची विविधता नोंद करण्यासारखी आहे. पुणेरी बोलीमध्ये संस्कृतमिश्रित, पुरातन रुपे जपण्याचा अठ्ठाहास आहे, तर मुंबईच्या बोलीला इंग्रजी व सर्वसमावेशकता जपण्याची ओढ आहे. दोन्ही ठिकाणच्या वर्तमानपत्रांच्या भाषेवरुनही हा फरक जाणविण्या एवढा स्पष्ट आहे. `मुंबईचा मराठी माणूस टॅक्सीत बसल्यावर हिंदी बोलतो, ऑफिस किंवा सचिवालयासारख्या ठिकाणी हिंदी, इंग्रजी, बोलतो किंवा मराठी वाक्यरचनेत विपुल इंग्रजी, हिंदीत शब्द योजतो. घरात व अनौपचारिक प्रसंगी मात्र स्वत:च्या बोलीचा उपयोग करतो. बोली प्रमाण मराठी व सफाईने करीत असतो. त्यामुळे त्यांच्या अनौपचारिक बोलीतही एक मुंबई बोलीचा रंग आलेला असतो.
No comments:
Post a Comment