Saturday, February 18, 2012

‘हिरव्या पुण्या’ची कहानी


आयुर्वेद ही भारतीय आरोग्यशास्त्राची विशेष ओळख आहे. ही औषधे बनविण्यासाठी विशेष औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची आवश्यकता असते. पूर्वी आपल्या देशात अशी वनसंपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. तथापि, अशी झाडे दुर्मिळ होऊ लागली आहेत. उद्या अशी झाडे लोप पावली तर आयुर्वेदिक औषधे मिळणेही कठीण होईल. हा समंजस विचार करुन नाशिकमधील कुसुम दहिवेलकर यांनी एक रोपवाटिका निर्माण करुन वनस्पतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीमती दहिवेलकर ह्या निवृत्त वनाधिकारी. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या पैशातून पाथर्डी गावात थोडी जागा विकत घेऊन ‘हिरवे पुण्य’ नावाची रोपवाटिका साकारली आहे.

अवघ्या दहा महिन्यात रोपे तयार करताना त्यांनी अत्यंत मेहनतीने २७० प्रकारच्या एकूण सातशे अशा दुर्मिळ जातीच्या रोपांची ‍निर्मिती केली आहे. रानावनात, घनदाट जंगलात, अति दुर्गम भागात भटकंती करुन त्यांनी कधी कळी मिळवत तर कधी रोपे मिळवीत हिरवाइचे हे स्वप्न साकारले आहे.

कुसुम दहिवेलकरांची ही रोपवाटिका आता एक लाख रोपांनी बहरुन गेली आहे. अवघ्या एका वर्षात तयार झालेल्या या रोपवाटिकेत समुद्र फळ, वांगी, सुरंगी, कैलासपती, लाल हदगा, पाडळ, बुद्धवड, पारसवड, कदंब, सातवीण, फालसा, कुंभा नेवर, सुगंध निलनगिरी, पंतगी, बकुळ, मेडशिंगी, अर्जुन व नाळेशर, कुडा, कुचला,चंदन आदी दुर्मिळ रोपांचा समावेश आहे.

वाढत्या वृक्षतोडीमुळे शहरांचे हिरवे सौंदर्य लोप पावू लागले आहेत. त्यामुळे आजुबाजूला उडणारी फुलपाखरे दिसत नाहीत. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत नाही. वृक्षराजींचे हे गतवैभव परत आणण्याचा प्रयत्न कुसुमताई रोपवाटिकेच्या माध्यमातून करीत आहेत. माझ्या जीवनातले हेच खरे पुण्य आणि हीच खरी कमाई असल्याचे त्या सांगतात.

अनेक लोकांना आयुर्वेदिक वनस्पती ओळखता येत नाहीत. लोकांना ही झाडे ओळखता यावीत, आयुर्वेदिक डॉक्टरांनाही ती ओळखता यावीत म्हणून या व्यक्तींना व संस्थांना वृक्ष ओळखण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

दहिवेलकरांच्या या प्रयत्नाला आपणही साथ देऊन हिरव्या वनराईचे रक्षण व जतन केल्यास आपले गतवैभव पुन्हा मिळेल यात शंकाच नाही .

देवेंद्र पाटील

No comments:

Post a Comment