मराठवाडा हा दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीचा प्रदेश. त्यामुळे या प्रदेशात शेतीजीवन समृध्द झाले आहे. परिणामी मोठे उद्योग या परिसरात पाहिजे त्या प्रमाणात विकसीत झाले नाही. त्याचा परिणाम काही प्रमाणात का होईना येथील रोजगारावर पडल्याचे चित्र आहे. मात्र असे असतानाही यात्रा, महोत्सव याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर किरकोळ रोजगारांची निर्मिती येथे होत असल्याने सामान्य नागरिकांचा रोजी-रोटीचा प्रश्न निकाली निघत आहे. त्यातच एखाद्या उत्सवाला सामाजिक एक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेची जोड असली आणि अशा महोत्सवातून स्थानिकांना किरकोळ रोजगार उपलब्ध होत असेल तर मनाची शांती आणि पोटाची भाकर यांचा सुवर्णयोगच म्हणायला पाहिजे. असाच अनेक वर्षाची परंपरा असलेला हजरत सय्यद तुराबुलशहा हक्क यांच्या उरुसाला परभणीत शुभारंभ झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाचा नेत्रदीपक सोहळा परभणीकरांनी नुकताच प्रियदर्शनी इंदिरा क्रीडा संकूल येथे अनुभवला. पोलीस तसेच चिमुकल्यांच्या अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या राष्ट्रीय सणाच्या आठवणीत डोळ्यात साठवून परभणीकरच नव्हे तर राज्यातील इतर नागरिकसुध्दा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा उरुस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
सध्या परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आठवड्यावर असताना हजरत सय्यद तुराबुलशहा हक्क साहेब यांच्या उरुसाला सुरुवात झाली आहे. काही नागरिकांना निवडणुकीच्या माध्यमातून तर काहींना उरुसच्या माध्यमातून किरकोळ रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. दरवर्षी केवळ आठवडाभर चालणारा उरुस यावर्षी मात्र तब्बल पंधरा दिवसांची मेजवाणी घेऊन आला आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा विक्रमी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
या उत्सवाच्या निमित्ताने राज्यासह परराज्यातील शेकडो व्यापारी परभणीत मोठ्या उमेदीने दाखल झाल्याने स्थानिक पातळीवरील कामगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे. उरुसनिमित्त रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसह रिक्षावाले, टेंटहाऊस निर्मितीवाले, फुलविक्रेते, भांड्या-कुंड्यांसह खानावळी चालकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
या उरुसनिमित्त परभणीत जवळपास २० लक्ष नागरिकांचे आगमन होणार असून एस. टी. महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. उरुस काळात गतवर्षी एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात जवळपास पंधरा लक्ष रुपयांची भर पडली होती. याही वेळेस हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परभणीतील उरुस हा केवळ एक उत्सव नाही तर समाजातील भाईचारा कायम टिकवून ठेवण्याचे ते एक माध्यम आहे. एवढेच नव्हे तर आपल्या कलाकृतींनी बनविलेले उत्पादन नागरिकांसमोर ठेवण्याची संधी अनेक लघु उत्पादकांना चालून येते.
संपूर्ण राज्यातून लाखो नागरिक या महोत्सवाचे साक्षीदार बनतात. यात लहान मुलांसाठी मीनाबाजार, खेळणी आदी बाबी तर अनेक स्टालच्या माध्यमातून नागरिक विविध उत्पादनांची खरेदी करतात. याशिवाय भव्य दिव्य असे आकाशपाळणे, मौत का कुवा आदींकडे बच्चे कंपनीसह महिला व नागरिक आकर्षित होतात. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लावण्यात येणारे पशुप्रदर्शन, प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरतात. एक प्रकारे सामाजिक आणि धार्मिक ऐक्याबरोबरच बाजारात खेळते भांडवल आणि अनेक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात का होईना निकाली निघतो.
No comments:
Post a Comment