Wednesday, February 1, 2012
परीक्षा जवळ आलीय... घाबरू नका
दहावी आणि बारावीच्या वर्गात शिकत असणा-या पाल्यांच्या घरात सध्या खूपच काळजीपूर्वक वातावरण आहे. आपला मुलगा/मुलगी या परीक्षांमध्ये अव्वल गुण प्राप्त करून आलाच पाहिजे असा आग्रह पालकांकडून धरला जातो. आणि वाढत्या अपेक्षांचा बोजा मनात ठेवून विद्यार्थी द्विधा मन:स्थितीत अभ्यास करतात. म्हणूनच परिक्षेपूर्वी काही गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवणे आवश्यक आहेत.
१) सकारात्मक विचार ठेवा – परीक्षेत आपण यशस्वीच होऊ हा दृष्टीकोन दृढ करा. मी अभ्यास केला आहे. सर्वच प्रश्न मी पूर्णपणे सोडवणार आहे. मी परीक्षेत पास तर होईनच परंतु चांगले गुण देखील मिळवीन असा विचार मनात ठेवून अभ्यास करा.
२) मन प्रसन्न ठेवा – अभ्यास करताना किंवा परीक्षेचा पेपर सोडवत असताना मन प्रसन्न ठेवा. मनात नैराश्य ठेवून अभ्यास करू नका. मी करत असलेला अभ्यास मी स्वतःसाठी करीत आहे हा दृष्टीकोन ठेवा.
३) चांगले मित्र मैत्रीणींची संगत – परीक्षा काळात चांगल्या मित्र-मैत्रीणींची संगत ठेवा गप्पीष्ट, उनाड मित्रांपासून सावध रहा. चांगले हुशार मित्र असतील तर त्यांच्याशी चर्चा करा. त्यातून अनेक प्रश्न सहज सुटू शकतात.
४) वाचनापेक्षा लिखाण प्रभावी – ऐकणे, वाचणे, बोलणे आणि लिहिणे हे अभ्यासाची प्रमुख टप्पे मानले जातात. अधिकाधिक लिखाण सराव यासाठी महत्वाचा ठरतो शुध्दलेखनातील चुका टाळणे, लिखाणाचा वेग वाढविणे या सोबतच दिलेल्या वेळेत पूर्ण प्रश्नपत्रिका सोडविणे तेवढेच महत्वाचे आहे. हे लक्षात घ्या.
५)सराव प्रश्न– सराव प्रश्नपत्रिका तेवढीच महत्वाची आहे. किमान सर्व विषयांच्या तीन प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक आहे. सोडविलेल्या उत्तर पत्रिकेतील त्रुटी तज्ञ शिक्षकांकडून समजावून घेणेही तेवढेच महत्वाचे आहे.
६) सर्व विषयांना समान महत्व – अनेक विद्यार्थी केवळ गणित भूमिती हाच विषय महत्वाचा मानतात परंतु तसे न करता सर्व विषयांना समान संधी द्या. नावडत्या विषयांकडे दुर्लक्ष झालं तर तुमचा स्कोर कमी होऊ शकतो हे ध्यानी घ्या. चांगल्या टक्केवारीसाठी सर्व विषयात चांगले गुण असणं केव्हाही फायद्याचं असतं. ७) आहारावर नियंत्रण – याचा अर्थ असा आहे की, जेव्हा भूक लागते तेव्हाच खाणे. भरपेट जेवल्याने सुस्ती येते. मग संपूर्ण रात्र झोप येते आणि सकाळ देखील तेवढीच खराब होते. आहार परिपूर्ण चौरस घ्यावा जेणे करून उत्साह राहील आणि अभ्यास चांगला होईल.
८) जागरण टाळावे – रात्री उशीरापर्यंत जागरण करून अभ्यास केल्याने शरीराचे वेळापत्रक बिघडू शकते यासाठी जागरण टाळून योग्य वेळी अभ्यास महत्वाचा ठरतो. प्रवास टाळावा जेणेकरून थकवा येणार नाही.
९) कॉपी पासून दूर रहावे – राज्य शासनाने कॉपीमुक्त अभियान सुरु केले आहे. कॉपी न करता परीक्षेला सामोरे जा. कोणी काय करतं यापेक्षा मी कॉपी करणार नाही हे महत्वाचे आहे. १०) परीक्षा केंद्रावर जाताना – खरं तर परीक्षा काळात विद्यार्थी तणावमुक्त असला पाहिजे याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे.परीक्षा केंद्रावर जाताना सोबत हॉल तिकीट, ओळखपत्र, पॅड, पेन्सील, कंपासपेटी, मोजपट्टी, हात रुमाल, घड्याळ इ. वस्तू नेण्यास विसरू नये. परीक्षा केंद्रावर किमान २० मिनिटे आधी पोहचणे आवश्यक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, दहावी आणि बारावी या महत्वपूर्ण परीक्षा आहेत. त्यांना सामोरे जाताना आत्मविश्वास मनात ठेवून सामोरे जा. यश आपल्याच हातात आहे. शेवटी परीक्षा म्हणजे काय तर तीन तासाचे लिखाण कौशल्य. हेच कौशल्य कागदावर निटपणे उतरवून काढा. यशाचा मार्ग मोकळाच समजा !
परीक्षेसाठी शुभेच्छा...!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment