मुंबईच्या सर जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयात, कलाध्यायन करून स्वत:च स्वतंत्र कलाविश्व निर्माण करणार्या मूळच्या विदर्भातील अकोला येथील, कागदमूर्तीकार राजेंद्र गोळे यांच्या कागदी मूर्तींच(याला `कागदी शिल्पे' असंही बरेच जाणकार म्हणतात) १२ मे २०११ ला मुंबईतल्या नेहरू कला दालन येथे प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. भारतीय `चित्र व शिल्प'कारांच्या यादीतील आधुनिक कलाकारांमध्ये राजेंद्र गोळे हे एकमेव कलाकार असे असतील की, ज्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्याअगोदर त्याचं बुकिंग झालेलं असतं. बुकिंग म्हणजे, कलाकृती निर्माण होण्याअगोदरच ती खरेदी करणे.
थोडक्यात पूर्वी `पाळण्यालाच' कुंकू लावायचे म्हणे..!! खानदानी घरातील मित्राच्या घरातील किंवा मामाच्या घरातील.. जन्माला आलेल्या किंवा येवू घातलेल्या मुलींच्या पाळण्यालाच `कुंकू लावून' `ऍडव्हान्स बुकिंग' केलं जायचं. लौकिक अर्थान ही परंपरा किंवा `रूढी' छान होती असं वाटतं. ``कलाकाराची कलाकृती ही त्याचं अपत्य असते..'' असं सांगतच कागदी मूर्तिकार राजेंद्र गोळे, भावने ध्ये बुडून गेले. भवसागरातून त्यांना हात देवून बाहेर काढले अन् विचारले
कागदीमूर्ती बनविण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली ?
कुठलीही निर्मिती करण्याअगोदर खूप चिंतन-विचार करीत होतो. कळत नव्हतं .. की आपण निश्चित कोणत्या मार्गाने जावं. एका मागून एक अनेक म्युझियम्स आणि संग्रहालये पाहिली पहात होतो. स्थिर वस्तू ज्या दुर्मीळ आहेत त्यांना एकत्रित व्यवस्थित मांडले जाते. अशा अनेक दुर्मीळ वस्तूंच्या एकत्रित मांडणी समूहाला `म्युझियम्स' म्हटलं जातं. अशी म्युझियम्स मला खुणावत होती, प्रोत्साहन देत होती माझ्या सृजन प्रतिभेला!! त्यातूनच `कागद' हे माध्यम निवडून मी या कलेला आत्मसात केले.
दगड माती धातू अशी माध्यमे सोडून कागद हे माध्यम आपण का निवडले ?
इतर माध्यमांमध्ये काम करणारे अनेक कलाकार मी किंबहुना आपणही पाहिलेले आहेत. `कागद' ह्या माध्यमात काम करणारे कलाकार महाराष्ट्रात मला तरी आठवत नाही. की, दुसरे कोणी, ८७ ते ९० या काळात काम करीत होते. इतरांपेक्षा वेगळ काही तरी झकास, सुंदर, दुर्मीळआणि संग्राह्य असं काम आपण करावं असं मला वाटू लागलं, त्यातुनच `कागदा'पासून अनेक प्रयोग करुन, वैविध्यकृती निर्माण कराण्याचं सुरु झालं. पूर्वीच्या कलाकारांकडे - कारागिरांकडे छन्नी हातोडी य़ाशिवाय फारसं काहीही नसतानासुद्धा ते इतकं सुंदर, दुर्मिळ आणि संग्राह्य असं काम करू शकत होते. आज तर इतकी अद्ययावत साधने असताना आपण आणखी काही वेगळं निश्चित करू शकू या विचारातूनच `कागद' हे माध्यम `फायनल' करून मी या कागदी वस्तू व मूर्ती बनविणे सुरू केले.
कागदी वस्तू बनविण्यासाठी तुम्ही काय प्रक्रिया करता हे इतरांना शक्य होईल का ?
ड्रॉइंग पेपरला त्याच्या जोडीला दोन भागात विभागता येते. थोडासा ओला करून हा पेपर हवा तसा आकारबद्ध करता येतो. इतर रद्दी पेपर्सचा पाण्यात भिजवून लगदा केला जातो. ह्या लगद्यातही दोन-तीन प्रकार आहेत. जास्त दिवस भिजत ठेवलेल्या कागदाच्या लगद्याचा `क्ले' म्हणजे ओल्या मातीप्रमाणे उपयोग करता येतो. मग आपणास हवे ते आकार बनविता येतात. तसेच इतर कागदांपासून पक्षी, त्यांचे पंख, त्यांच्या पायाच्या नख्या, ज्या झाडाच्या फांदीवर ते बसलेत ती फांदी, फुलपाखरे, एखाद्या मंदिराची प्रतिकृती, एखादे कौलारू घर, एखादी ललना.. अगदी हवी ती आकृती त्रिमीत स्वरूपात बनविता येते. त्यासाठी मी विविध आकाराच्या कातर्या बनविल्या आहेत, इतरही आवश्यक साहित्य बनविले आहे.
तुमच्या दुसर्या प्रश्नाचं उत्तर देखिल होय असे आहे. हे काम कोणीही इच्छुक करू शकेल मात्र सतत- तासंतास काम करण्याची तयारी (कंटाळा न येवू देता), निसर्गातील आपल्याला प्रतिकृती बनविण्याच्या गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण आणि हुबेहुब- वस्तुनिष्ठ निर्माण कौशल्य स्वत:त निर्माण करणे फार महत्त्वाचे असते.
आज मी अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी कला महाविद्यालयां मध्ये जातो. कला विद्यार्थ्यांना आवाहन करतो परंतु दुर्देवाने : आज पर्यंत मला काही एकही विद्यार्थी लाभला नाही. याचं कारण `पेशन्स'ने तासंतास काम करण्याची मानसिक तयारी आता विद्यार्थ्यां मध्ये सापडत नाही. ज्याच्या कडे अशी तयारी असेल त्याला हे काम उत्तमपणे साध्य होईल.
तुमच्या कलाकृतींची नक्कल करता येते का ? इतर कलाकृतींची नक्कल करतात तुमचं काय म्हणणं आहे?
आजच्या कलीयुगात नव्हे, तर कला युगात इतर क्षेत्रांमध्ये असतात तसेच `माफिया' शिरलेले आहेत. आजच्या कला क्षेत्रात विविध शैली आणि तंत्रांनी युक्त `माफिया' आहेत. मग ते कलाकृतींची नक्कल करणारे असो, कलाकृतीचे डिजिटल प्रिंटींग करून खरी कलाकृती असण्याचा आभास निर्माण करणारे असो, दुर्मीळ कलाकृती `रीस्टोरेशन करून देतो' या सबबीखाली पळवून नेणारे असो, `या जगात कलाकृतीबद्दल मलाच तळमळ आहे' असा टेंभा मिरविणारे असो, अपुर्या माहितीवर कलाकृती आणि कलेबद्दल बेछूट लिखाण करणारे असो की, स्वत:ला बुजूर्ग कलाकार म्हणविणारे असो- या यादीतील सर्वच जण हे कलाक्षेत्रातील माफियाच..!
या सार्यांना कागद शिल्प कलेची कुठल्याच अंगाने नक्कल करता येणार नाही अशी मला खात्री आहे. त्यामुळे `रिल्पिका' व `नक्कल' झालेल्या कलाकृतीचं (मूळ सोडून) महत्त्व व मूल्य हे कमी कमी होत जातं. `कलेचा' बाजार मांडलेल्या या माफियांच्या जगात, कलेतील सत्व आणि स्वत्व अनंतात विलीन होतेय असे मला वाटू लागले आहे. जे `युनिक' अथवा एकमेव असते, त्यालाच कलेतील चिरंतन मूल्य व स्वत्व आहे, असे मला वाटते.
माझ्या कलाकृतीची `नक्कल' मलाच करता येत नाही. इतर तर फारच दूर आहेत. म्हणूनच या कागदी शिल्पाकृती अमूल्य आहेत
एक कलाकृती साकारण्यास किती वेळ लागतो ?
रोज १५-१६ तास याप्रमाणे ३ ते ४ महिने,एक प्रतिकृती बनविण्यास कालावधी लागतो. मात्र अखेरीस जे बनते, ते पाहून कला रसिकाला संपूर्ण समाधान व आनंद मिळतो.
या कलेला व्यावसायिक भविष्यकाळ कसा वाटतो?
फार संवेदनेचा हा प्रश्न आहे. परंतु तितकेच महत्त्वाचे उत्तर मला वाटते. बघा.. आज उपयोजित कला क्षेत्रात `स्काय इज द लिमीट' अशी मोठी संधी आहे. मात्र, काम करणार्या कलाकारास, सतत कष्ट करणार्या कलाकारास..! मी जी कागदी शिल्पे निर्माण करतो ती कला पेपर क्राफ्ट आणि `जपानी ओरिगामी' यापेक्षा फार वेगळी आहे
माझ्या कलेमध्ये कल्पना चिंतन-प्रासंगिक आणि निर्माणाच्या स्टेजेस् आहेत. नैसिर्गिकता-वस्तुनिष्ठता आणि कलारसिकांना थक्क करून टाकणारी निरीक्षण क्षमता आहे. त्यामुळे या कलाकृती `डूप्लिकेट' किंवा एकसारख्या अनेक बनविण्याची शक्यता नाही. कारण तशी कुठलीही मशिन बाजारात नाही. म्हणून या कलाकृती अमूल्य आहेत, दुर्मीळ आहेत.
अगदी व्यावसायिक क्षेत्राच्या बाबतीतच सांगायचे झाल्यास, मी एवढंच म्हणू शकतो. या क्षेत्राकडे येणार्यांनी सतत आणि सातत्याने कष्टाची तयारी ठेवली तर त्यांना `लक्ष्मीपती' व्हायला कुठलेच अडथळे वाटणार नाहीत.
सर्व कलाकृती : राजेंद्र गोळे
No comments:
Post a Comment