परंपरागत शेतीबरोबरच रेशीमकोष निर्मितीचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील शेणोली येथील तरुण शेतकरी दीपक लोंढे यांनी उत्पन्न वाढीबरोबरच शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत परंपरागत शेतीपद्धतीबरोबरच नव्या पद्धतीने रेशीमकोष निर्मितीत यशस्वी पुढाकार घेतला आहे.
लोंढे हे गेल्या दहा वर्षापासून रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करीत आहेत. त्यांनी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर रेशीम उद्योग उभारला. बघता-बघता यात यश मिळत गेले. या उद्योगात नाविन्यता टिकवून रेशीमकोष निर्मिती करताना सायकल पद्धतीचा अवलंब करण्यात आला. निव्वळ शेतपिके न घेता त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या अर्थिक परिवर्तनाचा नवा विचार त्यांनी याद्वारे मांडला आहे.
लोंढेंनी आपल्या वडिलोपार्जित माळरानाच्या चार एकर शेतीमध्ये दहा वर्षापूर्वी रेशीमकोष निर्मितीचा हा नाविण्यपूर्ण प्रयोग केला. सुरुवातीला वीस गुंठ्यांवर तुती लागवड केली. पहिल्याच वर्षी तीन लॉटमधून ४० हजारांचा निव्वळ नफा झाल्याने कोष निर्मितीसाठी एक लाखाचे स्वभांडवल खर्चून त्यांनी ३० बाय ४० आकाराचे बंदिस्त शेड बांधले. त्यानंतर २००६ पर्यंत दीड एकरावर तुती लागवड वाढवली. त्यानंतर एकूण ४० बाय ४५ या आकारात शेडचा विस्तारही केला. आता त्यांनी दोन एकरावर तुती लागवड वाढवली आहे. त्या क्षेत्रात काही दिवसांचा फरक राखून ते तुती लागवड करतात. त्याचा फायदा रेशीमकोष निर्मिती चक्राकार पद्धतीने घेण्यासाठी झाला आहे. या पद्धतीमुळे त्यांना वर्षाकाठी नऊ लॉटद्वारे रेशीमकोषांची निर्मिती करता येणे शक्य झाले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात एकरी चार ट्रेलर शेणखताची मात्र दिलेल्या क्षेत्रावर मे अखेरीस लोंढे रेशीमकोष निर्मितीच्या तुती लागवडीची तयारी सुरु करतात. त्या शेतीची पुरेशी मशागत करतात. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने सरी सोडतात. दोन रोपात साधारण दीड फुटाचे अंतर ठेवून एकास एक सरीच्या पद्धतीने तुतीच्या कांड्यांची लावण करतात. यासाठी व्ही-१ जातीच्या तुतीचा ते वापर करतात. लागवडीनंतर शेताला उपलब्धतेनुसार एकरी ५० किलोप्रमाणे नत्रांची मात्रा देण्यात येते. पुन्हा एक महिन्यानंतर सुपर फॉस्फेट व अमोनिअम सल्फेटच्या प्रत्येकी दोन बॅगा, पोटॅशची एक व दुय्यम खताच्या दोन बॅग अशा स्वरुपात वरखतांची मात्रा ते देतात. त्याच पद्धतीने प्रत्येक छाटणीच्यावेळी ते खत व्यवस्थापन करतात.
पाणी बचत व तुतीला पाल्याची क्वॉलिटी येण्यासाठी शेतात ठिबक सिंचन प्रणालीचा त्यांनी वापर केला आहे. तुतीच्या छाटणीनंतर ४० ते ४५ दिवसांच्या अंतराने कोष उत्पादन घेतले जाते. कोषनिर्मितीसाठी हवामानाच्या अनुकूलतेनुसार ते अंडीपुंजांची निवड करतात. उष्ण हवामानात कोल्हार गोल्ड व तेथून पुढे सीएसआर या जातीच्या अंडीपुंजांचा ते कोष उत्पादनासाठी वापर करतात. त्यांच्याकडील ४० बाय ४५ आकाराच्या शेडमध्ये ४ बाय ३० आकारांतील ५ रॅकमध्ये प्रत्येकी सहा कप्प्यात कोषांचे संगोपन केले जाते. आपल्या नाविण्यपूर्ण आणि नियोजित शेतीपद्धतीमुळे प्रत्येक लॉटला ३०० ते ३५० अंडीपुंजापासून कोष उत्पादन घेण्याची किमया लोंढे यांनी साधली आहे. इतर शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच प्रगतीची वाट दाखविणारी ठरू शकेल.
No comments:
Post a Comment