महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात बचत गटाच्या सहकार आणि संघटन याचा फायदा होतो. याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. महिलांचे बचतगट आता चाकोरीबाहेर जाऊन व्यवसाय करू लागले असून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील खर्डा येथील आदिवासी रोजगार हमी महिला बचत गटाने गावात शिधा वाटप दुकान तसेच केरोसीन विक्री सुरू करून आदर्श निर्माण केला आहे.
या गटाच्या कामामुळे रॉकेल टंचाईचे संकट टाळण्यात यश येत असून शिधापत्रिका धारकांना हक्काचे धान्य प्राप्त होत आहे.
देवळी पासून १८ कि.मी. अंतरावर असलेले बोपापूर वाणी जवळ खर्डा हे गाव आहे. या गावाची एकूण लोकसंख्या १ हजार १२७ असून घर संख्या २६० आहे. बचतगटाविषयी राज्यभर जागृती झाल्यानंतर थोड्या उशिरानेच येथे बचतगटाची सुरूवात झाली. त्यापूर्वी बचतगट आणि त्या माध्यमातून बचत याचा फारसा गंधही येथे नव्हता. सावकाराच्या पाशातून मुक्तता व्हावी आणि महिलांच्या गरजा भागवून काही बचत शिल्लक राहावी या उद्देशाने त्या गावातील १७ महिलांनी एकत्र येऊन बचतगट सुरु केला. बचतगटामध्ये १७ पैकी एकूण १० महिला दारिद्र्य रेषेखालील होत्या.
या महिलांना कोणाचेही मार्गदर्शन नसताना त्यांनी स्वत:हून प्राथमिक माहिती मिळविली. एक वर्षामध्ये थोडी थोडी मासिक बचत जमा करुन त्यांनी अंतर्गत व्यवहार सुरु केला. अंतर्गत कर्जाचा व्यवहार करुन पूर्ण परतफेड करण्यातही या महिला यशस्वी झाल्या. ग्रामपंचायतीने स्वस्त धान्याचे दुकान आणि रॉकेलच्या व्यवसायासाठी बचतगटांची निवड करण्याचे जाहीर केल्यानंतर या महिलांनी त्यांच्या गटाचा फॉर्म भरला.
एप्रिल २००८ पासून त्यांच्या कार्याला गती मिळाली. २००८ मध्ये ग्रेडेशन झाले आणि त्याच वर्षी त्यांना ५० हजार रूपयांचे खेळते भांडवल मिळाले. त्यापैकी १० हजार रुपये अनुदान होते. उरलेले ४० हजार रुपयांची परतफेड केल्यानंतर त्यांना २००९ मध्ये स्वस्त धान्याचे दुकान व केरासीनचे लायसन्स मिळाले.
आदिवासी रोजगार हमी महिला बचतगट यांनी मिळालेल्या पैशांमधून रॉकेलचे ड्रम, वजन काटा, माप हे साहित्य खरेदी केले. सीताबाई रामाजी कौराती यांच्या घरी एक खोली किरायाने घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. या महिलेला गटाच्या महिला ४०० रुपये भाड्यापोटी देतात.
सचोटी आणि प्रामाणिकपणाने मेहनत करून बचत गटातील महिलांनी या संधीचे सोने केले आहे. त्यानंतर २०१० मध्ये त्यांना आणखी २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यातील एक लाख रुपयांचा पहिला टप्पा त्यांना मिळाला असून त्यांनी ४० हजार रुपये परतफेड देखिल केली आहे. बचतीचे महत्त्व पटल्याने छोटीशी सुरूवात झालेल्या बचटगटाचे हे रोपटे आता मोठे झाले आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती करून आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा मनोदय सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment