Tuesday, January 24, 2012

दुग्‍धउत्‍पादनातून सक्षमता


दुग्‍धउत्‍पादन हा व्‍यवसाय निश्चितपणाने आपणास फायदा देतो आणि याच माध्‍यमातून वर्धा जिल्‍ह्यातील कारंजा तालुक्‍यातल्‍या पिपरी गावचा वैष्‍णवी स्‍वयंसहायता महिला बचत गट सक्षम बनला आहे. गटातील सर्व महिलांनी सांगितलेली ही त्‍यांच्‍या यशाची कहाणी.

आम्‍ही वैष्‍णवी बचत गटाच्‍या सभासद आहोत. ७-८ वर्षांपूर्वी मार्गदर्शकांकडून बचतगटाचे महत्‍व कळल्‍यावर आम्‍ही एक सर्वसाधारण सभा घेऊन बचतगट स्‍थापन करण्‍याचे ठरविले. त्यानुसार आमच्‍या बचतगटाची स्‍थापना २८ जानेवारी २००४ रोजी झाली.

आमच्‍या बचतगटामध्‍ये संपूर्ण सदस्‍य हे शेतमजूर महिला आहेत. त्यामुळे सुरूवातीला मासिक बचत केवळ ५० रुपये ठरविण्‍यात आली आणि वर्धा जिल्‍हा सहकारी बँकेच्या कारंजा शाखेत खाते उघडण्‍यात आले. त्‍यानंतर दर महिन्याच्‍या ५ तारखेला आमची नियमित बैठक सुरु झाली. या बैठकीमध्‍ये बचत जमा करणे, कर्ज वाटप करणे, कर्ज परतफेड करणे, ठेव आणि इतर विषयांवर चर्चा आणि विचारविनिमय होऊ लागला.

दुसऱ्या महिन्‍यापासून आम्‍ही अंतर्गत कर्ज देणे सुरु केले. हळूहळू आमची बचत वाढू लागली आणि आमच्‍या छोट्या मोठ्या अडचणी सुद्धा दूर होऊ लागल्‍या. नंतर आम्‍हाला प्रशिक्षण देण्‍यात आले, त्‍यामुळे आमचा आत्‍मविश्‍वास वाढला.
आम्‍ही पुन्‍हा जोमाने बचतगटाच्‍या कार्यात आमचे योगदान देऊ लागलो. दि. १० डिसेंबर २००४ रेाजी आमच्‍या गटाचे ग्रेडेशन म्‍हणजेच प्रथम प्रतवारी झाली. त्यानुसार १० हजार रुपये फिरता निधी मिळाला. आमची बचत व फिरता निधी यामुळे जास्‍त पैसा जमा झाला. मग आम्‍ही सभासदांच्‍या मोठ्या गरजा भागविण्‍याचे ठरविले आणि सभासदांना घर दुरुस्‍ती, शेतीचे काम, शिक्षण, आरोग्‍यविषयक समस्‍या आदींसाठी कर्ज देणे सुरु केले.

काही कालावधीनंतर आमचा बचत गट चांगला विकसित झाला. आम्‍ही गावातील विविध कार्यक्रमांमध्‍ये सहभागी होऊ लागलो. पुर्वी दुर्लक्षित करणारे लोक आता आमच्या गटातील सदस्यांना आदर देऊ लागले. विविध कार्यात आमचा सहभाग घेऊ लागले.

आम्ही दुग्ध व्यवसाय करण्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केली. आम्‍हाला दुग्ध व्‍यवसायाकरिता १ लाख ८२ हजार रुपये कर्ज मंजूर झाले. त्‍यातून आम्‍ही प्रत्‍येकी एक या प्रमाणे १ लाख ४० हजार रुपयांच्‍या म्‍हशी विकत घेतल्‍या. आता आमच्‍या जवळ उपजीविकेचे साधन सुद्धा उपलब्‍ध झाले आहे. प्रत्‍येक सदस्‍य आपल्‍या म्‍हशीचे संगोपन चांगल्‍या प्रकारे करीत असून सर्वांना आपला मोबदलाही मिळत आहे.
मिळालेल्या कर्जापैकी आम्‍ही आतापर्यंत १ लाख ३६ हजार रुपये आणि व्‍याज परत केले आहे. आजपर्यंत आमची बचत ५३ हजार रुपये झाली असून २ लाख ७५ हजार रुपये व्‍याजाचे जमा झाले आहे. या बचतगटामुळे आम्‍ही सक्षम झालो आहोत. यामुळे आम्‍हाला संघटन आणि सहकार याची खरी शक्‍ती आता कळली आहे.

No comments:

Post a Comment