Monday, January 23, 2012

कोट्याधीश संत्रा उत्पादक


अमरावती जिल्ह्याच्या पुसला येथील प्रगतशील युवा शेतकरी राजेंद्र केदार यांनी चक्क ४ कोटी रुपयांची संत्री विकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अलिकडच्या काळात संत्रा व्यवसाय डबघाईस आला असताना केदार यांनी मिळविलेले हे यश मात्र लक्षवेधक ठरले आहे.

केदार यांच्या शेतात जवळजवळ एक कोटी संत्रा फळे आहेत. यातील ५० लाख संत्री तोडून बाजारातही गेली आहेत. मागील काही दिवसांपासून संत्र्यांची तोडणी सुरु असून त्यासाठी २०० महिला पुरुष सतत राबत आहेत.

राजेंद्र केदार यांनी अमरावती विद्यापीठातून गणित विषयात बी.एस्‍सी केले आहे. त्यांचे सात भावंडांचे कुटुंब असून यातील चार शासकीय सेवेत कार्यरत आहेत तर तीन भावंडं शेती करतात. उच्चशिक्षित असतानाही राजेंद्र यांनी शेतीची वाट धरली हे विशेष.

त्यांच्याकडे सर्व भावंडांची मिळून दोनशे एकर शेती पुसला आणि उराड शिवारामध्ये पांढुर्णा मार्गावर आहे. त्यांच्याकडे ३० वर्षे वयाची फळधारणा करणारी २० हजार संत्र्याची झाडे आहेत, तर चार हजार लहान झाडे आहेत. योग्य तांत्रिक मार्गदर्शन घेऊन त्यांनी यावर्षी २० हजार झाडांवर आंबिया बहराच्या एक कोटी संत्र्यांचे उत्पादन घेतले आहे.

त्यांनी आतापर्यंत निघालेली ५० लाख संत्री ८ हजार ७५० रुपये प्रती टन दरानुसार विकली आहेत. कमीतकमी एक हजार टन संत्री निघण्याची हमी असली तरी यापेक्षा अधिक संत्री निघतील, असा राजेंद्र केदार यांना विश्वास आहे.

या फळाची प्रतवारी आकर्षक असल्याने त्याला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. दर दिवसाला किमान तीन लाख संत्री झाडावरुन काढली जातात. २०० मजूर नियमित कामावर आहेत. तोडणी १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामुळे चार कोटी रुपयांपेक्षाही अधिक आवक होण्याचा अंदाज केदार यांनी वर्तविला आहे. केदार यांच्याकडे संत्र्याव्यतिरिक्त १२ एकरात कपाशी आहे. त्यातही सरासरी एकरी २० क्विंटल उत्पादन काढल्याचे त्यांनी सांगितले.

शेती व्यवसायाला तांत्रिक मार्गदर्शनाची जोड असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पिकाचे नियोजन आणि संगोपन कसे करतो, यावर शेती व्यवसाय अवलंबून असल्याचे केदार सांगतात. पिकांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी मशागतीपासून फळ येईपर्यंतच्या कालावधीत योग्य नियोजन, संगोपनाबाबतचे ज्ञान आणि मेहनत करण्याची तयारी याच्या बळावर यश निश्चित मिळते याची त्यांना खात्री आहे. या बाबींकडे लक्ष दिल्यास शेती हा व्यवसाय कधीच तोट्यात जात नाही, त्याउलट इतरांनाही रोजगार देऊ शकतो, असे मत केदार यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment