अल्पकाळात उत्तम प्रगती करणारा गट म्हणून वर्धा जिल्ह्याच्या इंझाळा येथील शारदा महिला बचत गटाने आपली ओळख निर्माण करुन दाखविली आहे.
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा येथे २४ जुलै २००३ रोजी शारदा महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या गटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बचतगटात एकूण १३ सदस्य असून त्या सर्व अनुसूचित जातीच्या महिला आहेत.
उपलब्ध आर्थिक बळ, कामाची उपलब्धता, त्याची निकड, उत्पादनाची विक्री या सर्व बाबी विचारात घेऊन या गटाने दुग्धव्यवसायाची निवड केली. त्यासाठी त्यांनी २००८ साली बँकेकडून ३ लाख २५ हजार रूपये कर्ज घेतले. त्यावर त्यांना अनुदान म्हणून १ लाख २५ हजार रुपये मिळाले. त्यानुसार त्यांची एकूण प्रकल्प किंमत ४ लाख ५० हजार रुपये आहे.
बचतगटातील व्यवहार हाताळण्यासाठी गटातील सदस्यांनी अध्यक्ष म्हणून उषा खुशाल चापके तसेच सचिव म्हणून चंदा बळवंत भसमे यांची निवड केली. या बचतगटातील बँकेचे व्यवहार को-ऑपरेटीव्ह बँक, हिंगणघाट येथे आहेत.
या गटाला दुग्धव्यवसाय करण्यासाठी बँकेकडून एप्रिल २००८ मध्ये १३ गायी देण्यात आल्या होत्या. त्यासाठी बँकेकडून पहिला हप्ता म्हणून दोन लाख रूपयांचे कर्ज वितरीत झाले. या गटाने व्यवसाय सुरु केल्यानंतर त्यांना सुरूवातीस ४० हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले. तसेच त्यांनी बँकेची १ लाख ३० हजार रूपयांची परतफेड केली असून या गटाकडे सद्यस्थितीत मालमत्ता स्वरुपात ७ गायी आहेत.
या बचतगटातील सदस्यांना बचतीचे महत्त्व लक्षात आल्याने आणि एकत्रित व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आत्मविश्वास निर्माण झाल्याने सर्व सदस्य अधिकाधिक वेळ देऊन मेहनतीने काम करीत आहेत. यामुळेच अल्पकाळात उत्तम प्रगती करणारा गट म्हणून या गटाने आपली वेगळी ओळख निर्माण करुन दाखविली असून ती इतर गटांनाही प्रेरणा देणारी ठरत आहे.
No comments:
Post a Comment